सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ माझ्या नजरेतून बदलती दुबई – भाग – १ ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

दुबईसंबंधी लिहिताना मला काही त्या देशाचा राजकीय, ऐतिहासिक किंवा सामाजिक विषय डोळ्यासमोर नाहीये, पण गेल्या दहा बारा वर्षात मी जशी बदलत गेलेली दुबई बघितली आहे, त्यासंबंधी थोडक्यात लिहावसं वाटतंय !

२००६ मध्ये माझ्या जावयांनी जेव्हा दुबईमध्ये एमिराईट्स एअरवेज जॉईन करायचे ठरवले तेव्हा ‘अरेच्चा, दुबई?’ अशी प्रश्नचिन्हांकित झाले होते मी ! कारण तोपर्यंत बरेच तरुण शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी अमेरिका, इंग्लंड, युरोप किंवा फार तर ऑस्ट्रेलियात जातात हेच माहिती ! पण अमेरिका, सिंगापूर खालोखाल ‘ एमिराईट्स एअरवेज’ अतिशय चांगली एअरवेज कंपनी आहे हे तेव्हा मला कळलं, आणि लगेचच त्यानंतर २००७ मध्ये आमची पहिली दुबई ट्रिप झाली !

तेव्हाचे दुबईचे वर्णन ‘दुबई मुंबई सारखीच आहे’ इतपतच माहीत होते. पण दुबईच्या एअरपोर्टवर प्रथम उतरल्यावर मनाला भावले ते येथील स्वच्छ, मोठे रस्ते आणि जागोजागी दिसणारे फुलांचे ताटवे, कारंजी ! इथे पाणी नाही अशी एक कल्पना होती, पण इथे तर पाण्याचा काहीच दुष्काळ नव्हता ! माझी मुलगी रहात होती तो ‘बर् दुबई’ भाग मुंबईसारखाच मध्यम उंचीच्या इमारतीने भरलेला असा होता. पहिल्या फेरीतच आम्ही दुबईचे मंदिर आणि म्युझियम पाहिले. दुबईमध्ये फिरताना लक्षात आले की  दुबईमध्ये शीख, गुजराथी, उत्तर प्रदेशी, तमिळ आणि केरळ या भागातील लोकांची संख्या जास्त प्रमाणात आहे. म्युझियममध्ये दुबईचा इतिहास कळला. साधारणपणे १९७० सालानंतर दुबई पृथ्वीच्या गोलावर ठळकपणे दिसू लागले. प्रथम टोळ्याटोळ्यांनी राहणाऱ्या लोकांनी कुवेत, शारजा, अबुधाबी, सौदी अशी छोटी छोटी मुस्लिम राज्य निर्माण केली ! तसेच हे दुबई ! दुबई,अबुधाबी,शारजा,अजमान,फुजेराह,रस् अल् खैमा,उमल् क्वेन, असे संयुक्त अमिरातीचे सात भाग आहेत. 

खाडी किनाऱ्यावर फिरल्यावर असे लक्षात आले की इथला व्यापार मोठ्या जहाजामार्फत चालत असे. मोती, मासे आणि मुख्य म्हणजे सोन्याची मुक्त बाजारपेठ यामुळे दुबई हे मोक्याचे ठिकाण होते. अनेक कन्स्ट्रक्शन कंपन्या येत असल्याने इंजिनियर्स आणि वर्कर्स दोन्हींचे येणे वाढले होते.

दुबईमध्ये पाणी मुबलक होते. लाईट कधी जात नसत. इन्फ्रास्ट्रक्चर चांगले होते आणि शिस्तबद्ध, सर्व सुख सोयींनी युक्त असे तेथील जीवन होते. अमेरिकेसारख्याच सुखसोई! पण येथे सर्वात विशेष काय होते तर कामाला, स्वयंपाकाला माणसे मिळत असत ! ते सौख्य अमेरिकेत महाग असते !

२००७ ते २०१० ही  तीन वर्षे आम्ही दुबईमध्ये दरवर्षी येत होतो, कारण माझा नातू तेव्हा लहान होता. मुलीचा जॉब होता, घरी कामाची बाई होती, तरीही घरचं माणूस आवश्यक वाटत असे.

त्यावेळी ‘ बुर्ज अल् अरब ‘ ही मोठ्या जहाजाच्या आकाराची बिल्डिंग समुद्रातच नव्याने बांधलेली होती. ती आम्हाला अर्थातच खूप आकर्षक वाटली. एस्केलेटर्स,मोठमोठे मॉल फिरताना खूप मजा वाटत होती.

२००८ च्या मुक्कामात मेट्रोचे काम जोरात चालू होते.९-९-२००९– मेट्रो चालू करण्याचा संकल्प खरोखरच त्यावर्षी पूर्ण झाला ! डिसेंबर ते फेब्रुवारी दुबई शॉपिंग फेस्टिवल असे. बऱ्याच जवळच्या देशातील लोक फिरायला, खरेदी करायला येथे येत असतात. त्या काळात रात्री साडेआठ वाजता क्रिकवर फायर फेस्टिवल होई. दिवाळीप्रमाणे तऱ्हेतऱ्हेचे, रंग रूपाचे फटाके साधारणपणे दोन तीन मिनिटं सलगपणे उडवले जात. त्यांचे रंग आणि पाण्यात पडणारे प्रतिबिंब दोन्हीही विलोभनीय दिसत असे !

तिथे असणाऱ्या काही मराठी कुटुंबांबरोबर मैत्री झाल्यामुळे आम्ही सर्वजण मिळून  ‘अलेन’ची ट्रीप केली. तेथील झू फारच प्रेक्षणीय होते. वाघ,सिंह,जिराफ,यासारखे प्राणीही, वाळवंटी प्रदेशात असूनही खूपच चांगले राखले होते.जबेल हफित अलेन मधील एक उंच डोंगर ! खूप उंच नव्हता, पण सपाट पसरलेल्या वाळवंटात तो  जास्त उंच वाटत होता.   एक दिवस ‘ गोल्ड सुक् ‘ पहायला गेलो. ते पहाणे म्हणजे डोळ्यांना सुख देणे असे वाटले !– तुळशीबागेसारखा मोठा बाजार ! दुतर्फा सोन्याने भरलेली दुकाने, सोन्याच्या माळा, मोठमोठे दागिने, आणि दारात उभे राहून बोलावणारे दुकानदार लोक! बघूनच डोळे तृप्त झाले. एवढे सोने तिथे दिसत होते पण आपल्या खिशातले पैसे तिथले काय खरेदी करू शकणार या विचारानेच आम्ही दृष्टी सुख घेऊन परत आलो. तिथून जवळच खास मसाल्याचा (स्पाइस सुक्) बाजार होता. तिथे मात्र लवंग, दालचिनी, मिरे, तमालपत्र  यासारख्या पदार्थांचे ढीग लागलेले होते. तसेच केशरही बऱ्यापैकी स्वस्त होते. आम्ही या पदार्थांची थोडीफार खरेदी केली.

— भाग पहिला 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments