सौ. सुचित्रा पवार
विविधा
☆ मज आवडते… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆
धुक्याची दाट दुलई सावरत फिकुटल्या चांदण्याचा पदर आवरत …..भालावरील चांदव्याची टिकली एकसारखी करत…. पक्ष्यांच्या मधुर किलबिलाटाला साद देत …. मंदिरातील घंटा मंजुळ वाजवत ऊबदार पहाट व्हायला आवडेल मला! सकाळच्या त्या तेजपुंज अरुणोदयाचे मंगल दर्शन घेऊन मग हळूहळू उतरत .. त्या डोंगरमाथ्यावरून खाली …खाली खोल दरीत विसावताना लाडीक झटका देईन ओलेत्या काळ्याभोर केशसंभाराला अन…पाणीदार मोत्यांच्या लडी विस्कटेन झुलत्या तृणाग्रावर …पर्ण संभारावर …फुलांच्या स्मित गालावर.
कधी मंद मंद वाऱ्याची झुळूक बनून झोके घेत उडवत राहीन गन्ध ताज्या फुलांचा…अन मस्त शीळ घुमवेन वेळूच्या बेटी ….उडवेन कुणा अल्लड तरुणीच्या अवखळ बटाना ..भुरुभुरू ..हाय !….. बघत राहीन तिची खट्याळ लगबग!
काळाकुट्ट मेघ होऊन बरसावे मनसोक्त …निथळत रहावे प्रेयसीच्या बटामधून ..मोती होऊन …शुष्क धरणीला तृप्त करत …निथळत राहावे तिच्या सर्वांगावरून नद्या ,झरे होऊन .द्यावी नवी नव्हाळी अन न्याहाळत राहावे अनिमिष नेत्रांनी …तिचे नवे कोवळे हिरव्या पाचूच्या शालूतील हिरवकंच सौंदर्य! जावे .-कुण्या तृषार्त चातकाच्या चोचीत सामावून.
डोलत रहावे अवखळ वाऱ्यासोबत शेतात भरलेले कणीस होऊन ….भागवावी भूक कुण्या भुकेल्या पाखराची अन कुणा लेकराची !
गात राहावे …भटकत रहावे मनमौजी छोटेसे पाखरू बनून …रानमेवा खात ….आपल्याच मस्तीत गुंग …या फांदीवरून त्या फांदीवर झोके घेत …इवल्या पानाआड लपाछपी खेळत !
प्यावे ते पौर्णिमेचं चांदणं ..व्याकूळ चकोर होऊन …काजव्याचे बांधून पैंजण धरावा ताल …करावे बेभान नृत्य ….
चांदणं भरल्या नभातील व्हावे एक प्रकाशतारा …दाखवावी वाट प्रकाशाची कुणा वाट चुकलेल्या पांथस्थास .
होऊन शूर सैनिक करावे भारत भूचे रक्षण… उसळून रुधिराचे तुषार करावे सिंचन त्या पवित्र मातीवर !
व्हावे आई त्या सर्व अनाथांची अन पांघरावी त्यांच्यावर मायेची ऊबदार सावली !…हसवावे ..रिझवावे बालमन गाऊन अंगाई…हरवून जावे बोबड्या बोलात …
नाहीच जमले तर व्हावे तो पायरीचा एक दगड त्या ज्ञानमंदिराचा …ज्या पायरीवर उभा राहील उद्याचा तरुण, उज्वल भारत !!
© सौ.सुचित्रा पवार
तासगाव, सांगली
8055690240
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈