सुश्री सुनिता गद्रे
विविधा
☆ ‘महाकवी गुणाढ्यआणि त्याची बड्डकहा ‘. भाग २ ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆
(शर्ववर्मा मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला,” महाराज मी तुम्हाला सहा महिन्यात संस्कृत व्याकरण शिकवू शकेन. “) आता पुढे….
गुणाढ्याला ही गोष्ट अशक्य वाटली. त्याने मोठ्या हिरीरीने पैज लावली, “शर्ववर्माने जर सहा महिन्यात राजाला संस्कृत व्याकरण शिकवून दाखवले तर मी संस्कृत,पाली प्राकृत या तिन्ही भाषांचा त्याग करेन. “त्याच्या पैजेला उत्तर म्हणून शर्ववर्मा म्हणाला,”जर मी असे करू शकलो नाही तर पुढची बारा वर्षे डोक्यावर तुझ्या पादुका धारण करून वावरेन. “
….आता पैज जिंकणे ही मोठ्या प्रतिष्ठेची बाब झाली. शर्ववर्मा कुमारस्वामींकडून कातंत्र व्याकरण शिकला होता. हेच ते रोजच्या बोलचालीत उपयोगी पडणारे व्यावहारिक व्याकरण… त्याच्या सहाय्याने त्याने खरोखरच सहा महिन्यात राजाला असे व्याकरण शिकवले की राजाला यापुढे कोणासमोरही बोलताना लज्जित व्हावे लागणार नव्हते.
राजाचाआनंद गगनात मावेनासा झाला. खूप धनदौलत देऊन त्याने शर्ववर्माची पूजा केली आणि त्याला नर्मदा तटावरील भृगुकच्छ (भडोच)देशाचा राजा घोषित केले.
मात्र जलक्रीडा प्रसंग… आणि ओघाने आलेला हा पैजेत हरण्याचा प्रसंग… दोन्हीही गुणाढ्याच्या पुढील आयुष्याला कलाटणी देणारे ठरले.त्यामुळे त्याच्या जीवनाची दशा आणि दिशाच बदलून गेली. त्याचा वाईट काळ सुरू झाला. कबूल केल्याप्रमाणे त्याने संस्कृत, पाली,प्राकृत भाषेचा त्याग केला. मौन धारण करून विंध्य पर्वतावर जाऊन त्याने देवी विंध्यवासिनीच्या पूजाअर्चनेत स्वतःला गुंतवून घेतले. कालांतराने तेथील वन-वासीयांकडून तो पैशाची भाषा शिकला. पैशाची भाषा हा प्राकृत भाषेचा उपभेद होता.
गुणाढ्याने तेथे बड्डकहेची (बृहत्कथा)रचना केली. सात वर्षात अथक प्रयास करून सात लाख छंदात त्याने ती लिहून काढली. तीही पैशाची भाषेत! त्यामुळे ती बृहत्कथे ऐवजी बड्डकहा!
विंध्याद्रीच्या घनदाट अरण्यात शाई किंवा भुजपत्र उपलब्ध नव्हते. त्यामुळे मनस्वी गुणाढ्याने मृतप्राण्यांच्या कातड्यावर स्वतःच्या रक्ताची शाई करून ही विशाल कथा लिहिली. लिहिता लिहिता गुणाढ्य ती वाचत असे. ती ऐकण्यासारखी तेथे सिद्ध विद्याधरांचा मेळावा जमा होई. त्यातील गुणदेव आणि नंदी देव हे दोघे त्याचे शिष्य झाले. सात वर्षांनी जेव्हा बृहत्कथा लिहून पूर्ण झाली तेव्हा त्याचा प्रचार प्रसार कसा करावा हा प्रश्न गुणाढ्याला भेडसावत होता. त्याच्या शिष्यांच्या मतानुसार फक्त सातवाहन नरेश सारखा योग्य व्यक्तीच या कथेचा प्रसार करू शकला असता. त्यालाही हा सल्ला आवडला. त्याप्रमाणे दोघे शिष्य राजधानीत राजदरबारी जाऊन पोहोचले. त्यांनी गुणाढ्याच्या कृतीवर सविस्तर माहिती पुरवली. पण सात लाख श्लोकांची इतकी मोठी पोथी… पोथी नव्हे पोथाच….तोही प्राण्यांच्या कातड्यावर … निरस अशा पैशाची भाषेत आणि मनुष्याच्या रक्ताने लिहिलेला!राजाने त्या कृतीकडे पाहण्याचे ही टाळले. अपमान करून त्याने गुणाढ्याच्या शिष्यांना परत पाठवले.
या प्रकारामुळे कवी गुणाढ्य अतिशय दुःखी झाला. जवळच्या एका टेकडीवर त्याने अग्निकुंड तयार केले.उंच उंच उठणाऱ्या ज्वालात आपल्या महान कलाकृतीचे एकेक पान वाचून तो अर्पण करत गेला. त्या श्लोक पठणात इतके माधुर्य होते की अवतीभोवती वनात राहणारे प्राणी,पशू-पक्षी जमा झाले. एकेक पान अग्निकुंडात जळून जात होते… शिष्य डोळ्यात पाणी आणून हे दृश्य बघत होते ….पशुपक्षी खाण्यापिण्याची शुद्ध हरपून स्तब्ध होऊन डोळ्यात पाणी आणून बृहत्कथा श्रवण करत होते.
इकडे राजवाड्यात सामिष भोजनासाठी चांगले मास उपलब्ध होईना. कारण सारे पशुपक्षी निराहार राहिल्याने हाडे-काडे होऊन गेले होते. त्याचे कारण जाणून घेण्यासाठी विचारपूस, तपास सुरू झाला. त्यामुळे राजाला गुणाढ्य करीत असलेल्या काव्य-कथा हवनाची माहिती मिळाली. राजदरबारात घडलेला प्रकार राजाला आठवला. त्याला पश्चाताप झाला.
आपली चूक सुधारण्यासाठी तो ताबडतोब अरण्यात गेला. त्याला काहीही करून गुणाढ्याला व बड्डकहेला वाचवायचे होते. राजाने साष्टांग दंडवत घालून त्याची माफी मागितली. खूप अनुनय विनवण्यानंतर गुणाढ्याने आपले लेखन अग्नीत अर्पण करायचे थांबवले. पण….तोपर्यंत कथेचा एक सप्तमांश भाग….एक लाख श्लोकच शिल्लक राहिले होते.राजा त्याच्या प्रसार,प्रचाराचे आश्वासन देऊन त्याला त्याच्या अमूल्य वाड़मयाला सन्मानपूर्वक
आपल्या राजधानीत घेऊन आला.
क्रमशः…
© सुश्री सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈