सौ. दीपा नारायण पुजारी
☆ विविधा ☆ लाखेच्या किड्याची शरीर रचना (भाग २) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆
आजच्या भागात जाणून घेऊया लाखेच्या किड्याची शरीर रचना. लाखेच्या किड्यात नरकिडा आणि मादी किडा अशी दोन लिंगे असतात. नर आणि मादी लाख किड्यांच्या बाह्य शरीर रचनेत, आकारमानात आणि काही अवयवांमध्ये फरक असतो. नर लाख किडा हा आकारान मोठा आणि लाल रंगाचा असतो. शरीराचे डोके, वक्ष आणि उदर असे भाग होतात. डोक्याला स्पर्शिकांची (जशा झुरळाला असतात.) एक जोडी आणि डोळ्यांची एक जोडी असते. या किड्याला मुखांगे (हे असे अवयव असतात जे अन्न ग्रहण करण्यास आवश्यक असतात.) नसतात. त्यामुळं हा नर लाख किडा खाऊ शकत नाही. वक्षाच्या खालील बाजूस तीन पायांच्या जोड्या असतात. पंख असतातच असं नाही. उदर हा शरीराचा सर्वात मोठा भाग असतो. उदराच्या पश्च टोकाला पुरुषांचे जननेंद्रिय असते. आता जाणून घेऊया मादी लाख किडा कोणती वैशिष्टे दाखवितो. मादी शरीराने लहान असते. तिच्याही डोक्याला स्पर्शिकांची एक जोडी असते. तशीच एक सोंडही असते. मादी लाख किड्याला डोळे नसतात. मादी लाख किड्याला पंख आणि पायही नसतात. यामागचं कारण ही तसंच मजेशीर आहे. मादी अळी एकदा एका जागी स्थिर झाली की मुळी सुद्धा हलत नाही. वापर न झाल्यामुळं तिचे पाय आणि पंख दोन्ही नष्ट होतात. युज अँड डिसयुज हे उत्क्रांतितत्त्व इथं सिद्ध झालेलं दिसतं. या मादी लाख किड्यापासून आपल्याला लाखेचं उत्पादन मिळते.
आता आपण लाखेच्या किड्याचे जीवनचक्र कसे असते हे बघू. या किड्याच्या जीवनचक्रात अनेक अवस्था दिसून येतात. जसं १ डिंभ, २ नर लाक्षाकोष्ठ, ३ मादी लाक्षाकोष्ठ, ४.पंखहीन प्रौढ नर, ५. पंखयुक्त प्रौढ नर, ६. प्रौढ मादी, ७. पक्व मादी लाक्षाकोष्ठ आणि ८. झाडाच्या फांद्या वरील लाखेचा थर.
सूक्ष्म, नावेसारख्या आकाराच्या लाल रंगाच्या डिंभापासून या किड्याच्या जीवनचक्रास सुरुवात होते. डिंभाची लांबी शून्य पॉइंट पाच मिमी. आणि रुंदी शून्य पॉइंट पंचवीस मिमी. असते. एक निकोप मादी तीनशे ते एक हजार डिंभांना जन्म देते. डिंभ ही स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी अवस्था असं म्हणता येईल. डिंभाचं प्रौढ किड्याशी साम्य नसते. (सोयीसाठी इथून पुढे डिंभाचा उल्लेख अळी असा केला आहे)ज्या झाडांवर या अळ्या वाढतात त्या; म्हणजेच आश्रयी वृक्षांच्या रसाळ, कोवळ्या डहाळ्यांवर त्या स्थिरावतातही. आपली सोंड सालीत खुपसून अन्नरस शोषून घेतात. त्या दाट रेझीनयुक्त द्रव स्त्रवतात. त्या स्त्रावाने त्यांचे शरीर आच्छादले जाते. हा स्त्राव अळ्यांच्या उपत्वचेखाली असणार्या ग्रंथींमधून स्त्रवला जातो. फक्त मुख, दोन श्वासरंध्रे, आणि गुदद्वार या भागांवर लाख स्त्रवणार्या ग्रंथी नसतात. अळी अशारितीने स्वत:च्या स्त्रावाने बनलेल्या कोष्ठाच्या आवरणामध्ये बंदिस्त होते. काही काळानं सर्व अळ्यांचा स्त्राव एकरुप होतो. त्यामुळं डहाळीवर एक टणक अखंड थर तयार होतो. (त्याच किड्यांचं जीवनचक्र पूर्ण झाल्यावर आणि पुढच्या पिढीतील डिंभ बाहेर पडण्यास सुरुवात होण्याच्या वेळेला डहाळ्या कापून घेतात, वाळवितात आणि लाख मिळवण्याची प्रक्रिया करतात.)
संकलन व लेखन
© सौ. दीपा नारायण पुजारी
इचलकरंजी
मो.नं. ९६६५६६९१४८
Email: [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈