सुश्री सुनिता गद्रे

?विविधा ?

 ☆ ‘महाकवी गुणाढ्यआणि त्याची बड्डकहा ‘. भाग 5 ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

(सातवाहन नरेश गुणाढ्याला व त्याच्या महान कृतीला सन्मानपूर्वक राजधानीत घेऊन आला ).आता पुढे….

मुळ बृहत् कथेबद्दल थोडक्यात आख्यायिका अशी आहे की ती भगवान शंकर देवी पार्वतीला सांगत होते. विश्वातल्या सर्वच्या सर्व कथा-कहाण्या, काव्य, नाटक, आख्यायिका इत्यादी त्यात समाविष्ट होत्या. ती पूर्ण बृहत्कथा शंकराच्या एका गणाने योगाद्वारे गुप्त होउन ऐकली होती. हे लक्षात आल्यावर देवी पार्वतीने त्या गणास, माफी मागणाऱ्या त्याच्या एका मित्रास व एका यक्षास शाप दिला होता. त्यामुळे त्यांना मानव योनीत पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला होता. आणि उःशाप म्हणून जन समुदायापर्यंत बृहत्कथा पोहोचल्यावर त्यांना पुन्हा दिव्य- लोक प्राप्त होणार होता. त्या गणाच्या मित्राचे मानव जन्मातले नाव गुणाढ्य असे होते.

वर, शाप-उःशाप, पूर्वजन्मीचे ज्ञान पुनर्जन्म या गोष्टीवर आपण विश्वास ठेवला नाही तरी ,एका वररुची या व्यक्तीने काणभूतीला व त्याने ही कथा पुढे गुणाढ्याला ऐकवली होती आणि त्याने तिचा जनसामान्यात प्रचार करण्यासाठी ती ‘पैशाची’भाषेत लिहिली या गोष्टीवर आपण विश्वास ठेवू शकतो.

ही पुराणकथा नाहीय. त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. सातवाह वंशाच्या नरेशांचा कालावधी इसवीसनपूर्व २०० ते ३०० वर्षे असा ऐतिहासिक पुराव्या वरून मानला जातो.त्यातील एक शासकाने गुणाढ्याला आपला मंत्री केले होते.

त्याची बड्डकथा मूळ रुपात उपलब्ध नाहीय. पण सन ९३१ मध्ये कवी क्षेमेंद्र ने ७५००श्लोकांचा बृहत्कथा मंजिरी श्लोक संग्रह लिहिला व कवी सोमदेव भट्ट याने १०६३  ते १०८२ या कालखंडात २४०० श्लोकांचा कथासरित्सागर नावाचा ग्रंथ लिहिला. हे ग्रंथ त्यांनी त्यांना उपलब्ध झालेल्या गुणाढ्याच्या एक लाख श्लोकां वरून संस्कृत मध्ये रूपांतरित केले. त्याला गुणाढ्याची बृहत्कथा असेही म्हणतात. बृहत्कथा म्हणजे भारतीय परंपरेचा महाकोष आहे. सर्व प्राचीन आख्यायिका, साहित्याचा उगम बृहतकथेत आहे. बाण, त्रिविक्रम, धनपाल इत्यादी श्रेष्ठ साहित्यकारांनी बृहत् कथेला विस्मयकारक, अत्याधिक सामान्य लोकांचे मनोरंजन करणारा ,उपजीव्य ग्रंथ मानला आहे. तो समुद्रा- सारखा विशाल आहे. हे त्यांनी वर्णन करून सांगितले आहे. त्याच्या थेंबातूनही खूप  आख्यायिकाकार व कवींनी आपल्या रचना केल्या आहेत.

वेद ,उपनिषदे, पुराणे इत्यादीतून प्राप्त होणाऱ्या कथा या उच्च वर्गाच्या साहित्य प्रवाहातून भारतीय इतिहासाच्या सांस्कृतिक भूतकाळाशी जोडल्या गेल्या होत्या. त्याला समांतर असा दुसरा एक लोक प्रचलित कथांचा प्रवाह पण आदि काळापासून अस्तित्वात होता.गुणाढ्याने सर्वप्रथम या दुसऱ्या साहित्यप्रवाहाचा संग्रह लोकभाषेत लिहिला.बृहत्कथा सामान्य लोकांच्या जीवनाशी निगडित आहे .समाजातील जुगारी, चोर, धूर्त,लंपट , ठग व्यभिचारी भिक्षु , अधःपतन झालेल्या स्त्रियाअशी कितीतरी पात्रे कथांमधून आहेत. त्यात मिथक आणि इतिहास ,यथार्थ आणि कल्पना लोक,सत्य आणि मायाजाल यांचा अपूर्व संगम आहे.

कादंबरी, दशकुमार चरित्र, पंचतंत्र, तसेच वेताळ पंचविशी,( विक्रम वेताळ कथा) सिंहासनबत्तिशी, शुकसारिका अशी कथा चक्रे, स्वप्नवासवदत्ता प्रतिज्ञायौगंधरायण, आणि अनेक कथा ,काव्य ,नाटक, अख्यायिका, उपअख्यायिका आहेत

त्यामुळे त्यांचे कर्ते बाणभट्ट, भास, धनपाल ,सोंडल, दंडी विशाखादत्त, भास, हर्षआणि अनेक …बृहत कथेचे अर्थात् गुणाढ्याचे ऋणी आहेत. पौराणिक कथा संग्रहाप्रमाणेच लोक कथा संग्रहाला पण असाधारण महत्व प्राप्त आहे. यामुळेच गोवर्धन आचार्यांनी वाल्मिकी आणि व्यासांच्या कालानंतर तिसरी महान कृती मानून गुणाढ्याला व्यासांचा अवतार मानले आहे.  लोककथांचे महान संग्राहक गुणाढ्याचे असामान्य महत्त्व यामुळे सिद्ध होते.

      **  ‌ समाप्त**

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments