सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ रागावलेले पक्षी…  ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

लहानपणी पासून म्हणजे अगदी बाळ असल्यापासून आपले भावविश्व व परिचय होतो तो काऊ चिऊ यांच्याशी जोडलेले असते. अगदी एक घास काऊचा एक घास चिऊचा अशी सुरुवात होते. इथे इथे बस रे काऊ असे म्हणत काऊला हातावर बसण्यासाठी बोलावले जाते. आणि हे सगळे पशू पक्षी आपल्या आयुष्यात किती आवश्यक असतात हे मनावर ठसते. आणि मग या कावळ्याचा आपल्या आयुष्यात किती जवळचा व घनिष्ट वावर असतो ते लक्षात आले. या काऊचे बरेच प्रसंग अनुभवले आहेत. आणि त्यांच्या रागाचा तर चांगलाच प्रसाद मिळाला आहे.

आम्ही आमच्या नवीन घरात रहायला आल्यावर निसर्गरम्य परिसर, इकडे तिकडे फिरणारे विविध पक्षी यांचे फारच आकर्षण होते. आणि त्याचा किलबिलाट ऐकून खूप आनंद व्हायचा. मी हातावर धान्य घेऊन त्यांना भरवत असे. आणि त्याची चिमणी आणि इतर छोट्या पक्षांना चांगलीच सवय झाली होती. शनिवारी मात्र सकाळच्या शाळेमुळे हे शक्य व्हायचे नाही. आणि ते पक्षी सर्व प्रकारचा आरडा ओरडा करायचे. एका शनिवारी आमच्या ह्यांना वाटले आपण धान्य द्यावे. म्हणून ते हातावर धान्य घेऊन उभे राहिले, तर ते धान्य पक्ष्यांनी स्वीकारले नाही. उलट त्यांच्या हातावर चोची मारुन गेले.

एकदा आम्ही एका शेतातल्या घरी(फार्म हाऊस) वर गेलो होतो. आम्ही व्हरांड्यात बसलो होतो त्याच्या समोर एक झाड होते. त्यावर एक कावळा सतत येऊन ओरडायचा. आम्ही त्याच्याकडे इतके लक्ष दिले नाही. मग आम्ही फोटो काढण्यासाठी त्या झाडाजवळ गेलो. त्या वेळी तो कावळा जास्तच ओरडू लागला. पुन्हा आमच्या जागेवर जाऊन बसलो. नंतर तर तो इतक्या मोठ्या आवाजात चिडून आमच्या कडे बघून ओरडू लागला. थोड्या वेळाने तर तो स्वतःची पिसे उपटू लागला. थोडी चौकशी केल्यावर कळले, आम्ही बसलो होतो तेथे त्याच्यासाठी रोज धान्य व पाणी ठेवले जात होते. आम्ही तिथे बसल्यामुळे त्याच्यासाठी धान्य व पाणी दुसरीकडे ठेवले होते. ते त्याने अजिबात घेतले नव्हते.

आमच्या घरासमोर आम्ही अशोकाची झाडे लावली आहेत. त्यावर दरवर्षी अगदी शेंड्यावर कावळा घरटे बनवतो. त्यात कोकिळ पण आपले एखादे अंडे घालते. दोघांची अंडी उबवली जातात. कावळ्याची पिल्ले लवकर उडायला शिकतात. आणि त्या कोकिळेच्या पिल्लाला वाढवत असताना, उडायला शिकवत असताना, कावळा आमच्या डोक्यावर चोचीने मारतो आणि आम्हाला घरात जायची बंदी करुन टाकतो. आपण त्या पिल्लाकडे(कोकिळेच्या) पाहिले तरी अंगावर चाल करून येतो.

अशा विविध पक्ष्यांच्या व प्राण्यांच्या रागाचे, खोडकर पणाचे व त्यांच्या आनंदाचे अनुभव घेतले आहेत. आणि या भावना त्यांच्यात पण असतात फक्त ते त्यांच्या पद्धतीने व्यक्त करत असतात. ते आपण ओळखू शकलो तर आपल्याला पण खूप छान वाटते. आणि ही विविधता आनंद देते.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments