डाॅ. मीना श्रीवास्तव

? विविधा ?

☆ महाकवी कालिदास दिन- (आषाढस्य प्रथम दिवसे!) – भाग -2 ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

(मग रामगिरीहून, जिथे सीतेची स्नानकुंडे आहेत, अशा पवित्र ठिकाणाहून अश्रु भरलेल्या नयनांनी यक्ष मेघापाशी निरोप देतो ! मित्रांनो आता बघू या तो सुंदर श्लोक !) इथून पुढे —-

तस्मिन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्त: स कामी,

नीत्वा मासान्कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठ: ।

आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्टसानुं,

वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ।

— अर्थात, आपल्या प्रिय पत्नीच्या वियोगाने दग्ध झालेल्या पीडित व अत्यंत व्यथित असल्यामुळे यक्षाच्या मणिबंधातील (मनगटातील) सुवर्णकंकण, तो देहाने क्षीण झाल्यामुळे शिथिल (ढिले) होऊन भूमीवर पडल्यामुळे, त्याचे मणिबंध सुने सुने दिसत होते! आषाढाच्या प्रथम दिनी त्याच्या दृष्टीस पडला तो एक कृष्णवर्णी मेघ! तो रामगिरी पर्वताच्या शिखराला कवेत घेऊन क्रीडा करीत होता, जणू एखादा हत्ती मातीच्या ढिगाऱ्याची माती उपटण्याचा खेळ करीत असतो. 

कालिदास स्मारक, रामटेक 

प्रिय मित्रांनो, हाच तो श्लोकातील जणू काही काव्यप्रतिभेचा तीन अक्षरी बीजमंत्र “आषाढस्य प्रथम दिवसे”! या मंत्राचे प्रणेते कालिदास यांच्या स्मृतीस अभिवादन करून प्रत्येक वर्षी आपण आषाढ महिन्याच्या प्रथम दिनी (आषाढ शुक्ल प्रतिपदा) कालिदास दिन साजरा करतो. ज्या रामगिरी (आत्ताचे रामटेक) पर्वतावर कालिदासांना हे काव्य स्फुरले, त्याच कालिदासांच्या स्मारकाला लोक भेट देतात, अखिल भारतात याच दिनी कालिदासमहोत्सव साजरा केल्या जातो! मंडळी, आपल्याला अभिमान वाटेल, असे महाराष्ट्रातील प्रथम कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक येथे स्थापन झाले. यंदा कालिदास दिन आहे १९ जूनला.

मित्रांनो, आधी सांगितल्याप्रमाणे यक्षाला आषाढाच्या प्रथम दिनी पर्वतशिखरांना लिप्त करून आलिंगन देणारा मेघ, क्रीडा करणाऱ्या प्रेक्षणीय हत्तीप्रमाणे दिसला. १२१ श्लोक (पूर्वार्ध म्हणजे पूर्वमेघ ६६ श्लोक आणि उत्तरार्ध म्हणजे उत्तरमेघ ५५ श्लोक) असलेले हे सकल खंडकाव्य फक्त आणि फक्त एकच वृत्त, मंदाक्रांता वृत्तात (ह्या वृत्ताचे प्रणेते स्वतः कालिदासच!) गेय काव्यात छंदबद्ध करणे ही प्रतिभा (आणि प्रतिमा नव्हे तर प्रत्यक्षात) केवळ आणि केवळ कालिदासांचीच!      

यक्ष आकाशातील मेघालाच आपला सखा समजून दूत बनवतो, त्याला रामगिरी ते अलकापुरीचा मार्ग सांगतो, आपल्या प्रियतमेचे विरहाने झालेले क्षतिग्रस्त शरीर इत्यादीचे वर्णन करून, मेघाला आपला संदेश त्याच्या प्रियतमेपर्यंत पोचवण्याची काकुळतेने विनंती करतो! मंडळी, यक्ष आहे जमिनीवर, पण पूर्वमेघात तो मेघाला प्रियतमेच्या अलकानगरीपर्यंत जाण्याचा मार्ग सांगतो, यात ९ प्रदेश, ६६ नगर, ८ पर्वत आणि १० नद्यांचे भौगोलिक असूनही विहंगम अन रमणीय वर्णन आले आहे. विदर्भातील रामगिरी येथून या मेघदूताचा हिमालयाच्या कुशीत वसलेल्या अलकानगरीपर्यंतचा प्रदीर्घ प्रवास यात वर्णन केला आहे. शेवटी कैलासाच्या कुशीत वसलेल्या अलकानगरीत मेघ पोचतो. या वर्णनात मेघाची प्रियतमा विद्युल्लता आपल्याला भेटते. उत्तर मेघ हा यक्षाने प्रेयसीला दिलेला संदेश आहे. प्रियेने विरहव्याधीमुळे प्राणत्याग करू नये आणि धीर धरावा, असा संदेश तो यक्ष मेघाकरवी पाठवतो. तिला तो मेघाद्वारे संदेश देतोय “आता शाप समाप्त व्हायला अवघे चार मासच उरले आहेत, मी कार्तिक मासात येतोच आहे”. काव्याच्या अंतिम श्लोकात हा यक्ष मेघाला म्हणतो, “तुझा मात्र तुझ्या प्रिय विद्युलतेशी कधीही वियोग न घडो!” असे हे यक्षाचे विरहगान आहे.  

मित्रांनो! स्टोरी काही विशेष नाही, आपण अरसिक पत्र लिहितो तेव्हा पोस्टल ऍड्रेस लिहितो, आत ख्यालीखुशालीच्या ४ ओळी! पण ऍड्रेस बिनचूक, विस्तृत अन आतला मजकूर रोमँटिक असल्यामुळे पोस्टखात्याला भावेल असा असेल तर मग पोस्टखाते पोस्टाचे तिकीट काढून त्या लेखकाला सन्मानित करेल की नाही! खालील पोस्टाचे सुंदर तिकीट हे कालिदासांच्या ऍड्रेस लिहिण्याच्या कौशल्याला केलेला दंडवतच समजा! या काळात कालिदास असते तर, तेच निर्विवादपणे या खात्याचे Brand Ambassador  राहिले असते! कालिदासांनी आपल्या अद्वितीय दूतकाव्यात दूत म्हणून अत्यंत विचारपूर्वक आषाढातील निर्जीव पण बाष्पयुक्त धूसर वर्णाच्या मेघाची निवड केलीय, कारण हा जलयुक्त मेघसखा रामगिरी ते अलकापुरी हा दीर्घ प्रवास करू शकेल याची त्याला खात्री आहे! शरदऋतूत मेघ रिताच असतो, शिवाय आषाढ महिन्यात संदेश पाठवला तर तो त्याच्या प्रियेपर्यंत शीघ्र पोचेल असे यक्षाला वाटले असावे!

(“आषाढस्य प्रथम दिवसे”- प्रहर वोरा, आलाप देसाई “सूर वर्षा”)

मंडळी, आषाढ मासाचा प्रथम दिन आणि कृष्णवर्णी, श्यामलतनु, जलनिधीने परिपूर्ण असा मेघ होतो संदेशदूत! पत्ता सांगणे आणि संदेश पोचवणे, बस, इतकीच शॉर्ट अँड स्वीट स्टोरी, पण कालिदासांचा परीसस्पर्श लाभला व हा आषाढमेघ अमर दूत झाला! रामगिरी ते अलकानगरी, मध्ये हॉल्ट उज्जयिनी (वाट वाकडी करून, कारण उज्जयिनी ही कालिदासांची अतिप्रिय रम्य नगरी!) असा मेघाला कसा प्रवास करावा लागेल, वाटेत कुठले माईल स्टोन्स असतील, त्याची विरहव्याकूळ पत्नी (अन मेघाची भावजय बरं का, no confusion!) दुःखात विव्हळ होऊन कशी अश्रुपात करीत असेल हे तो यक्ष मेघाला उत्कट आणि भावमधूर काव्यात सांगतोय! यानंतर संस्कृत साहित्यात दूतकाव्यांची जणू फॅशनच आली (त्यातील महत्वाचे म्हणजे नल-दमयंतीचे आख्यान), पण मेघदूत हा “या सम हाच” राहिला! प्रेमभावनांचा इंद्रधनुषी आविष्कार असणारे, वाचकाला यक्षाच्या विरहव्यथेत व्याकुळ करणारेच नाही तर आपल्या काव्यप्रतिभेने मंत्रमुग्ध करणारे “मेघदूत!’ म्हणूनच आषाढ मासाच्या प्रथम दिनी या काव्याचे आणि त्याच्या निर्मात्याचे स्मरण करणे अपरिहार्यच!

प्रिय वाचकांनो, आता कालिदासांच्या महान सप्त रचनांचा अत्यल्प परिचय करून देते! या साहित्यात ऋतुसंहार, कुमारसंभवम्, रघुवंशम् व मेघदूत या चार काव्यरचना आहेत, तसेच मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय व अभिज्ञान शाकुंतलम् या संस्कृतमधील तीन नाटक-वजा-महाकाव्ये आहेत!  

आचार्य विश्वनाथ म्हणतात “वाक्यं रसात्मकं काव्यम्” अर्थात रसयुक्त वाक्य म्हणजेच काव्य!

कालिदासांच्या काव्यरचना आहेत निव्वळ चार! (संख्या मोजायला एका हाताची बोटे पुरेत! 

रघुवंशम् (महाकाव्य)

हे महाकाव्य कालिदासांची सर्वोत्कृष्ट काव्यरचना मानली जाते! यात १९ सर्ग असून सूर्यवंशी राजांच्या दैदिप्यमान वंशावलीचे यात तेजस्वी वर्णन आहे. या वंशातील अनेक राजांचे, मुख्यतः  दिलीप, रघु, अज आणि दशरथ यांचे चरित्र  या महाकाव्यात चित्रित केले गेले आहे! सूर्यवंशी राजा दिलीपपासून तर श्रीराम आणि त्यांचे वंशज असे हे या काव्यातील अनेक नायक आहेत.

कुमारसंभवम् (महाकाव्य)

हे आहे कालिदासांचे प्रसिद्ध महाकाव्य! यात शिवपार्वती विवाह, कुमार कार्तिकेयाचा जन्म आणि त्याच्या द्वारे तारकासुराचा वध या प्रमुख कथा आहेत.

मेघदूत (खंडकाव्य)

या दूतकाव्याविषयी मी आधीच लिहिले आहे. 

ऋतुसंहार (खंडकाव्य)

ही कालिदासांची सर्वप्रथम रचना आहे, या गेयकाव्यात सहा सर्ग आहेत, ज्यांत षडऋतूंचे (ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर आणि वसंत) वर्णन आहे.

कालिदासांच्या नाट्यरचना आहेत निव्वळ तीन! (संख्या मोजायला एका हाताची बोटे पुरेत!)     

अभिज्ञानशाकुन्तलम् (नाटक)

या नाटकाविषयी काय म्हटले आहे बघा,”काव्येषु नाटकं रम्यं तत्र रम्या शकुन्तला” (कवितेच्या विविध रूपांत जर कुठले नाटक असेल, तर नाटकातील सर्वात अनुपमेय रम्य नाटक म्हणजे अभिज्ञानशाकुन्तलम्). महाकवी कालिदासांचे हे नाटक सर्वपरिचित आणि सुप्रसिद्ध आहे. महाभारताच्या आदिपर्वात वर्णित शकुंतलेच्या जीवनावर आधारित संस्कृत साहित्यातील सर्वश्रेष्ठ नाटक म्हणजे अभिज्ञानशाकुन्तलम्!

विक्रमोर्यवशियम् (नाटक)

महान कवी कालिदासांचे हे एक रोमांचक, रहस्यमय आणि चित्तथरारक कथानक असलेले ५ अंकी नाटक! यात कालिदासांनी राजा पुरुरवा आणि अप्सरा उर्वशी यांच्या प्रेमसंबंधाचे काव्यात्मक वर्णन केले आहे.

मालविकाग्निमित्र (नाटक)

कवी कालिदासांचे हे नाटक शुंगवंशाचा राजा अग्निमित्र आणि एका सेवकाची कन्या मालविका यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे. ही कालिदासांची प्रथम नाट्यकृती होय!

तर मैत्रांनो, ‘कालिदास दिना’ निमित्त या महान कविराजाला माझा पुनश्च साष्टांग प्रणिपात !

प्रणाम आणि धन्यवाद !     

— समाप्त — 

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे, फोन नंबर – ९९२०१६७२११

(टीप :  लेखात दिलेली माहिती लेखिकेचे आत्मानुभव आणि इंटरनेट वर उपलब्ध माहिती यांच्यावर आधारित आहे.)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments