सौ. दीपा नारायण पुजारी
☆ विविधा ☆ लाखेच्या किड्याचे जीवनचक्र (भाग २) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆
लाखेच्या अळीची कोष्ठावरणात वाढ होतच असते. कोष्ठावरण म्हणजे लाखेच्या अळीने स्वत:चा स्त्राव स्त्रवून स्वत: भोवती तयार केलेलं आवरण. ती मोठी होईल तसतसे कोष्ठाचे आकारमान वाढत जाते. प्रौढ दशा येईपर्यंत अळी तीन वेळा कात टाकते. अळी अवस्थेतील या तीन अवस्थांचा काळ हा तापमान, आद्रता तसेच आश्रयी वनस्पती यांवर अवलंबून असतो. या काळात किड्याचे लिंगही ओळखता येते. हा लिंगभेद पहिली कात टाकल्यावर जास्त ठळकपणे दिसतो.
नर अळीचा लाक्षाकोष्ठ सपाता किंवा खडावा सारखा असतो. दुसर्यांदा कात टाकल्यावर लगेचच मागच्या टोकाला झाकणासारखी वाढ दिसू लागते. यामुळे मागील टोक चादरीसारख्या आच्छादनाने झाकले जाते. पहिली कात टाकण्यापूर्वीची अवस्था म्हणजे पूर्व कोशावस्था आणि दुसरी कात टाकण्यापूर्वीची अवस्था म्हणजे कोशावस्था.या अवस्थांमध्ये अळी काही खात नाही. कोशावस्था पूर्ण झाल्यावर पंखहीन अथवा सपंख नर बाहेर पडतात. मागील टोकाकडील चादरी सारखं आवरण बाजूला रेटून त्या बाहेर येतात. यात पंखहीन नर संख्येने जास्त असतात. नर लाख किड्याचे आयुष्य केवळ बासष्ट ते ब्याण्णव तासच असते.
मादी डिंभ फुगीर ; नासपतीच्या फळासारखा किंवा गोल पिशवी सारख्या आकाराचा असतो. तिसर्यांदा कात टाकल्यावर मादी लैंगिकदृष्ट्या प्रौढ बनते. अशा मागील टोकाकडील चादरी सारखं आवरण बाजूला सारून बाहेर पडलेल्या मादीचा नराशी संयोग होतो.यासाठी नर लाख किडा मादी लाख किड्याच्या कोष्ठात शिरतो आणि मादीच्या शरीरात शुक्राणू सोडतो. मात्र लाख स्त्रवण्याची क्रिया मादी अजूनही चालूच ठेवते. किड्याच्या आकारमानाबरोबरच लाक्षाकोष्ठही झपाट्यानं वाढत जातो. मादीचा लाक्षाकोष्ठ नराच्या लाक्षाकोष्ठापेक्षा अनेक पटींनी मोठा असतो. अंडी घालून होईपर्यंत मादी लाख स्त्रवत असते. अफलित मादीसुध्दा फलित मादी सारखीच लाख स्त्रवते तसेच जननक्षम प्रजा देखील निर्माण करु शकते.
अंडी अजून मादीच्या अंडाशयात असतानाच त्यांची वाढ होऊ लागते. ही अंडी मादी लाक्षाकोष्ठातील विशिष्ट कप्प्यांत घातली जातात. या कप्प्यांमध्येच अंडी ऊबवली जातात. अंडी ऊबवल्यानंतर अंड्यातून अळी बाहेर पडते. याच अळीला डिंभ म्हणूनही ओळखतात. डिंभ झाडाच्या कोवळ्या फांद्याकडं कूच करतात.तिथं आपली सोंड आत खुपसून स्थिरावतात आणि पुढील जीवनचक्र सुरु राहते.
संकलन व लेखन
© सौ. दीपा नारायण पुजारी
इचलकरंजी
मो.नं. ९६६५६६९१४८
Email: [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈