प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी
विविधा
☆ रुद्र मंथन… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆
आयुष्य हे एक, न उलगडणार गुपित! हा कोष्टकाचा खेळ! सारीपाटाचा डाव! प्रत्येकाला खेळ मांडण्याची मुभा आहे. फासे टाकणे त्याच्या हातात असले तरी, नियतीचा डाव वेगळाच असतो. भगवान शंकर पार्वतीने निर्माण केलेला खेळ, आजतागायत चालू आहे. फक्त खेळणारे भिडू बदलत असतात. सारीपाट तोच आहे. हा खेळ ज्यांना जमला तो आणि ती रंगात गुंग होतात, रमुन जातात आणि येणाऱ्या पिढीला हा डाव सुपूर्द करतात. प्रारब्धाचे फासे ठरलेले असतात. खेळणाऱ्याला वाटतं आपण चांगल खेळत असतो. सारीपाटाला कट्टी असते (फुली मारलेली जागा ) त्यात एखादी सोंगटी गेली की तिला मारता येत नाही! ती बिनधास्त राहते. तसेच काही खेळाडू,कट्टीत राहून आयुष्याचा खेळ खेळतात. तस नियतीने बुहतेक ठरवलं असावं. काहींना खेळात सुंदर फासे पडतात, तर काहींना उलटे फासे पडतात. काहींचा डाव रडीचा असतो तर, काही जण खिलाडू वृत्तीने घेतात. प्रत्येकाला डाव खेळावाच लागतो. त्याशिवाय सुटका नाही. हे एक प्रकारचे युद्ध कौशल्यच म्हणावे लागेल.
सोंगट्या कोणत्याही रंगाच्या असोत, खेळाचे कौशल्य आणि तंत्र मंत्र अंगी सात करावे लागतात. काहीजण हा खेळ अर्धवट सोडून उठतात! खेळ म्हटल्यावर हार जीत पण स्वीकारवी लागतेच. त्याचे कडू गोड घोट पचवावे लागतात. खेळातील परिस्थिती कशी असेल सांगता येत नाही. त्या परिस्थितीला अनुसरून नाईलाजाने, फासे टाकावे लागतात. खेळात बाहेरचे कमी पण आतलेच शत्रू जास्त असतात. त्यांना सदैव सोबत घेऊनच हा बुद्धिबलाचा डाव आखावा लागतो.
काहीवेळा आयुष्य हे “समुद्र मंथन “आहे असच वाटतं! काळाचा वासुकी ( दोरी ) आयुष्याच्या मेरू पर्वताला गुंडाळून समुद्राला ढवळून काढतात. वासुकीच्या तोंडा कडील भाग हा पुरुषाकडे तर, शेपटीचा भाग स्त्रिया कडे! आयुष्याचे रुद्र मंथन करण्यात किती पिढ्या गेल्या हे त्या जगतपित्यालाच माहित! प्रत्येक जण हा सुख दुःखाचा खेळ खेळत जीवनाच सार्थक करून घेत असतात.
पण ह्या समुद्र मन्थनातुन सुख आणि दुःख ह्या खेरीज कोणतेही रत्न सापडत नाही. वेदना व्यथा ह्या सुखातूनच उत्पन्न होत असव्यात का ? हे न समजणारे कोडेच! प्रत्येक जण ह्या सुख दुःखाच्या विहिरीत उडी मारतोच! रुद्र मन्थनाचा हा खेळ अव्यांहत पणे चालू आहेच.
प्रकृती पुरुष हेच आदम ईव्ह वाटू लागतात. येथूनच आनंदाचे सफरचंद खाण्यात मशगुल होतात. भोग आणि उपभोग ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू ! स्त्री पुरुष म्हणजेच जग का ?
स्त्रियांच्या वाट्यालाच भोग आणि पुरुषांच्या वाट्याला उपभोग! हा कसला न्याय!
ही अशीच का सृष्टी रचना.
स्त्रियांचे दुःख स्त्रियानाच माहित. मग तो पुरुष स्त्री रोग तज्ञ डॉक्टर असला तरीही त्याला त्या वेदना कश्या कळणार! भोग उपभोगचे खेळ हे आनादी काळापासून चालू आहेत. वेदना व्यथा आहेत, म्हणून त्याला काळाचे मलम आहेच. प्रकृतीचा सोशिक पणा निसर्ग सृष्टीला मान्य होता, असं म्हणावे लागेल.
आजच्या युगात स्त्री शक्ती जागृत झाली, स्त्री शक्ती खूप पुढे गेली. प्रत्येक क्षेत्रात ह्या शक्तीने आघाडी घेतली व समाजाचा मनाचा केंद्रबिंदू झाली. तरीपण तिच्या वाट्याला आलेल दुःख सहजपणे पचवून पुढे जात राहिली.
असं असलं तरी स्त्री व पुरुष हे घटक एकमेकांना पूरक होत, काळाच्या यज्ञात समिधा अर्पण करीत हा जगण्याचा यज्ञ अखंड सुरूच ठेवला. हाच भातुकलीचा खेळ, सारी पाटात केव्हा रूपांतरीत होऊन, त्याच रुद्र मंथन कस झालं हे कळत पण नाही. आयुष्य हे असच असत का? सुख दुःख , हार जीत कुणाचीही होवो. हा जगण्याचा मंत्र सारी पाट डाव असो वा रुद्र मंथन हे कुणास चुकले आहे का ?
भातुकलीचा खेळ कसा मांडावा, सारी पाटात फासे कसे फेकावे, रुद्र मंथन हा आयुष्याचा आनंदाचा क्षण समुद्र मंथन नाही का वाटतं हा जगण्याचा यज्ञ त्यात पडणाऱ्या अहुत्या कळत न कळत काळाच्या पडद्या आड होत राहतात! हेच तर समाजाचे जगणे आहे देणे आहे.
© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी
ज्येष्ठ कवी लेखक
मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈