डॉ गोपालकृष्ण गावडे
विविधा
☆ राष्ट्र मजबुतीचा संकल्प… भाग-3 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆
(देण्यातही खुप आनंद असतो याची मला प्रथमच प्रचीती आली.) — इथून पुढे —
माझे कर्तव्य पुर्ण झाले होते. आता याविषयी कुणाला काही बोलायची आवश्यकता नव्हती. मला हवा असणारा आनंद मला मिळाला होता. पण एका जवळच्या डॉक्टरांकडे आॕपरेशनसाठी गेल्यानंतर उरी चित्रपटाविषयी बोलता बोलता सर्व बोलून गेलो. त्या डॉक्टरांनी सुद्धा लगेच माझ्यासारखाच संकल्प केला. माझ्या संकल्पाने आणखी काही लोक प्रेरित होऊ शकतात याची जाणीव मला त्या दिवशी झाली. मग लाज बाजूला ठेवून ज्यांच्याकडे आॕपरेशनला जातो त्या प्रत्येक डॉक्टरला मी माझा संकल्प सांगितला. बहुतेक डॉक्टरांनी स्वतः हून National Defence Fund मध्ये दर वर्षी काही रक्कम भरण्याचा संकल्प केला.
आपला शत्रू ताकदवान आहे. माझा सैनिक मात्र जुन्या पुराण्या साधनांनी अशा शत्रूचा सामना करत आहे. उरी वा पुलवामा सारख्या भ्याड हल्ल्यांमुळे ते माझ्या सैन्याचे मनोबल तोडू शकणार नाहीत याची मला खात्री आहे. पण सैन्याच्या मागे जनता खंबीरपणे उभी आहे हे सैन्याला कळणे गरजेचे आहे. सर्व भारतीय आपल्या कामाचा प्रचंड आदर करतात हे प्रत्येक सैनिकाला कळणे गरजेचे आहे. सैनिक देशासाठी मोठा त्याग करतात. थोडाफार त्याग त्याचे देशबांधव त्याच्यासाठी करायला तयार आहेत हे प्रत्येक सैनिकापर्यंत पोहचले पाहिजे. त्यातून आपण करत असलेला त्याग वाया जात नाही अशी भावना सैनिकांमध्ये नक्कीच वाढीला लागेल. त्यांचे मनोबल नक्कीच वाढेल. पण त्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी पुढे येऊन NDF मध्ये दान करणे गरजेचे आहे. हा मेसेज सैनिकांपर्यंत पोहचवणेही गरजेचे आहे.
मग मी एक निर्णय घेतला. सोशल मेडियावर याच आशयाची एक पोस्ट तयार करून टाकली. शेवटी ‘NDF ला पैसे पाठवताना काही अडचणी आल्या तर मला फोन करा’ असा मेसेज टाकून खाली माझा नंबर दिला. पुढील एक दोन महिने मला महाराष्ट्रातील काना कोपऱ्यातून फोन येत होते. मी जवळपास हजार लोकांचे फोन घेतले.
आता फक्त रक्षाबंधनला सैनिकांना राख्या पाठवून वा स्वातंत्र्यदिनी सोशल मेडियावर देशभक्तीपर मेसेज पाठवून जनतेचे कर्तव्य संपणार नाही. सैनिकांना उच्च दर्जाचे बुलेटप्रुफ जॕकेट, हेल्मेट, रायफल्स आणि नाईट व्हिजन सारखे अत्याधुनिक साधने देण्याची गरज आहे. सरकार त्याच्या परीने काम करतच आहे. पण आपल्यालाही आपली जबाबदारी टाळता येणार नाही.
प्रत्येकाने दर महिन्यात सरासरी फक्त 100 रूपये बाजूला टाकले तर National Defence Fund मध्ये दर वर्षी कमीत कमी सव्वा लाख कोटी रुपये जमा होतील. आपल्या सैन्यदलांचे वार्षिक बजेट साडे चार लाख कोटी आहे. त्यातील बहुतेक पैसा सैनिक आणि अधिकाऱ्यांच्या पगारात जातो. लोकवर्गर्णीतून जमा पैशातून आपले सैनिक जगातील सर्वोत्तम युद्ध तंत्रज्ञान वापरू शकतील. आपल्या जवानांचे मनोबल वाढेल. शत्रूची आपल्या बलवान सैनिकांशी लढण्याची खुमखुमी आपोआप नष्ट होईल. शांततेतून स्थिरता, स्थिरतेतून व्यापार-उद्योग-गुंतवणूक वाढून आर्थिक सुबत्ता, आर्थिक सुबत्तेतून बलवान सेनादले आणि बलवान सेनादलातून पुन्हा शांतता स्थापित होईल.
सर्वात महत्वाचे म्हणजे ही प्रक्रिया थांबता कामा नये. ‘एकदा पैसे दिले म्हणजे संपले’ असे करता येणार नाही. भविष्यामध्ये स्थैर्य असावे म्हणून आपण जसे आयुष्यभर PF वा विम्यामध्ये गुंतवणूक करत असते तसेच देशात स्थैर्य रहाण्यासाठी सैन्यदलामध्ये गुंतवणूक करावी लागेल. कारण या स्थैर्यातूनच सुबत्ता येणार आहे आणि या सुबत्तेतून प्रत्येकाला त्याचा वाटा गुंतवणुकीच्या अनेक पटींमध्ये परत मिळणार आहे. हा फायद्याचा व्यवहार आहे.
कुणीतरी म्हणाले होते की “डोळ्यासाठी डोळा” या न्यायाने सर्व जग लवकरच आंधळे होईल. पण आपल्या डोळ्याकडे वाईट नजर ठेवायची कुणाची हिंमत होणार नाही इतके स्वतःला मजबुत केले तरच युद्ध टळतात हा आजवरचा इतिहास आहे. तुमची कमजोरी शत्रूची लढण्याची हिंमत आणि खुमखुमी वाढवते. पण राष्ट्र सैनिकदृष्ट्या प्रबळ असेल तर शत्रू उघड लढण्याचे धाडस सुद्धा करत नाही. अमेरिका आणि रशियातील शीतयुद्ध हे याचे ज्वलंत उदाहरण आहे.
“जे इतिहासाला विसरतात ते नष्ट होतात” हे त्रिकालबाधीत सत्य आहे. ते कुणी विसरता कामा नये. सोन्याचा धुर निघणारा देश सुदृढ सैन्यशक्ती अभावी गुलामगीरीत गेला तर भुके-कंगाल व्हायला वेळ लागत नाही. हजार वर्षांच्या गुलामगिरीत भारताला मोठे आर्थिक, सामाजिक, धार्मिक शोषण भोगवे लागले आहे. सामरीक दृष्ट्या कमजोर झालेल्या देशाच्या गुलामगीरीला वा शोषणाला त्या देशातील निद्रिस्त जनताच जबाबदार असते. कमजोर लोकांच्या प्राक्तनात गुलामगिरी तसेच आर्थिक आणि धार्मिक शोषणच लिहलेलेच असते. ते स्वतःच त्याला जबाबदार असतात.
चला तर मग, देशाची संरक्षण व्यवस्था मजबूत करण्याचा आज संकल्प करू या. दर महिन्याला थोडी रक्कम देशाच्या म्हणजे स्वतःच्या संरक्षणासाठी वेगळी काढून ठेवा. कुटुंबाच्या संरक्षणासाठी जसा विम्याचा हप्ता वेगळा ठेवता तसाच देशाच्या संरक्षणासाठी छोटा हप्ता दर महिन्याला बाजूला काढून ठेवा. वर्षाच्या शेवटी ही सर्व रक्कम National Defence Fund मध्ये जमा करा.
आपल्या गरजा आणि आणखीची हाव कधीच संपणार नाहीत. सर्व दुःखाच कारण हाव आहे असे कुठतरी वाचले होते. फक्त दानाने हाव कमी होऊ शकते असेही कुण्या महानुभवाने लिहून ठेवले आहे.
दान आणि त्यातही देशसेवेसाठी केलेले दान! यापेक्षा जास्त आनंद आणखी कशात मिळेल? आपण सर्व गोष्टी आनंदासाठी करतो. देशावर उपकार करण्यासाठी नाही तर स्वतःच्या आनंदासाठी प्रत्येकाने राष्ट्र मजबुतीचा संकल्प केलाच पाहिजे. गेली पाच वर्षे मी हा प्रचंड मोठा आनंद उपभोगतो आहे.
स्वातंत्र्यदिनी फक्त सोशल मीडियावर देशप्रेम दाखवण्याऐवजी लष्करासाठी काहीतरी भरीव करु या.
Ref : https://www.pmindia.gov.in/en/national-defence-fund/
प्रत्येक 15 आॕगस्टला या साईटवर जाऊन नेट बँकींग द्वारे वा NEFT करून जमेल तसे पैसे भरण्याचा संकल्प करा. NEFT केले तर त्याची माहिती [email protected] या email id वर मेल करा. आयकर सवलत मिळण्यासाठी ते लगेच तुम्हाला 80G ची पावती पाठवतात. या NDF मधील दानासाठी सरकारने 100% कर सवलत दिलेली आहे.
काही अडचण असेल तर तुम्ही NDF च्या 011 2301 0195 या नंबर वर फोन करू शकता.
केवळ स्मार्ट नागरिक राष्ट्र मजबूत करण्याला प्राधान्य देतात. त्यांना त्यांचे खरे हित कशात आहे हे कळते. चला तर मग, आपणही स्मार्ट होऊ या. या स्वातंत्र्यदिनी राष्ट्र मजबुतीचा संकल्प करू या.
– समाप्त –
© डॉ गोपालकृष्ण गावडे
सिटी फर्टिलिटी सेंटर, पाटिल हॉस्पिटल, सिंहगड रोड, पुणे
मो 9766325050
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈