सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ मकर संक्रांत….भाग-२ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

यानंतरचा मुख्य दिवस मकरसंक्रांत. या दिवसाची एक पौराणिक कथाही सांगितली जाते. संक्रांत या देवतेने संकरासुर दैत्याचा वध केला. तो हा आनंदाचा आनंदोत्सवाचा दिवस. संक्रांती म्हणजे सम्यक क्रांती. क्रांती मध्ये   हिंसेला महत्व असेल, पण सं–क्रांती मध्ये मानवी मनाचे संकल्प बदलण्याचा विचार असतो. संक्रांती म्हणजे संग क्रांती. प्रत्येकाने मुक्त व आनंदी जीवन जगणाऱ्या, लोकांशी संग युक्त होऊन,  षड्रीरिपूं पासून दूर राहण्याचा संकल्प करायला हवा. संक्रांती म्हणजे संघ क्रांती. “संघे शक्ती कलौ युगे”. संघामध्ये शक्ती विपुल प्रमाणात एकत्र आल्याने कठीण कार्यही सहजगत्या पार पडते. हा सण –उत्सव लोकांना जोडण्याचे काम करतो. म्हणून आनंद सुसंवाद आणि ऐक्‍याचे प्रतीक मानला जातो. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग (संक्रांत). (तमसो मा ज्योतिर्गमय).

संक्रांतीला तीळ  (स्नेह) आणि (गुळ)  गोडी याला महत्व आहे. आयुर्वेद शास्त्रानुसार थंडीच्या दिवसात रुक्ष झालेल्या शरीराला स्निग्धतेची  गरज असते. ती गरज भागविणारे तीळ हे सर्वोत्तम खाद्य आहे. आहारात वापरणे प्रकृतीला लाभदायक ठरते. तसेच तीळयुक्त पाण्याने  स्नान करतात. अध्यात्मानुसार  तिळात कोणत्याही इतर तेलापेक्षा, सत्व लहरी ग्रहण करण्याची क्षमता जास्त असल्याने, सूर्याच्या संक्रमण काळात साधना चांगली व्हायला, सर्वोत्तम मानले जातात. तिळाचे तेलही पुष्टीप्रद असते. या दिवशी ब्राह्मणांना दान, शिवमंदिरात तिळाच्या तेलाचे दिवे  लावतात. पितृ श्राद्ध करून, तिलांजली देऊन, तर्पण करतात.तिळामुळे असुर श्राद्धात विघ्न आणत नाहीत, अशी समजूत आहे. जेवणात गुळाच्या किंवा पुरणपोळ्या करतात. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे .आप्तेष्टांना तिळगुळाची वडी किंवा लाडू देऊन, “तिळगुळ घ्या,गोड गोड बोला” असे शब्द उच्चारले जातात.

“तिलवत वद  सस्नेहमं, गुडवत मधुरम वद । 

उभयस्य प्रदानेन  स्नेहवृद्धीः  चिरं भवेत ।।”

अशी सदिच्छा व्यक्त केली जाते. काहीजण पुण्यकाळ व महापुण्य काळ मुहूर्तावर सूर्यदेवाला अर्घ्य देऊन, पूजा करून ,आरती करून, सूर्य मंत्र  २१ किंवा १०८वेळा पठण  करतात. पूजेच्या वेळी काही भाविक 12 मुखी रुद्राक्ष धारण करतात. त्यामुळे चेतना व वैश्विक बुद्धिमत्ता बऱ्याच पातळ्यां पर्यंत वाढून, कामे यशस्वी होतात अशी समजूत आहे. भगवान शनिदेव मकर राशीचे स्वामी असल्याने, जप ,तप ,ध्यान आदी धार्मिक क्रियांना महत्त्व आहे. संक्रांतीला नवीन लग्न झालेल्या मुलीला, सासरचे काळी साडी, हलव्याचे दागिने आणि तिळगुळ आणतात. तसेच जावयाला हलव्याचा हार, गुच्छ ,चांदीच्या वाटीत तिळगुळ घालून देतात. लहान बाळालाही काळे कपडे, हलव्याचे दागिने घालून, बोरन्हाण घालतात. (चिरमुरे, बोरं, भेंड, बत्तासे, चॉकलेट वगैरे). थंडीचे दिवस असल्याने काळा रंग  ऊब  देत असल्याने, काळे कपडे घेण्याची पद्धत असावी. स्त्रिया हळदीकुंकू करून तिळगुळ व दान देतात.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित/सौ.मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments