सौ. दीपा नारायण पुजारी
विविधा
☆ लाडकी बाहुली… ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆
लहानमोठ्या सगळ्या माणसांना खेळायला आवडतं. खेळ म्हणजे मनोरंजन किंवा शारीरिक व्यायामासाठी केली जाणारी कोणतीही क्रीडा, कोणतीही ऍक्टव्हिटी. खेळणं ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. खेळांना मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान आहे.खेळ आपल्याला व्यथा, चिंता विसरायला लावतात. खेळांमुळे विरंगुळा मिळतो. शरीर आणि मन ताजेतवाने होते. मैदानी खेळांचे फायदे तर पुष्कळ आहेत. कब्बडी, खो खो सारख्या खेळांमुळे भरपूर व्यायाम होतो, शरीर बळकट,काटक बनते. चिकाटी, दमदारपणा, खिलाडूवृत्ती असे अनेक गुण वाढीस लागतात.
आजच्या जेष्ठ नागरिकांना त्यांच्या लहानपणी भरपूर खेळायला मिळालं. अभ्यास कमी आणि खेळ दंगा जास्त. खरंखुरं निरागस, बिनधास्त बालपण या पिढीनं अनुभवलं. आधुनिक खेळ, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स या पासून अनभिज्ञ राहिलेली ही मुलं छोट्या छोट्या गोष्टीत रममाण होत असत. गोट्या, विटीदांडू, भिंगऱ्या, भोवरे,लगोऱ्या असे खेळ खेळत ही मुलं मोठी झाली. सूरपारंब्या, मामाचं पत्र हरवलं, लपंडाव अशा खेळांना वेगळं साहित्य लागत नसे. पैसे तर बिल्कुल लागत नसत. लागत असे फक्त खेळण्याची, सवंगड्यांची ओढ. या खेळांनी ही पिढी शारीरिक दृष्ट्या सुदृढ आणि मानसिक दृष्ट्या सक्षम झाली. हातात महागडे खेळ नसतानाही आनंद लुटायला शिकली. या पिढीला बडबडगीतांनी, बालकथा, बालगाणी यांनीही समृद्ध केलं. राजाराणीच्या गोष्टीत रमली. ऐतिहासिक, पौराणिक कथा, इसापनीतीच्या बोधकथांनी संस्कारित झाली. आजी आजोबांचं बोट धरून, प्रवचन किर्तनातून, ज्ञानोबा तुकोबाची अभंगवाणी शिकली. घरात बोलायला इतकी माणसं असत की टॉकिंग टॉमची गरज भासत नसे. या मुलींच्या बाहुल्या अबोल होत्या.तरीही भावला भावलींचं लुटूपुटूच्या लग्नात अख्खं घरदार खेळे . चिंध्यांची बाहुली, चिंध्यांचाच बाहुला, पण त्यांना नटवण्यात कल्पकता वापरली जाई. हलू न शकणाऱ्या, बोलू न शकणाऱ्या या बाहुल्या, या ठका, ठकी सगळ्या आळीला बोलकं करत.
‘लाडकी बाहुली होती माझी एक ‘ या कवितेत कवयित्री इंदिरा संतांनी बाहुली हरवली म्हणून झुरणाऱ्या मुलीचं केलेलं वर्णन अविस्मरणीय आहे. खेळायला दिलेली लाडकी बाहुली . . . . बाहुली हरवली म्हणून हिरमुसलेली बालिका, दुसऱ्या कितीही बाहुल्या जवळ असल्या तरी तीच बाहुली हवी , यासाठी झुरणारी बालिका डोळ्यासमोर येते.. माळावर खेळणाऱ्या मैत्रिणी, गवत, पाऊस हे सगळं आज दुर्लभ झालंय. पावसात भिजून खराब झालेली, गायीनं तुडवल्यामुळं आकार बिघडलेली, केसांच्या झिपऱ्या झालेली तीच बाहुली त्या बालिकेला प्रिय आहे हे सांगणारी. .
‘परी आवडली ती तशीच मजला राणी ‘
ही ओळ खूप काही सांगून जाते. आजकालच्या युझ ऍन्ड थ्रो च्या जमान्यात रोज नवा हट्ट, नवा खाऊ, नवं खेळणं, नवे कपडे असा बालहट्ट सहज पुरवला जातो. मोकळ्या मनानं, मोकळ्या मैदानात, मनसोक्त दंगामस्ती करायच्या वयात आजचे किड्स एसीत बसून फक्त अंगठ्याचा व्यायाम करताना दिसतात.ही पिढी उत्क्रांतीच्या नियमानुसार आधीच्या पिढीपेक्षा नक्कीच जास्त हुशार आहे, कुशल आहे. पण टेक्नॉलॉजीच्या जटील जाळ्यात अडकली आहे. टेक्नॉलॉजी वाईट नक्कीच नाही. पण तिचा उपयोग गरजे पुरताच, मर्यादीत स्वरूपातच केला पाहिजे,हे सांगायला जुन्या पिढीनं सरसावलं पाहिजे, गदिमांच्या नाचणाऱ्या मोराला घेऊन, इंदिरा संतांच्या लाडक्या भावलीला घेऊन, गवतफुला बरोबर वाऱ्यावर डोलत, माळावर पतंग उडवत, झुकझुक गाडीत बसून खंडाळ्याच्या घाटातून, निसर्गाच्या कुशीत नव्या पिढीला हळूच घेऊन जायला हवं.
© सौ. दीपा नारायण पुजारी
इचलकरंजी
9665669148
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈