श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

महिनाअखेरचे पान – 4 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

बघता बघता नवीन वर्षाचा एक महिना संपत आला. हो, एप्रिल महिना संपत आला. आता म्हणाल, “मग नवीन वर्ष कसं?”

एप्रिल महिना हा काही इंग्रजी वर्षाचा पहिला महिना नाही. भारतीय कालगणनेनुसार चैत्र महिना हा वर्षाचा पहिला महिना असतो. चैत्र महिना हा एप्रिल च्या बरोबरीनेच सुरू होतो. दोन वेगळ्या कालगणना पद्धतीमुळे  थोडाफार फरक पडतो. पण चैत्र शुद्ध प्रतिपदेला हिंदु वर्षं सुरू होते ते याच महिन्यात. म्हणून नववर्षाचा एक महिना संपत आला असे म्हणणे फारसे चूक ठरत नाही. या पारंपारिकते बरोबर आधुनिक विचारानेही  हा नववर्षाचा पहिला महिना ठरतो. एप्रिल महिन्यापासून आपले नवे आर्थिक वर्ष सुरू होते. त्याचा हा पहिला महिनाच ना ? या आर्थिक नववर्षालाही विसरून चालणार नाही.

तसा हा एप्रिल महिना, वातावरण हळूहळू तापवत नेणारा असला तरी या महिन्यात येणार्या विविध कार्यक्रमांमुळे तो सुसह्य होतो. याच महिन्याची सुरवात विजयाचे प्रतीक असणार्या गुढीपाडव्याने होते. रामनवमी, दासनवमी, हनुमान जयंती, तुकडोजीमहाराज जयंती, महावीर जयंती हे सर्व या चैत्र महिन्यात येणारे दिवस. म. फुले जयंती आणि डाॅ. आंबेडकर जयंतीचा ही हा महिना. तर शिवछत्रपतींची पुण्यतिथीही याच चैत्र महिन्यात असते. गुडफ्रायडे हा प्रभू येशूच्या स्मरणाचा दिवस येतो तो याच एप्रिल महिन्यात.

राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही या महिन्याचे महत्व  आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवणारी भारताची मध्यवर्ती बॅंक म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक(RBI) 1935 साली एक एप्रिलला स्थापन झाली. शंभर वर्षांपूर्वी म्हणजे 05/04/1919 ला एस्. एस्. लाॅयल्टी हे वाफेवर चालणारे भारताचे स्वतःचे जहाज मुंबईहून इंग्लंडला रवाना झाले. त्या स्मृतीप्रित्यर्थ 5एप्रिल हा दिवस राष्ट्रीय सागरी दिन म्हणून साजरा केला जातो. 07 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन. जागतिक आरोग्य समस्या व विचार करण्यासाठी 07/04/1948ला जागतिक आरोग्य संमेलन भरवण्यात आले. तेव्हाच जागतिक आरोग्य संघटनेची(WHO)स्थापना झाली व 1950 पासून हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. 15 एप्रिल हा जागतिक कला दिवस, सर्व कलांना प्रोत्साहन देण्यासाठी साजरा होतो. 21एप्रिल हा भारतीय नागरी सेवा दिन आहे. याच दिवशी 1947 साली त्यावेळचे गृहमंत्री सरदार पटेल यांनी नागरी सेवकांना संबोधित केले होते. पर्यावरण विषयक कार्यक्रमांना पाठबळ देण्यासाठी

1970 पासून 22 एप्रिल हा दिवस जागतिक  वसुंधरा दिन म्हणून पाळला जातो. 23 एप्रिल हा विल्यम शेक्सपियरचा स्मृतीदिन   आंतरराष्ट्रीय पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. 24एप्रिलला भारतीय पंचायत राज दिन 2010पासून साजरा होतो. मलेरिया आजाराविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने

25एप्रिल हा जागतिक मलेरिया दिन म्हणून साजरा केला जातो. बॅले नृत्याचे आद्य संस्थापक जीन-जाॅर्जेस नोव्हेर यांचा जन्मदिवस 29 एप्रिल. नृत्यकलेचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी हा दिवस जागतिक नृत्य दिन या नावाने ओळखला जातो.

म्हणजे या एप्रिल महिन्याचे धार्मिक, पारंपारिक, सामाजिक, वैज्ञानिकदृष्ट्या व साहित्यदृष्ट्या महत्व आहे, वेगळेपणआहे. परंपरा, पर्यावरण, पुस्तक, कला अशा विविध प्रवाहांना एकत्र आणणारा हा एप्रिल महिना!

शिवाय वर उल्लेख केल्याप्रमाणे एप्रिल हा आर्थिक वर्षाचा पहिला महिना हे ही विसरून चालणार नाही. याच महिन्यात एका वर्षाचे आर्थिक नियोजन करावे लागते. हे एका वर्षाचे आर्थिक नियोजन आपले जीवन समृद्ध करू शकते. कारण एकदा संचय करण्याची सवय लागली की ती आयुष्यभर उपयुक्त ठरते. पूर्वजांनी म्हटलेच आहे, ‘संचयात् समृद्ध जीवनम्’. अर्थात धनसंचयाच्या वृत्तीमुळे जीवन समृद्ध होते. त्यामुळे ही सवय जितक्या कमी वयात लावून घेता येईल तितके चांगले. आपली मिळकत कितीही असो, आर्थिक नियोजन प्रत्येकाने केलेच पाहिजे. या वर्षी मी काय काय खरेदी करणार या बरोबरच मी किती बचत आणि गुंतवणूक करणार हे ठरवून त्याप्रमाणे वागले पाहिजे. बचत आणि गुंतवणूक यातील फरक समजून घेतला पाहिजे. आर्थिक नियोजन हे आपल्या कुटुंबासाठी व पर्यायाने समाजासाठी हितकारकच आहे. आर्थिक संकट पेलण्यासाठी स्वतःच्या पायावर उभे रहाण्याची तयारी सतत केली पाहिजे. हा एक नवा संस्कारच आहे असे समजून अशी सवय लावून घ्यायला काय हरकत आहे?तरच खर्या अर्थाने आनंदाची भक्कम गुढी उभारता येईल.

आणि हे सगळं अगदी खरं खरं आहे बर का ! एप्रिल फूल आजिबात नाही .

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments