सौ.वनिता संभाजी जांगळे
विविधा
☆ मन आणि सकारात्मक विचारांचा प्रभाव … ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆
आपले मन काय विचार करते याचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असतो. तसे पाहता मन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. जे दिसत नाही पण अस्तित्वात आहे ते आपले मन. आपल्या मनात सतत विचारांचा कल्लोळ चालूच असतो. मग हे विचार कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक असतात. आपल्यात तयार होणारी सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा ही मनातूनच उगम पावत असते. कोणत्याही कार्याचा शुभारंभ करण्यापूर्वी आपणास प्रथम आपल्या मनाची तयारी ठेवावी लागते. कोणतेही कार्य सिद्धीस नेण्यास प्रयत्नासोबत आपल्या मनाची भक्कम साथ हवी असते. लोक नकळतपणे बोलतात.. बघा .. ” मनात आले तर करेन, नाहीतर नाही करणार ”
आपले मन काय विचार करते याच्यावर आपले वागणे अवलंबून असते. मनात येणाऱ्या बऱ्या-वाईट विचारांवर आपली वर्तणुक ठरत असते. पण आपल्या मनास वाईट कृत्यांपासून परावृत्त करणे हे आपल्याच हातात असते. मन जर वाईट मार्गाने धावत असेल तर त्याला लगाम घालण्याचेही आपल्याच हाती असते. अर्थात अस्तित्वात नाही पण आपणासी संलग्न आहे अशा मनाचे दोर हे आपल्याच हाती असतात. आपणास जर स्वतःचे व्यक्तिमत्व सुसंस्कृत असे प्रभावी घडवायचे असेल तर मनाला ज्ञानाच्या मार्गाने वळवावे लागेल. आपले मन हे ज्ञानाने परिपूर्ण असले पाहिजे. ज्ञान हे चांगल्या विचारांचे उगम स्थान आहे.
आपण आपल्या विचारात सकारात्मकता ठेवली पाहिजे. त्याकरिता रोज सकाळी योग, प्रार्थना, अनेक चांगले विचार यांची मनाशी सांगड घातली पाहिजे. आपण सकाळी सकाळी जितका चांगला विचार करू तितक्या आनंदात आपले दिवस जातात. आपण पौष्टिक आहार घेऊन जसे शरीर तंदुरुस्त ठेवतो तसे चांगल्या विचारांचा नाश्ता रोज मनास भरवलाच पाहिजे. तेव्हाच आपले जीवन अतिसुंदर आणि निरोगी असेल. आपले मन हे सकारात्मक विचारांनी प्रफुल्लीत असावे. जसे सकारात्मक विचार हे आपणास आशावादी बनवतात, तसे नकारात्मक विचार आपल्याला नैराश्याकडे वाहून नेतात. आपल्या मनावर जर नकारात्मक विचारांचा प्रभाव जास्त असेल तर आपण कोणत्याच कार्यात यशस्वी होऊ शकणार नाही. इतकेच काय आपण जर मनाने दुबळे असू तर आजारी असताना कितीही चांगल्या प्रतीची औषध घेतली तरी बरे होणार नाही. आपण जेव्हा दवाखान्यात जातो तेव्हा डाॅक्टर म्हणत असतात, ‘ घाबरू नका. तुम्हाला या औषधामुळे बरे वाटेल.’ अर्थात डाॅक्टरसुध्दा प्रथम आपले मनोबल वाढवितात. निर्भय होऊन कोणत्याही संकटाचा सामना केला तर अर्धी लढाई आपण आपल्या मनाच्या तयारीवरच जिंकू शकतो.
आपण कोरोना काळाचा विचार केला तर हा काळ एखाद्या महायुद्धासारखाच होता. पण जे लोक मनाने निर्भय, सबल होते, त्यांनी न घाबरता कोरोनावर मात केली. आणि जे भयभीत झाले ते या रोगाचे बळी ठरले. ‘ मी उद्याचा सूर्य अत्यंत प्रसन्नतेने पहाणार आहे.’ असा विचार आपण रात्री झोपताना केला तर नक्कीच उद्याचा दिवस आपल्यासाठी प्रसन्नता घेऊन येतो. ‘ मी खरोखर सुखी आहे. माझे आयुष्य सुंदर आहे. मी निरोगी आहे. .माझे सर्व मित्र, नातेवाईक चांगले आहेत.’ .. अशी अनेक सकारात्मक वाक्ये आपण रोज आपल्या मनावर कोरली पाहिजेत. जणू आपणच आपल्या भविष्याला सकारात्मकतेचे आव्हान दिले पाहिजे. मी येणाऱ्या संकटावर मात करण्यास समर्थ आहे असा विचार करून स्वतःमध्ये सकारात्मक उर्जा तयार केली पाहिजे.
… अशा प्रकारे आपणाकडे सकारात्मक विचारांचे सुदृढ मन असेल तर आपण आयुष्य खूपच सोपेपणाने आणि सुंदर जगू शकू हे निश्चित.
© सौ.वनिता संभाजी जांगळे
जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा , जि. सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈