सुश्री त्रिशला शहा
विविधा
☆ रंगभूमीवरील शिलेदारांची ‘शिलेदारी’ ☆ सुश्री त्रिशला शहा ☆
(संगीत रंगभूमी गाजवणारी गायिका अभिनेत्री आणि संगीत नाटकाला अवघ जीवन समर्पित करणारी गानसम्राज्ञी किर्ती शिलेदार यांचा जन्मदिवस नुकताच झाला. त्यानिमीत्त हा लेख)
मराठी रंगभूमीला खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस दिसले ते नटसम्राट बालगंधर्व आणि दिनानाथांच्या कसदार अभिनयाने आणि संगीत नाटकातील बहारदार गानशैलीमुळे. या दोन्ही नाट्यकर्मीं मुळे संगीत नाटकाला उत्तुंग शिखरावरील मानाचे स्थान मिळवता आले. बालगंधर्वांच्या तालमीत तयार होऊन त्यांच्याबरोबरीने संगीत नाटकात काम करणारे जयराम शिलेदार आणि जयमाला शिलेदार या व्दयींनी तर संगीत नाटकाला आपले आयुष्य वाहिले. मराठी रंगभूमी हिच आपली कर्मभूमी आणि हाच आपला देव मानून आपल संपुर्ण जीवन संगीत नाटकासाठीचं समर्पित केल.
लहानपणापासून जयराम शिलेदार यांना संगीताची आवड होती, त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी त्यांना गाणं शिकण्याची अनुमती दिली. गाणं शिकता शिकता अभिनयामधेही त्यांना आवड निर्माण झाली आणि बालगंधर्वांबरोबर त्यांना नाटकात काम करण्याची संधी मिळाली. याच दरम्यान त्यांची, नायिका म्हणून काम करणाऱ्या प्रमिला जाधव यांच्याशी त्यांची ओळख झाली,प्रमिला जाधव याही संगीतामधे प्रविण आणि अभिनयातही निपुण होत्या.जयराम शिलेदार आणि प्रमिला जाधव यांची संगीत नाटकातील वाटचाल अत्यंत यशस्वीपणे चालली होती. याच दरम्यान प्रमिला जाधव या जयमाला शिलेदार बनून जयराम शिलेदार यांच्या आयुष्याच्या जोडीदार बनल्या.
या नंतरच्या काळात दोघांच्याही संगीत नाटकाचा आलेख चढतचं गेला. लता आणि किर्ती अशा दोन गोंडस मुलींमुळे संसारही बहरत गेला. बालपणापासूनच कानावर पडणारे संगीत आणि रंगभूमीवरील आईवडिलांचा अभिनय पाहून नकळत त्यांच्याही मनावर याचा प्रभाव पडत गेला. दोघीही चार पाच वर्षाच्या असताना नाटकातील पात्रांच्या नकला करीत असत, ते पाहून जयराम शिलेदारांनी त्याना अभिनयाचे आणि जयमालाबाईंनी संगीताचे शिक्षण देण्यास सुरु केले.
अशा तालमीत तयार होऊन वयाच्या दहाव्या, बाराव्या वर्षी लता,किर्ती आणि त्यांचा भाऊ सुरेश यांनी ‘संगीत सौभद्र’चा प्रयोग रंगभूमीवर सादर केला. यानंतरची संगीत रंगभूमी, लता आणि किर्तीच्या अभिनयाने खूपचं गाजली. जयमाला बाईंनी अतिशय उत्तम अशी तयारी करुन घेतल्यामुळे संपूर्ण शिलेदार कुटूंबाच्या नाट्यप्रयोगाने संगीत रंगभूमीची भरभराट झाली. या आपल्या लहान लेकींचा संगीताचा प्रवास पाहून शिलेदार पतीपत्नी मनोमन सुखावले. बहिणाबाई चौधरी यांनी एका कवितेत म्हटले आहे,’ माझ्या गं लेकीला, काय देऊ खेळायला, सोन्याची सुपली देते,मोती देते घोळायला ‘ या कवितेप्रमाणे जयमालाबाई म्हणायच्या ‘माझ्या गं लेकींना, काय देऊ खेळायला, नाटकांची सुपली देते, सूर देते घोळायला.’ आणि खरोखरचं या शिलेदारांच्या दोघी लेकींनी नाटकाच्या सुपलीतून सूर अक्षरशः घोळले, खेळवले. सं. सौभद्र, सं. स्वयंवर, सं. मानापमान, एकचं प्याला, सुवर्णतुला, भावबंधन, सं. शारदा, संशयकल्लोळ द्रौपदी वस्त्रहरण अशी एकाहून एक सरस नाटक या शिलेदारांनी रंगमंचावर सादर करुन संगीत रंगभूमीचे भविष्य उज्वल केले. अतिशय उंची गाठणारा लताचा आवाज, थोडासा पुरुषी बाजाचा असल्यामुळे नाटकातील पुरुषप्रधान भूमिका ती करीत असे. तर अतिशय लिलया असा फिरणारा आवाज आणि अत्यंत उत्कृष्ट साभिनय सादरीकरणाने रसिकांच्या मनावर मोहिनी घालणारा किर्तीचा आवाज, यामुळे संगीत नाटकाला परत एकदा सोन्याचे दिवस आले. किर्ती शिलेदार यांच्या या संगीत नाटकाच्या अपुर्व कामगिरीमुळे त्यांना समोर ठेऊन ‘स्वरसम्राज्ञी’ हे संगीत नाटक लिहले गेले आणि किर्तीताईंनी या नाटकाचे अक्षरशः सोने केले. संपुर्ण भारतभर तसेच इंग्लंड, अमेरिका असे विदेशातही संगीत नाटक पोहोचविण्यात शिलेदार भगिनींचा मोठा वाटा आहे. किर्तीताईंचे नाट्यसंगीत आणि खुमासदार शैलीत केलेल दिप्ती भोगले(लता शिलेदार)यांच निवेदन अशा उत्कृष्ट कार्यक्रमाचे हजारो प्रयोग त्यांनी केले.संगीत नाटकाशिवाय किर्तीताई उत्तम प्रकारे तबला वाजवतात, अशा तबला आणि संगीतावर आधारित ‘ स्वर ताल शब्द संगती ‘नावाच पुस्तक किर्ती शिलेदार यांनी लिहले.अनेक पुरस्कारांच्या मानकरी असलेल्या किर्ती शिलेदार यांना २०१८ च्या ९८ व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्ष पदाचा मान मिळाला. दिल्लीमधील संगीत अकादमीच्या त्या सदस्य आहेत. अतिशय तन्मयतेने आयुष्यभर शिलेदार कुटूंबाने संगीत रंगभूमीची सेवा केली अस म्हणायला काही हरकत नाही.
काही काही नाट्यगीतांमुळे किर्तीताईंनी प्रेक्षकांना इतकी भुरळ घातली की त्यांच्या कोणत्याही मैफिलीत ही पद त्यांनी सादर करावीत अशी रसिकांची मागणी असायचीच. संगीत कान्होपात्रामधील ‘अवघाची संसार सुखाचा करीन’, सं. स्वयंवरमधील ‘एकला नयनाला विषय तो झाला ‘, नरवर कृष्णासमान’, स्वरसम्राज्ञीमधील ‘कशी केलीस माझी दैना’,अशी कितीतरी पद गाऊन त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केले.’ जोहार मायबाप जोहार ‘ या गाण्याशिवाय तर मैफिल पुर्णच होत नाही.
संगीत रंगभूमीची सेवा करीत असताना किर्तीताईंना अनेक चित्रपटांच्या आँफर आल्या,त्यांचा अभिनय पाहून भालजी पेंढारकर यांनी त्यांना छ.शिवाजी या चित्रपटात जिजाबाईंची भूमिका देऊ केली पण त्यांच मन संगीत रंगभूमीवर इतक जडलं होत की त्यांनी या गोष्टीला नकार दिला आणि आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून या दोघी बहिणी नाट्यजगतातच रमल्या. आयुष्यभर संगीत रंगभूमीचीच सेवा करीत आहेत. लता आणि किर्ती, दोघीही सध्या संगीताचे क्लास घेतातच शिवाय संगीतनाटक यावर किर्तीताई व्याख्यानेही देतात. तर अशीही रंगभूमीवरची शिलेदारांची बहरलेली ‘ शिलेदारी ‘
© सुश्री त्रिशला शहा
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈