सौ.ज्योत्स्ना तानवडे
☆ विविधा ☆ ? मैत्र फुलांची ओंजळ ?☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
आम्हा दोघा पती-पत्नींना माणसे जोडायची आवड आहे. याच ओढीतून पंधरा वर्षांपूर्वी आम्ही सांगलीत आमच्या घरी एका ग्रुपची स्थापना केली. सोमवारी जमतो म्हणून ‘सोमवार ग्रुप’. १२-१५ जणांचा हा ग्रुप ५० जणांचा कधी झाला हे कळलेच नाही. ज्ञान- विज्ञान- माहिती, छंद आवडीनिवडी, सुखदुःख, जिवाभावाचे सर्व काही एकमेकांशी वाटून घेत हा ग्रुप एक मोठे कुटुंब बनले आहे. आज आम्ही तिथून पुण्यात आलो तरी या ग्रुपशी नाळ घट्ट बांधलेली आहे. नित्य संवाद सुरू असतो.
काही वर्षांपूर्वी माझ्या मिस्टरांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या या ‘सोमवार ग्रुप’ साठी आम्ही एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाची रूपरेषा अशी काहीच ठरवलेली नव्हती. एकत्रित गप्पा सुरू होत्या. एका मैत्रिणीची बहीण आमच्या ग्रुपचा कार्यक्रम पाहायला आलेली होती. पुण्याची ही पाहुणी मैत्रीण सुरेल गायिका निघाली. तिने आग्रहाखातर गाणे म्हटले ‘ओवी आणि अभंगाने भुई सारी भिजे ‘, आणि पाहता पाहता सगळ्यांचा मूडच पालटला.
कोणीतरी ह्यांना मागच्या आठवणी विचारल्या. आमच्या लग्नाच्या संदर्भातील प्रश्नांनी मन भूतकाळात गेले. असंख्य आठवणींनी पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला. मैत्रिणींच्या चेष्टामस्करीला जोर चढला. जणू सगळ्यांच्यातच तरूणाईचे चैतन्य संचारले होते. आमच्या सदस्यांचा वयोगट साधारणपणे ३५ते ८२-८३ वर्षांचा आहे. जवळजवळ पंचवीस तीस जण हजर होते. हास्यविनोदात वय विसरून सर्व जण मन मोकळे झाले होते.
वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करण्यासाठी इतर गोष्टींबरोबरच प्रत्येकापाशी मुखावरचा निर्मळ आनंद आणि मनापासून भरपूर शुभेच्छा होत्या; ज्यामुळे खूपच भारावून जायला झाले. शेवटी मैत्री ही आयुष्यातील मोठी मिळकत असते. एका मैत्रिणीने तर आम्हा दोघांना दोन ओंजळी भरून अतिशय सुवासिक अशी तिच्या बागेतली जुईची फुले दिली. तिची ही सुगंधी भेट तर फारच अनमोल अशी होती. शेवटी मैत्रीत ‘देणं-घेणं’ काही नसतंच. असतो फक्त एकमेकांना आनंद वाटायचा. ह्या फुलांनी आम्हा सगळ्यांनाच खूप आनंद दिला. सारा हॉल सुवासाने भरून गेला. एका मैत्रिणीने एक छानशी कविता वाचली. या छोटेखानी कार्यक्रमाचा हा एक मनोहारी आनंद मेळावा झाला. आमच्यासाठी हा आयुष्यातील एक सुखद क्षण ठरला आणि याची सांगता झाली पाहुण्या मैत्रिणीच्या गाण्याने ” जीवनात ही घडी…… !”
खरोखरच ‘ही घडी’ मनात जपून ठेवावी अशीच होती. आपण आयुष्यात एकमेकांशी अनेक नात्यांनी बांधलेले असतो. पण त्यात मैत्रीचं नातं हे अतिशय मोलाचं असतं. हक्क-जबाबदाऱ्या यांच्या कसल्याही फूटपट्ट्या नसणारी निरपेक्ष मैत्री ही आयुष्यातील वाटचालीची शिदोरी असते. सर्व सुख-दु:खात, कठीण प्रसंगात, हास्यविनोदात साथ देते ती मैत्री. या मैत्रीमुळे ‘एकला चलो रे ‘चा एक तांडा बनतो. या मैत्रीच्या जोरावरच आपण आयुष्याची वाटचाल यशस्वीपणे करत असतो. अशी निखळ मैत्री ज्यांना लाभली ते खरोखरच भाग्यवान. या मैत्रीचा स्नेह सुगंध मनात सदैव दरवळत राहतो आणि आपली आयुष्य निश्चितच पुलकित होतात.
© सौ. ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈