डाॅ. मीना श्रीवास्तव

? विविधा ?

☆ महाकवी कालिदास दिन- (आषाढस्य प्रथम दिवसे!) – भाग – 1 ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

नमस्कार प्रिय मैत्रांनो !

आज १९ जून २०२३, आजची तिथी आषाढ शुद्ध प्रतिपदा, अर्थात आषाढ महिन्याचा पहिला दिवस. आजचा दिवस साहित्य प्रेमींसाठी सुवर्ण दिन, कारण या दिवशी आपण साजरा करतो ‘कालिदास दिन’. मैत्रांनो, हा त्यांचा जन्मदिन अथवा स्मृती दिन नव्हे, कारण ते दिवस आपल्याला माहीतच नाहीत. मात्र त्यांची काव्यप्रतिभा एवढी उत्तुंग आहे की, आपण हा दिवस त्यांच्याच एक अजरामर खंडकाव्यातून शोधला आहे. कालिदास, संस्कृत भाषेचे महान सर्वश्रेष्ठ कवी आणि नाटककार! दुसऱ्या-पाचव्या शताब्दीतील गुप्त साम्राज्यकाळातील अनुपमेय साहित्यकार म्हणून त्यांना गौरवान्वित केलेले आहे. त्यांच्या काव्यप्रतिभेला अनुसरून त्यांना दिलेली “कविकुलगुरु” ही उपाधी स्वतःच अलंकृत आणि धन्य झाली आहे! संस्कृत साहित्याच्या रत्नमालेत त्यांचे साहित्य या मालेच्या मध्यभागी चमकत्या कौस्तुभ मण्याप्रमाणे जाणवते! पाश्चात्य आणि भारतीय, प्राचीन आणि अर्वाचीन विद्वानांच्या मते कालिदास हे जगन्मान्य, सर्वश्रेष्ठ व एकमेवाद्वितीय असे कवी आहेत! या साक्षात सरस्वतीपुत्राच्या बहुमुखी व बहुआयामी प्रज्ञेचे, प्रतिभेचे आणि मेधावी व्यक्तिमत्वाचे किती म्हणून गोडवे गावेत? कालिदास दिनाचे औचित्य साधत या अद्वितीय महाकवीच्या चरणी माझी शब्दकुसुमांजली ! 

सुज्ञ वाचकांनी यात कालिदासांच्या प्रती असलेली माझी केवळ आणि केवळ श्रद्धाच ध्यानात असू द्यावी. मात्र माझे मर्यादित शब्दभांडार, भावविश्व आणि संस्कृत भाषेचे अज्ञान, या सर्व अडसरांना पार करीत मी हा लेख लिहिण्याचे ठरवले. मित्रांनो, संस्कृत येत नसल्याने, मी कालिदासांच्या साहित्याचे मराठीतील अनुवाद (अनुसृष्टी) वाचलेत! त्यानेच मी इतके भारावून गेले. कालिदासांच्या महान साहित्याचे मूल्यांकन करण्यास नव्हे तर एक वाचक म्हणून रसास्वाद घेण्याच्या दृष्टीनेच हा लेख लिहीत आहे!   

या कविराजांच्या अत्युच्य दर्जाच्या साहित्याचे मूल्यमापन संख्यात्मक नव्हे तर गुणात्मक रित्याच केले पाहिजे. राष्ट्रीय चेतनेचा स्वर जागवण्याचे महान कार्य करणाऱ्या या कवीचा राष्ट्रीय नव्हे तर विश्वात्मक कवी म्हणूनच गौरव करायला हवा! अत्यंत विद्वान म्हणून गणले जाणाऱ्या त्यांच्या समकालीन साहित्यकारांनीच (उदा. बाणभट्ट) नव्हे, तर आजच्या काळातल्या जगभरातल्या साहित्यकारांनी देखील तो केलेला आहे! त्यांच्या जीवनाविषयी विशेष माहिती उपलब्ध नाही. त्यांच्या नांवावर असलेल्या अंदाजे ३० साहित्य निर्मितींपैकी ७ साहित्यकृती निश्चित रूपाने त्यांच्याच आहेत असे मानले जाते. असे काय वैशिष्ट्य आहे कालिदासांच्या सप्तचिरंजीवी साहित्य अपत्यांमध्ये, की पाश्चात्य साहित्यिक कालिदासांचे नामकरण “भारताचा शेक्सपियर” म्हणून करतात! मला तर असे प्रकर्षाने वाटते की, यात गौरव कालिदासांचा नाहीच, कारण ते सर्वकालीन, सर्वव्यापी व सर्वगुणातीत अशा अत्युच्य गौरवशिखरावर आधीच आरूढ आहेत, यात खरा गौरव आहे शेक्सपिअरचा, त्याची तुलना केली जातेय कुणाशी, तर कालिदासांशी!

या महान रचयित्याचे जीवन जाणून घ्यायचे असेल तर त्यांच्या साहित्याचं वारंवार वाचन करावे लागेल, कारण त्यांच्या जीवनाचे बरेच प्रसंग त्यांच्या साहित्यकृतींमध्ये उतरले आहेत, अशी मान्यता आहे. उदाहरण द्यायचे तर मेघदूत या खंडकाव्याचे, विरहाचे शाश्वत, सुंदर तथा जिवंत रूप म्हणून या काव्याकडे बघितले जाते, बरेच तज्ज्ञ मानतात की कल्पनाविलासाचे उच्चतम निकष ध्यानी धरूनही हे कल्पनातीत दूतकाव्य अनुभवाच्या अभावी रचणे केवळ अशक्य आहे. तसेच कालिदासांनी ज्या अचूकतेने विविध स्थळांचे आणि तिथल्या नगरांचे सविस्तर वर्णन केले आहे, ते ही त्यांचे त्या त्या ठिकाणी वास्तव्य असल्याशिवाय शक्य नाही. कालिदासांच्या सप्त कृतींनी संपूर्ण विश्वाला समग्र भारतदर्शन घडवले! उज्जयिनी नगरीचे वर्णन तर अगदी हुबेहूब, जणू चलचित्रासारखे! म्हणूनच बरेच विद्वान मानतात की कालिदासांचे वास्तव्य बऱ्याच कालावधीकरिता बहुतेक या ऐश्वर्यसंपन्न नगरीतच असावे! त्यांच्या रचना भारतातील पौराणिक कथा आणि दर्शनशास्त्रावर आधारित आहेत! यात तत्कालीन भारतीय जीवनाचे प्रतिबिंब दृष्टीस पडते, रघुवंशम् मध्ये इतिहास आणि भूगोल याविषयी त्यांचे प्रगाढ ज्ञान, त्यांच्या अगाध बुद्धिमत्तेचे आणि काव्यप्रतिभेचे द्योतक आहे यात शंकाच नाही. या भौगोलिक वर्णनासोबतच भारतातील पौराणिक, राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, दार्शनिक आणि वैज्ञानिक दृष्टी व ज्ञान, तसेच सामान्य तथा विशिष्ट व्यक्तींची जीवनशैली, या सर्वांचे यथोचित दर्शन त्यांच्या रचनांमध्ये आढळते.    

त्यांच्या काव्य आणि नाटकांतील भाषा आणि काव्यसौंदर्य काय वर्णावे? भाषासुंदरी तर त्यांची जणू आज्ञाधारक दासी! निसर्गाची विविध रूपे साकारणारे ऋतुसंहार हे काव्य तर निसर्गकाव्याचे अत्युच्य शिखरच जणू! त्यांच्या इतर साहित्यात त्या त्या अनुषंगाने प्राकृतिक सौंदर्याचे बहारदार वर्णन म्हणजे जणू कांही अद्भुत इंद्रधनुषी रंगांची उधळण, आपण त्यांत रंगून जायचे, कारण हे सगळे काव्यप्रकार वृत्तांच्या चौकटीत अवचित विराजमान झालेले, ओढून ताणून बसवलेले नव्हेत! 

हे अनवट साहित्य म्हणजे अलंकारयुक्त अन नादमधुर अश्या भाषेचा सुरम्य आविष्कार! एखादी सुंदर स्त्री जेव्हा अलंकारमंडित होते, तेव्हा कधी कधी असा प्रश्न पडतो की अलंकारांचे सौंदर्य त्या सौंदर्यवतीमुळे वर्धित झालंय, की तिचे सौंदर्य अलंकारांनी सजल्यामुळे आणिक खुललय! मित्रांनो कालिदास साहित्य वाचतांना हाच भ्रम निर्माण होतो! या महान कविराजांच्या सौंदर्यदृष्टीची किती म्हणून प्रशंसा करावी! त्यात काठोकाठ भरलेल्या अमृतकलशांसम नवरस तर आहेतच, पण विशेषकरून आहे शृंगाररस! स्त्री सौंदर्याचे लोभस लावण्यमय आविष्कार तर त्यांच्या काव्यात आणि नाटकात ठिकठिकाणी आढळतात! त्यांच्या नायिकाच अशा आहेत की त्यांचे सौंदर्य वर्णनातीत असेलही कदाचित, पण कालिदासासारखा शब्दप्रभू असेल तर त्याला अशक्य ते काय? मात्र या सौंदर्यवर्णनात तत्कालीन आदर्शवादी परंपरा आणि नैतिक मूल्यांचा कुठेही ऱ्हास झालेला नाही! अलंकारांच्या गर्दीत सर्वात उठून दिसणारा अलंकार म्हणजे उपमालंकार, त्या उपमा कशा तर, इतरांसाठी अनुपमेय! मात्र जोवर या महान संस्कृत भाषेतील रचना प्राकृत प्रांतीय भाषांत सामान्य जनांपर्यंत पोचत नाहीत, तोवर या विश्वात्मक कवीचे स्थान अखिल जगात शीर्ष असूनही आपल्याच देशात मात्र अपरिचितच राहणार! अर्थात या वाङ्मयाचे कैक भारतीय भाषांमध्ये अनुवाद (अनुसृष्टी) झालेले आहेत हे ही नसे थोडके !

मेघदूत (खंडकाव्य)

खंडकाव्यांच्या रत्नपेटिकेत विराजित कौस्तुभ मणी असलेल्या मेघदूत या कालिदासांच्या रचनेचा काव्यानंद म्हणजे स्वर्गातील सुमधुर यक्षगानच होय! असे मानले जाते की, महाकवी कालिदासांनी मेघदूत हे त्यांचे प्रसिद्ध खंडकाव्य रामगिरी पर्वतावर (आत्ताचे रामटेक) आषाढ मासाच्या प्रथम दिनी लिहायला प्रारंभ केला! त्यांच्या या काव्यातील दुसऱ्याच श्लोकात तीन शब्द आलेले आहेत, ते म्हणजे “आषाढस्य प्रथम दिवसे”! आषाढाच्या प्रथम दिवशी कालिदासांनी जेव्हा आकाशात संचार करणारे कृष्णमेघ पाहिले तेव्हाच त्यांनी आपल्या अद्भुत कल्पना विलासाचे एका काव्यात रूपांतर केले, हीच ती त्यांची अनन्य कृती “मेघदूत”! यौवनातील सहजसुंदर तारुण्यसुलभ तरल भावना आणि प्रियेचा विरह या प्रकाश आणि अंधाराच्या संधिकालाचे शब्दबद्ध रूप पाहतांना आपले मन हेलावून जाते.

अलका नगरीत यक्षांचा प्रमुख, एक यक्ष कुबेराला महादेवाच्या पूजेसाठी सकाळी उमललेली ताजी कमलपुष्पे देण्याचे काम रोज करत असतो. नवपरिणीत पत्नीबरोबर वेळ मिळावा म्हणुन तो यक्ष रात्रीच कमळे तोडून ठेवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी कुबेर पूजा करत असताना त्या उमलू लागलेल्या फुलात रात्री कोंडला गेलेला भुंगा कुबेराला डंख मारतो. क्रोधायमान झालेला कुबेर यक्षाला शाप देतो. यामुळे त्या यक्षाची व त्याच्या प्रियेची ताटातूट होते. हीच शापवाणी मेघदूत या अमर खंडकाव्याची निर्माती ठरली. यक्षाला भूमीवर रामगिरी येथे १ वर्ष अलकानगरीत राहणाऱ्या आपल्या पत्नीपासून दूर राहण्याची शिक्षा मिळते. शापामुळे त्याच्या सिद्धी नाश पावल्याने तो कोणत्याही प्रकारे पत्नीला भेटू शकत नाही. त्याच विरहव्यथेचे हे “विप्रलंभ शृंगाराचे कवन” आहे. कालिदासांच्या कल्पनेची भरारी म्हणजेच हे अजरामर नितांतसुंदर असे प्रथम “दूत काव्य” म्हणून रचले गेले! मग रामगिरीहून, जिथे सीतेची स्नानकुंडे आहेत, अशा पवित्र ठिकाणाहून अश्रु भरलेल्या नयनांनी यक्ष मेघापाशी निरोप देतो! मित्रांनो आता बघू या तो सुंदर श्लोक! 

– क्रमशः भाग पहिला 

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे, फोन नंबर – ९९२०१६७२११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments