विविधा
☆ मेंदू वापरा, नाहीतर विसरा…भाग 1 ☆ सुश्री मंगला जोगळेकर ☆
जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्याला जग कसं अगदी आश्चर्यांनी भरलेलं दिसतं, जगाकडे पाहाण्याची आपली दृष्टी कायमच विस्मयजनक असते.
मेंदू वापरला नाही तर तो गंजतो, हे आता सिद्ध झालेलं आहे. म्हणूनच मेंदूला सतत कामाला लावायला हवं. रोजच्या रोज, घरच्या घरी करता येणाऱ्या गोष्टी, कोडी यांनीही ते करता येतं. मेंदूला कृतिशील ठेवण्यासाठी जगभरात विविध ‘वेब पोर्टल्स’तर आहेत याशिवाय ब्रेन एरोबिक्स, ब्रेन जिमही सुरूझालीत. विविध अॅप्स उपलब्ध आहेत. पुण्यासह इतरही काही ठिकाणी मेमरी क्लब सुरू करण्यात आले आहेत.
डॉडेव्हिड स्नोडन हे अमेरिकेच्या केन्टकी विद्यापीठात काम करतात. १९८६ पासून ते एका महत्त्वपूर्ण अभ्यासात गुंतले आहेत. हा अभ्यास मिनीसोटा राज्यातील आडवळणाच्या गावात चर्चमध्ये काम करणाऱ्या नन्सचा आहे. यातील बहुतेक नन्स नव्वदीच्या घरात पोहोचल्या आहेत, वा होत्या. त्यांचा अभ्यास करण्याचं कारण तुमच्या लक्षात आलंच असेल; ते म्हणजे त्यांचं असाधारण आयुष्यमान. या सर्वेक्षणाद्वारे आतापर्यंत जवळजवळ ७०० नन्सचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यामध्ये असं दिसून आलं, की त्यांच्या उत्साही दीर्घायुष्याचं रहस्य त्या मेंदूला देत असलेल्या व्यायामात आहे. त्यांच्या चर्चमध्ये प्रश्नमंजूषा, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा, इत्यादी कार्यक्रम आय़ोजित केले जातात. आपापले छंद जोपासणं, शब्दकोडी सोडवणं यालाही प्रोत्साहन दिलं जातं. याशिवाय सर्वजणी चर्चमध्ये आपली नेमून दिलेली कामं मोठ्या वयातही करतात.
या अभ्यासासाठी आतापर्यंत शंभराहून जास्त नन्सनी आपले मेंदू दान दिले. त्यांच्या मृत्यूनंतर केलेल्या पाहणीमध्ये त्यांच्या मेंदूच्या पेशींची मुळं (म्हणजे डेंड्राइट आणि अॅक्झान) आक्रसलेली तर दिसली नाहीतच. परंतु त्यांनी मेंदूच्या आत दळणवळणाचे नवीन मार्ग प्रस्थापित केलेले दिसले. याशिवाय निकामी झालेल्या मार्गांवर त्यांची जागा घेणारे पर्यायी मार्गही तयार झालेले आढळून आले. यावरून मेंदूच्या व्यायामांमुळे, त्याला आव्हान दिल्यामुळे डेंड्राइट्सची चांगली वाढ होते आणि पेशींमधील संदेशवहनाची क्षमता वाढते, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मृत्यूनंतर झालेल्या मेंदूच्या पाहणीमध्ये यांपैकी कित्येक नन्सना अल्झायमर्स झालेला होता असं आढळलं. परंतु वर्षानुवर्षं मेंदूला मिळणाऱ्या व्यायामांमुळे रोजच्या जीवनावर स्मृतिभ्रंशाचा कुठलाही दृश्य परिणाम न होता त्या आपलं आयुष्य निश्चिंतपणे जग़ू शकल्या. ही खूपच मोठी आश्चर्याची बाब आहे. या निरीक्षणाचे तरंग जगभर उमटले. त्याची चर्चा सुरू झाली.
ज्यांना शिक्षणाची आवड आहे, जे पदवीधर आहेत, जे बुद्धीला खाद्य देणाऱ्या गोष्टींमध्ये रस घेतात, वाचन, लेखन, आवडीच्या विषयांवर चर्चा, माहितीपूर्ण कार्यक्रम बघणं, नवीन भाषा शिकणं इत्यादी तऱ्हेतऱ्हेच्या प्रकारांनी ‘मेंदूचा जागर’ घडवून आणतात, त्यांच्यामध्ये ‘डिमेंशिया’ होण्याची शक्यता थोडीफार कमी होते. न्यूयॉर्कमध्ये पंचाहत्तर वर्षांपेक्षा वयानं अधिक असलेल्या लोकांच्या अभ्यासातून असं दिसलं, की जी मंडळी बुद्धिबळ, सोंगट्यांसारखे खेळ नियमितपणे- म्हणजे आठवड्यातून चार वेळा तरी खेळतात, विविध प्रकारांनी मेंदूला जागृत ठेवतात, त्यांच्यात डिमेंशिया होण्याची शक्यता कमी होते. चीनमधल्या अभ्यासातूनही असं दिसून आलं, की जी मंडळी मोठ्या वयातही आव्हानात्मक गोष्टी करणं चालू ठेवतात त्यांच्या बुद्धीची झीज कमी प्रमाणात होते.
जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्याला जग कसं अगदी आश्चर्यांनी भरलेलं दिसतं, जगाकडे पाहाण्याची आपली दृष्टी कायमच विस्मयजनक असते. रोजच्या रोज नवीन आव्हानं आपल्या मेंदूला ताजंतवानं ठेवतात. नित्य नवीन शिकल्यामुळे मेंदू कृतीशील राहातो. त्यातील बदलांकडे बघून शास्त्रज्ञांना पेशींच्या नवनिर्मितीचा दाखला मिळत जातो. औत्स्युक्य टिकवल्यामुळे वयानुसार होणारी झीज घडत असतानादेखील, आपली ताकद राखून ठेवण्याचा मेंदू प्रयत्न करतो. परंतु असंही दिसतं, की मेंदूला अनाठायी आराम दिल्यामुळे, निवृत्तीनंतर येणाऱ्या सुस्तीमुळे, जीवनात रस घेणं थांबवल्यामुळेही मेंदू विसावतो. आपला स्वभावधर्म सोडून, स्मरण ठेवण्याचं आपल्याला नेमून दिलेलं काम करण्यात तो कुचराई करायला लागतो. त्याचाच परिणाम म्हणून आपलं विस्मरण वाढतं. विस्मरणाऐवजी स्मरणाची गाडी द्रुतगतीच्या मार्गानं वळवण्यासाठी ‘आराम हराम हैं’ हा मंत्र लक्षात ठेवा. मेंदूला वापरायला शिका. ‘मला काम द्या, मी कामाचा भुकेला आहे,’ असं सांगणारं मेंदूशिवाय दुसरं कोणी या जगात भेटणार नाही, याबद्दल सर्वांचं एकमत व्हावं! या वृत्तीमुळे मेंदूच्या कक्षा आपण कितीही रुंदावू शकतो.
‘ड्युक युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर’मधील प्रोफेसर डॉ. लॉरेन्स कॅट्झ यांनी नावीन्यातून मेंदूला जागवा, असा संदेश दिला. आपण ज्या गोष्टी एरवी करतो त्या करण्याऐवजी त्यामध्ये वेगळेपण ठेवा, ही कल्पना त्यांनी मांडली. नावीन्याच्या या अनुभवाला ‘न्युरोबिक्स’ असं समर्पक नाव त्यांनी दिलं आहे. न्युरोबिक्सच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीत पाचही ज्ञानेंद्रियं आणि त्याबरोबर आपलं मन, भावना अनोख्या मार्गानं वापरल्या जातात. अशा रीतीनं ज्ञानेंद्रियांना एक प्रफुल्लित अनुभव देणं म्हणजे न्युरोबिक्स.
फ्रान्समधील मोनिक ल पॉन्सिन यांनी असं स्पष्ट के लं आहे, की मेंदूचे व्यायाम अवघड, अनाकलनीय असण्याची काही आवश्यकता नाही. सोपे, आनंददायी व्यायाम केल्यानंसुद्धा फायदा होऊ शकतो. ‘हे व्यायाम करण्यासाठी वेळ नाही असंही कारण पुढे करू नका,’ असं त्या सांगतात. कारण प्रवास करताना, जेवणाच्या सुट्टीमध्ये, स्वयंपाक करताना, इतर काही बारीकसारीककाम करतानाही असे व्यायाम करता येऊ शकतात.
क्रमशः….
© सुश्री मंगला जोगळेकर
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈