श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ विविधा ☆ लोकसाहित्य – हावशा भ्रतार ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆ 

बाळाचं कौतुक आईनं जसं भरभरून केलय, तसच आपल्या हावशा भ्रताराचं गुणवर्णनही . तिने आसासून केलय. आपला भ्रतार म्हणजे देवाचा अवतार असल्याचं ती सांगते. त्याचा चांगुलपणा, त्याचं सामर्थ्य, त्याचं प्रेम आणि तिची त्याच्यावरची निष्ठा, भक्ती सगळं काही त्याला ‘देव’ म्हणण्यातून ती सुचवते.

‘काई सरलं ग दळईन…. माझ्या सुपात पानविडा… देव ग अवतार माझा जोडा’ कुठे ती त्याला ‘देव’ म्हणते, तर कुठे ‘ बाजीराव’ ती म्हणते, ‘पिवळा पितांबर मला पुशितो सारा गाव… पिता दौलत राजस म्या ग लुटीला बाजीराव.’ ‘पितांबर’ म्हणताना तिला ऊंची, गर्भारेशमी लोकांच्या नजरेत भरेलसे वस्त्र आपण नेसलो आहोत, इतके सुचवायचे आहे. म्हणून तर सारा गाव तिला विचारतो आहे. ते वस्त्र नेसण्याची तिची ऐपत आहे. कारण तिचा राजस पिता श्रीमंत आहे. त्यामुळे की काय ‘बाजीराव’ पती तिने सहज मिळवला आहे. पतीला ‘बाजीराव’ म्हणताना तिला त्याचा रुबाब, सामर्थ्य, संपन्नता असं सगळं सुचवायचं आहे.

आपल्या कर्तृत्ववान पतीच्या ताकदीचं वर्णन करताना ती सांगते. शिवार पिकलं, धान्याच्या गोण्या गाडीत भरल्या आणि आपल्या भ्रताराने त्या दंडभुजांनी रेटल्या. अगदी असंच वर्णन तिने आपल्या भावाचंही केलं आहे.

या रूपवान बाईकडे कुणी वाकड्या नजरेने पाहीलं तर… ते बजावते, वाटेच्या वाटसरा आल्या वाटेने तू निमूट चालू लाग. कारण माझा कंथ आहे, जंगलात वाघाच्या दाढा मोजणारा. अशाच एका ओवीत नागालाही तिने असंच बजावलय. बहुतेक ओव्यातून नागाचा उल्लेख भाऊ म्हणून आलाय. पण क्वचित काही ठिकाणी तो परपुरुष म्हणूनही येतो. नाग हे पुरूषतत्वाचं प्रतीक मानलं जातं, त्यामुळे क्वचित  कुठे अशाही ओव्या दिसतात. आपल्या भ्रतार्‍याच्या सामर्थ्याची कल्पना देणार्‍या अनेक ओव्या स्त्रियांनी गायल्या आहेत.

अशा या सामर्थ्यशाली , कर्तृत्ववान , देवाचाच अवतार आहेसं वाटणार्‍या आपल्या पतीच्या राज्यात आपल्याला काहीच कमी नाही, हे सांगताना ती म्हणते, काई माळ्याच्या गं मळ्यामंदी पान गं मळ्याला पायइरी… हौशा गं कंथाच्या जीवावरी दुनिया भरली दुईईरी’ असं ती कौतुकानं, अभिमानानं संगते. उदंड भोगायला भ्रताराचंच राज्य, हे सांगताना आणखी एक वास्तव ती सांगून जाते.

‘काई पुतबीगराच राज… राज गं डोळ्यांनी बघायला … भोळ्या गं  भ्रताराबीराचं राज … राज गं उदंड भोगायाला.’ मग कधी ती त्याच्याकडे लाडिक हट्ट धरते, ‘काई धाकटं गं माझं घर… हंड्या ग भांड्याचा पसाईरा … हौशा गं कंथाला किती सांगू … वाडा ग बांधावा दुसईरा.’ कंथ हवशा आहे आणि दुसरा वाडा बांधावा अशी समृद्धीही आहे, असं सगळच  ती त्यातून सुचवते.

बाळाबद्दल असो, नवर्‍याबद्दल असो, किंवा मग भावाबद्दल, गाणारी नारी आपल्या नेहमीच्या परिचयातली उदाहरणे, दाखले देते. त्यात आंब्याचं झाड त्याची सावली येते. कधी सीताफळ येतं, तर कधी ब्रिंदावनासारख्या कडू फळाचा दाखलाही येतो.

‘भरतार नव्हं गोड आंब्याची सावली…. आठवली नाही परदेशाला माऊली.’ भ्रताराच्या सहवासात आईसुद्धा विसरली, असं ती तृप्त मनाने म्हणते. कधी त्याच्या सावलीत ऊन–वारासुद्धा गोड लागत आसल्याचं सांगते.

कधी भ्रतार गोड आंब्याची सावली आहे, असं ती म्हणते, तर कधी तो संतापी असल्याचंही सांगते. त्याचा संताप कसा, इंगल्या इस्तवावानी म्हणजे चुलीतल्या निखार्‍यासारखा. किंवा मग आधानाच्या पाण्यासाखा. पण आपण गोड हसून बोलून त्या आधानाच्या पाण्यात विसावण घालतो, असं ती सांगते. म्हणजे तिच्याजवळ हीही चतुराई आहे तर. कधी ती त्याला सीताफळाची उपमा देते. सीताफळ कसं वरून खडबडीत दिसतं, पण त्याच्या आत साखरेची काया असते, तसच वरून खडबडीत वाटणार्‍या भ्रताराच्या पोटात माया आहे, असं तिला वाटतं.

सगळ्याच जणी मात्र अशा नशीबवान नसतात. त्यांके नवरे रुबाबदार, ताकदवान, सामर्थ्यशाली , कर्तृत्ववान नसतात. तरीहे ती आपला पत्नीधर्म निभावते. ’दुबळ्या ग भरताराची सेवा करिते आदरान… पाय पुशिते पदरान. का बरं? कारण ‘काई हळदीवरलं कुंकू … सोनं दिल्यानं मिळना.’ हे तिला माहीत आहे.

पत्नी जितकी आसासून प्रेम करते, सगळ्यांचेच नवरे तितक्याच उत्कटतेने आपल्या बायकोवर प्रेम करतात असं नाही.

मग ती कष्टी होत म्हणते, ‘जीवाला जीव देऊन पहिला। पाण्यातला गोता अंती कोरडा राहिला।‘

कुणाचा नवरा दुबळा असतो. कुणाचा फसवाही निघतो. मग विरस झालेली एखादी मनाशी किंवा जनातही म्हणते,

‘कावळ्यानं कोटं केलं बाभुळवनामंदी… पुरुषाला माया थोडी नारी उमंज मनामंदी।‘ कधी भोळेपणाचा आव आणत ती म्हणते,

कडू बृंदावन। डोंगरी त्याचा राहावा। पुरुषाचा कावा। मला येडीला काय ठावा।‘ बृंदावन हे एक फळ आहे. वरून दिसायला मोहक पण आतून कडू जहर. कधी ती याहीपेक्षा तिखटपणे  म्हणते, ‘माऊलीच्या पोटी लेक जन्मला तरवड । लोकाच्या लेकराची त्याने मांडली परवड।‘ सासू चांगली आहे, म्हणून तिच्यासाठी ती ‘माऊली’ शब्द वापरते. पण तिच्यापोटी हे काटेरी झाड कसण निपजलं म्हणून आश्चर्य आणि खंतही  व्यक्त करते.

भ्रताराबद्दलच्या भाव – भावनांचे असे विविध रंगी इंद्रधनुष्य दळता-कांडतांना गायलेल्या ओव्यातून प्रकट झाले आहे.

क्रमश:  पुढील लेखात ताईता बंधुराजा

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments