सुश्री प्रभा सोनवणे
विविधा
☆ माझी पुडाची करंजी ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
करंजी आवडणारे फार कमी लोक आहेत असं मला वाटतं. माझी आई खूप सुंदर पुडाच्या करंज्या करायची आणि तिची आईही आई आणि आजीच्या हातच्या त्या अलवार करंजा लहानपणापासून खाल्लेल्या दिवाळीत !
एका दिवाळीत बडोद्याहून आत्या सहपरिवार आल्या गावाकडे, माझी आई आणि काकी दोघींना मोठ्ठा पितळेचा डबा भरून पुडाच्या करंज्या केल्या रात्रभर जागून. आणि तो पितळी डबा मी उठायच्या आत पाठवला!
आत्या सहकुटुंब मळ्यातल्या घरी रहिल्या होत्या. तिकडे, ताजी करंजी खायला न मिळाल्याची खंत मला अजूनही आठवतेय मी तेव्हा नववी दहावीत असेन आम्ही तीन चार मुलं गावातल्या घरात असताना सगळ्याच्या सगळ्या करंज्या तिकडे का पाठवल्या होत्या ते आता आठवत नाही, घरात सुबत्ता होती आणि घरातल्या सगळ्या बायका सुगरणी होत्या … नंतर करंजी सह सगळे पदार्थ केले आणि भरपूर खाल्लेही असतील, पण तो भला मोठा करंज्यांनी भरलेला पितळी डबा आणि आम्हाला त्यातली एकही करंजी न देता सकाळी गड्याबरोबर पाठवलेला……अजूनही आठवतो आणि खूप हसू येतं त्या वेळी करंजी न मिळाल्याचं!
माझ्या लग्नानंतर मी ही दिवाळीला त्याच पद्धतीने पुडाच्या करंज्या करू लागले, एकदा दिवाळीत सरोज फडके नावाची केटरिंग व्यवसाय करणारी मैत्रीण आली तिला दिवाळीच्या पदार्थाची ताटली दिली,तर ती म्हणाली “ती करंजी काढ पहिल्यांदा “मी म्हटलं तू खाऊन तर बघ, मग तीने फक्त चार करंज्याच खाल्ल्या!
माझ्या हातची पुडाची करंजी खूप जणांना आवडलेली आहे हे माझं मलाच खूप छान वाटतं,
माझी मैत्रीण स्वाती सामक आणि मी आम्ही दोघींनी एका दिवाळीत काही पदार्थ एकत्र केले होते, तिला पण करंजी अजिबात आवडत नव्हती पण तिने माझ्या करंजीची खूप तारीफ केली होती, आणि ती आजही म्हणते, “प्रभा करंजी मला फक्त तुझीच आवडली होती. ” बरेच वर्ष केली नाही करंजी, यावर्षी कंटाळा न करता पुडाची करंजी करीन, मागच्या दिवाळीत एका सीकेपी मैत्रीणीने दुस-या एका मैत्रीणीकडे कानवले आणले होते तिथे मी एक कानवला खाल्ला खूप प्रशंसा केली, मी आणि इतरांनीही !पण माझी पुडाची करंजी काकणभर सरसच असायची ! फरक इतकाच ती सीकेपी मैत्रीण पंचाहत्तरी पार केली तरी अजून घरी दिवाळीत कानवला (करंजी )करते आणि मी साठीतच माझ्यातल्या सुगरण पणाला तजेला देणं सोडून दिलं . गेली अनेक वर्षे करंजी केली नाही.
माझ्या पुतणीचं लग्न झाल्यानंतर तिला करंज्या पाठवल्या दिवाळीत….तेव्हा ती गावाला गेली होती , एकत्र कुटुंबात रहाणारी माझी पुतणी- प्रीती गावाहून आल्यावर ,मला म्हणाली, “काकी मी तुझी करंजी ओळखली, मी मम्मींना म्हटलं, “ही काकीची करंजी आहे”.
खूपजणी माझ्या पेक्षा सुंदर पुडाच्या करंजा करत असतील, पण अशा पद्धतीची प्रशंसा माझ्या करंजीला मिळाली आहे!
समस्त भारतीय सुगरणींच्या कुळात माझ्या करंजीची ही खसखशी एवढी नोंद!
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ?
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011