सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? विविधा  

☆ रंगबावरा वसंत… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

आज सकाळी नेहमीसारखी फिरायला बाहेर पडले.नेहमीचा रस्ता,पण चालता चालता एकदम थांबले.माझं लक्ष बाजूच्या झाडाकडं गेलं. तर एरवी उदास वाटणाऱ्या या झाडाचा आजचा रुबाब बघितला.

हिरवट, पिवळ्या कळ्या फुलांची झुंबरे त्यावर लटकत होती. ही किमया कधी झाली असा प्रश्र्न पडला, तर शेजारचा गुलमोहर तसाच,कात टाकल्यासारखा. लाललाल लहानशा पाकळ्या आणि मध्ये शुभ्र मोती असे गुच्छ दिसू लागलेले. मला वाटलं लाजून लालेलाल झाला कि काय?

मग चटकन लक्षात आलं कि या तर ऋतुराजाच्या आगमनाच्या खुणा.

शहरी वातावरणात राहणारे आपण निसर्गाच्या या सौंदर्याच्या जादूला नक्कीच भुलतो. शिशिरातील पानगळीने,तलखीने सृष्टीचे निस्तेज उदालसेपण आता संपणार.कारण ही सृष्टी वासंतिक लावण्य लेऊन आता नववधू सारखी सजते.वसंत राजाच्या स्वागतात दंग होते.कोकिळ  आलापांवर आलाप घेत असतो.लाल चुटुक पालवी साऱ्या वृक्षवेलींवर  डुलत असते.उन्हात चमकताना जणू फुलांचे लाललाल मणी झळकत असल्यासारखे वाटते.चाफ्याच्या झाडांमधून शुभ्रधवल सौंदर्य उमलत असते.आजून जरा वेळ असतो, पण कळ्यांचे गुच्छ तर हळुहळू दिसायला लागतात.फुलझाडांची तर गंधवेडी स्पर्धाच सुरु असते.केशरी देठांची प्राजक्त फुले,जाई,जुई चमेली,मोगरा, मदनबाण,नेवाळी, सोनचाफा अगदी अहमहमिकेने गंधाची उधळण करत असतात.

या सुगंधी सौंदर्याला रंगांच्या सुरेख छटांनी बहार येते.फार कशाला घाणेरीची झुडपं.लाललाल आणि पिवळ्या,केशरी व पांढऱ्या, जांभळ्या आणि गुलाबी अशा विरुद्ध रंगांच्या छटांच्या फुलांनी लक्षवेधी ठरतात.

आपण हिला घाणेरी म्हणतो पण गुजरात,राजस्थान मध्ये या फुलांना “चुनडी”म्हणतात.त्यांचे कपडेही असेच चटकदार रंगांचे असतात.पळस,पांगारा रंगलेला असतो. हिरव्या रंगांच्या तर किती छटा.जणू त्याअनामिक चित्रकाराने मनापासून निसर्गदेवीला रंगगंधानी सजवले आहे.त्यासाठी नानाविध रंग आणि मदहोश सुगंधाच्या खाणीच खुल्या केलेल्या आहेत.

आंब्याची झाडे तर अतीव सुखातअसतात.फाल्गुनातील मोहोराचा गंध आणि त्यात लांब लांब देठांना लोंबणाऱ्या कैऱ्या उद्याचा “मधाळ ठेवा.”अगदी नारळा-पोफळीच्या झाडांना सुद्धा फुलं येतात.नखाएवढी फुलं एवढ्या मोठ्या नारळांची.

अगदी टणक पण हातात घेतली  कि त्याच्या इवल्याशा पाकळ्याही मृदू भासतात.पोफळीला फुटलेले इवल्याशा सुपाऱ्यांचे पाचूसम तकतकीत हिरवे लोंगर अगदी लोभस दिसतात.कडुलिंबाचा जांभळट पांढरा मोहोर तर गंधाने दरवळणारा. करंजाची झाडं सुद्धा नाजूक फुलांनी डंवरलेली.फणसाशिवाय हे वर्णनअपुरेहोईल.फणसाची झाडे सुद्धा टवटवीत दिसू लागतात.हळूहळू अगदी खालून वर पर्यंत इवलेसे फणस लटकलेले असतात. खरतर यादरम्यानउन्हंकडक.पणफुलायचा,गंधाळण्याचा या वृक्षलतांनी घेतलेला वसा पाहून मन थक्क होते.जांभूळही यात मागे नसतोच.

त्यातच कालपर्यंत शुकशुकाट असलेल्या झाडांवरलहान,मोठी,सुबक,बेढब,लांबोडकी,गोल घरटी दिसू लागतात.नव्या सृजनाची तयारी.वसंत ऋतू चैतन्याचा . कुणासाठी काहीतरी करण्याचा.नर पक्षी मादीला आकर्षित करण्याच्या खटपटीत.सुगरण पक्षी आपली कला घरटी बांधून प्रदर्शित करतात आणि मादीला आकर्षित करतात.काही नर पक्षी गातात, काही नाचतात. इकडं झाडं,वेली फुलोऱ्यात रंगून ऋतूराजा चे स्वागत करण्यात मश्गुल,साऱ्या सृष्टीतचहालचाली,लगबग.वसंत ऋतूचे हक्काचे महिने चैत्र, वैशाख. पण खरा तो रंगगंधानी न्हातो चैत्रात.कारण फुलांच्या, मोहोराच्या गोड सुगंधा बरोबर फळातील मधुरसही असतो.म्हणूनच हा मधुमास.निसर्गाचा मधुर आविष्कार. म्हणून तर चैत्र मास “मधुमास”होतो.

आता ऋतुपतीच्या आगमनासाठी सृष्टीचा कण न कण आतुरलेला.संयमाची सारी बंधने  निसर्ग राणी झुगारून देते.पक्षीगणांची सृजनासाठी आतुर,सहचरीची आर्जवे करणारे मधुरव, कोकिळ कंठातील मदमस्त ताना वातावरण धुंद करतात.

सजलेल्या,पुष्पालंकार ल्यायलेल्या गंधभऱ्या सृष्टीराणीच्या मोहात हा गंधवेडा,रंगबावरा वसंत पडला नाही तरच नवल.मग हा वसंतोत्सव पूर्ण वैशाख संपेपर्यंत रंगलेला असतो. निसर्गाचे हे बेबंद रुप, सौंदर्यासक्ती, कलाकारी खरंच थक्क करते.

गंधवेडा कि तू रंगबावरा|

ऋतुपती तू सदैव हसरा|

रत्युत्सुक रे मत्त मदभरा|

सृष्टीवेड्या रे जादुगारा||

 

आनंदाचा सुखमय ठेवा|

वाटत येशी तूची सर्वा|

फुलपंखी हा पर्णपिसारा|

फुलवित येशी चित्तचकोरा||

 

गंध उधळसी दाही दिशांना|

उजळत येशी दिशादिशांना|

धरतीच्या रे ह्रदय स्पंदना|

उत्सुक सारे तुझ्या दर्शना||

                

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments