श्री सुहास रघुनाथ पंडित
विविधा
☆ महिना अखेरचे पान – 8 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
पावसाचं ये जा चालूच आहे. आषाढात कोसळणारया पाऊस म्हणजे भरू लागलेली धरणे आणि मनात महापुराची भीति. पण हळुहळू हा जोर कमी होऊ लागतो. पुन्हा पाऊस आणि बघता बघता पाऊस गायब. हा लपंडाव म्हणजे श्रावण. म्हणजेच ऑगस्ट. श्रावण असो किंवा ऑगस्ट, दोन्ही दृष्टींनी हा महिना महत्वाचा. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील महत्वाच्या दोन घटना या महिन्यात घडल्या. एक म्हणजे नऊ ऑगस्ट! 1942 च्या या दिवशी स्वातंत्र्य लढ्याला एक वेगळे वळण मिळाले. ‘चले जाव’ च्या घोषणेने अवघा देश दुमदुमून निघाला. दुसरा महत्वाचा दिवस म्हणजे पंधरा ऑगस्ट. 1947 च्या या दिवशीच आपला देश स्वतंत्र झाला हे आपल्याला माहितच आहे. त्यामुळे हा ऑगस्ट महिना आपल्या सर्वांना खूप खूप महत्त्वाचा. या दोन महत्वाच्या दिवसांव्यतिरिक्त अन्यही काही दिवस महत्वाचे आहेत. एक ऑगस्ट हा मुस्लिम स्त्रिया हक्क दिन आहे. 1905 मध्ये बंगालाच्या फाळणीच्या विरोधात जी स्वदेशी चळवळ कलकत्त्यात सुरू झाली त्याची आठवण म्हणून सात ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतीचा दिवस वीस ऑगस्ट राष्ट्रीय सद्भावना दिवस म्हणून पाळला जातो. तर हाॅकीतील किमयागार मेजर ध्यानचंद यांच्या गौरवार्थ एकोणतीस ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा होतो.
या ऑगस्ट महिन्यात जागतिक स्तरावरील अनेक दिवसांचेही महत्व आहे. ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा फ्रेंडशीप डे आहे. आदिवासींचे अस्तित्व व त्यांची संस्कृती याकडे लक्ष वेधण्यासाठी नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. बारा ऑगस्ट जागतिक युवा दिन आहे. छायाचित्र कला व कलाकार यांच्या सन्मानार्थ एकोणीस ऑगस्ट हा जागतिक फोटोग्राफी व एकवीस ऑगस्ट हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो.
सहा ऑगस्ट आणि नऊ ऑगस्ट या दिवशी झालेल्या अणुबाँबच्या हल्ल्याच्या जखमांची आठवण करून देणारे दिवस म्हणजे अनुक्रमे हिरोशिमा दिन आणि नागासकी दिन. !
प्राण्यांचे रक्षण आणि वर्धन यांचे महत्त्व लक्षात आणून देणारे दिवस म्हणजे जागतिक सिंह दिन, हत्ती दिन आणि कुत्रा दीन. हे अनुक्रमे दहा, बारा आणि सव्वीस ऑगस्टला साजरे होतात.
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, दत्तभक्त टेंबेस्वामी, हुतात्मा राजगुरु, गोस्वामी तुलसीदास, महानुभाव पंथाचे श्री चक्रधरस्वामी या महान व्यक्तींच्या जन्माचा हा महिना. तर याच महिन्यात लोकमान्य टिळक, अहिल्याबाई होळकर, राजीव गांधी या राष्ट्रीय नेत्यांच्या जीवनप्रवासाची अखेर झाली. भगवान पार्श्वनाथ यांचा निर्वाण दिनही याच महिन्यातील.
या ऑगस्ट इतकाच महत्त्वाचा श्रावण महिना! एकीकडे निसर्गाची मुक्त उधळण तर दुसरीकडे सण, व्रतवैकल्यांची गडबड. रंग गंधाचे लावण्य अंगावर मिरवणारा मास. राखीपौर्णीमा साजरी करून भावाबहिणींचे नाते दृढ करणारा मास. नारळ वाहून समुद्राला शांत होण्याची विनंती करणा-या दर्यावर्दींचा मास. नागपंचमी, बैलपोळा यासारख्या कृषी संस्कृतीशी निगडीत असणा-या सणांचा महिना. मोहरमचे ताबूत नाचवणा-या मुस्लिमधर्मीयांचा मास. पारशी नूतन वर्ष, फरवर्दिन, याच महिन्यात सुरू होते.
आषाढात कोसळून कोसळून दमलेल्या पावसाला थोडीशी विश्रांती घ्यावीशी वाटत असावे. म्हणून तर श्रावणातल्या हलक्याफुलक्या सरी थांबून थांबून पडत असाव्यात. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने, श्रावणात निळा घन बरसून जाता जाता घनश्यामाची आठवण करून देत असतो. निसर्गातील आणि संस्कृतीतील वैभवाचे दर्शन घडवणारे साहित्य, काव्य, गीते यामुळे तर मनाची प्रसन्नता आणखीनच वाढत जाते. या प्रसन्न मनाने आपण सगळेच उत्सुक असतो मोरयाचे स्वागत करण्यासाठी!सुखकर्ता दुःखहर्ता अशा त्या गणरायाचे वेध लागलेले असताना, हवा हवासा वाटणारा श्रावण केव्हा निघून जातो, समजतही नाही. कालचक्राचे एक पाऊल मात्र पुढे पडतच असते.
© सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈