श्री संभाजी बबन गायके
विविधा
☆ लोकल हैं भाई ! इधरकेही हैं ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
लोकल हैं भाई ! इधरकेही हैं !
अंधेरी रातों में.. सुनसान राहोंपर कुणी मसीहा निकले ना निकले… पण या ठिकाणी खरे शहेनशाह असतात ती ही मंडळी ! (या वाक्यातील अंधेरीचा मुंबईतील अंधेरीशी काहीही संबंध नाही.) तर… ही मंडळी चतुष्पाद वर्गातील आणि केनाईन प्रकारातील असतात. आता कुणी केनाईन (म्हणजे फ्रेंच-इंग्लिश भाषेतील कुत्रा हा शब्द) ला K-9 असं समजू आणि लिहू शकत असेल तर त्याला आपण काय करणार?
लहानपणी तमाम बालकवर्ग यांना भूभू या संबोधनाने ओळखातो… पण हा भूभू जेंव्हा भोभो करीत मागे लागतो तेंव्हा बालकांची बोबडी वळते, हेही खरेच. पुल्लींगी कुत्रा म्हणजे एक कुत्रा. आणि स्त्रीलिंगी कुत्री. अनेकवचन कुत्रे असे असतात. पण अनेक कुत्री असा अर्थ प्रचलित आहे. फार वेगळ्या अर्थाने, विशेषत: महिला वर्गात ‘कुत्री’ हा एकवचनी अपशब्द वापरात आहे. परेश रावलांच्या तोंडी ‘कुत-या’ ही शिवी तर सिनेरसिकांना अत्यंत गोड लागते. खरं तर हिंदीवाले कुत्र्या हा शब्द कुतरीया असा उच्चारतात. असो.
श्वान मानवाच्या जवळ आले आणि अगदी घरचे झाले त्याला खूप वर्षांचा इतिहास आहे. इथे श्वानप्रेमी आणि श्वानविरोधक असा विषय काढला तर खूपच लिहावे लागेल.. म्हणून थांबतो. पण भटके कुत्रे हा एक अत्यंत गंभीर विषय म्हणावा लागेल…. रात्री उशीरा घरी आणि तेही एकट्या-दुकट्याने (हो… दुचाकीवर दोघे असले तरी) परतणा-या वाटसरु लोकांना हा विषय पक्का माहीत आहे. भय इथले संपत नाही याचा अनुभव अनेकांनी घेतलेला असेल.
कुत्रे धावत्या वाहनांचा, विशेषत: दुचाकी वाहनांचा पाठलाग का करीत असावेत, यावर खूप संशोधन झालेले आहे. दुचाकी, हलकी वाहने(कार, रिक्षा इ. ) आणि नंतर अवजड वाहने असा श्वानांचा पसंतीक्रम असतो, हेही निरीक्षण आहे.
कुत्रे दुचाकीच्या मागे लागले आहेत… आणि दुचाकीस्वाराच्या पोटरीचा लचका तोडला आहे, असे फार क्वचित झालेले असावे… आणि झालेच असेल तर त्याचे कारणही निराळेच असावे! कार चालक मात्र या चाव्यातून बचावतात… कारण ते आत सुरक्षित असतात. दुचाकीचालक जखमी होतात ते घाबरून वाहन दामटताना वाहन घसरल्यामुळे किंवा कुठेतरी धडकून. वाहन एका जागी स्थिर थांबले की कुत्रेही थांबतात आणि काहीच सेकंदात शांत होऊन निघून जातात, असा अनुभव आहे. इराक मध्ये अमेरिकी सैन्य घुसले आणि तिथे काहीच न सापडल्याने गोंधळून गेले होते. यावर ताईम्स ऑफ इंडिया मधल्या एका स्तंभात जग सूर्या नावाने लिहिणा-या लेखकाने इराक म्हणजे धावती कार.. तिच्यामागे धावणारे अमेरिकी सैन्य… थांबलेली कार आणि आता करायचे नक्की काय? अशा संभ्रमात पडून जागच्या जागी थांबलेले कुत्रे असे चित्र शब्दांनी रंगवले होते. हो… या स्तंभ शब्दावरून आठवले…. कुत्रे आणि खांब यांचा खूप निकटचा संबंध आहे. पण खूप बारीक पाहिलं तर कुत्र्यांना खांबच पाहिजे असतो, असे नाही. उभ्या असलेल्या कोणत्याही वस्तूवर हे प्राणीमित्र आपला ठसा उमटवू शकतात. कारण त्यांचे साध्य ठरलेले आहे.. साधन नव्हे!
सर्वच हिंस्र श्वापदं आपला आपला इलाखा निश्चित करण्याच्या बाबतीत खूप सतर्क असतात. आता या सीमारेषा ठरवायच्या कशा? यावर त्यांनी एक अत्यंत सोपा उपाय शोधून काढला आहे… अनादी कालापासून. लघुशंका! इथे लघु म्हणजे अत्यंत थोडे असा अर्थ घेण्यास हरकत नाही. एन. जी. सी. , डिस्कवरी वाहिन्यांच्या कृपेने सामान्य लोकांना फक्त चित्रे, प्राणीसंग्रहालये यांतून पहावे लागणारे प्राणी घरबसल्या पाहण्याची सोय झाली. त्यातून मग प्राण्यांची इत्यंभूत माहिती दिसू लागली… (बिचा-या प्राण्यांच्या खाजगी जीवनाचा भंग मात्र पदोपदी होतानाही दिसू लागला!)
वाघ, सिंह आपल्या सीमा कोणत्या आहेत, हे इतरांना सहज समजावे म्हणून परिसरातील झाडांवर आपल्या मूत्राचा अगदी मोजक्या प्रमाणातील फवारा मारताना आपण पाहिले असेल. म्हणजे संबंधित जागा मालक जवळपास नसतानाही आगंतुकास सहज समजावे की Tresspassers will be prosecuted! आणि तरीही कुणी घुसलाच तर त्याचं काही खरं नसतं.. हे समस्त प्राणीजगत जाणून असते. बरं, हे marking करताना ज्याच्या साठी ह्या खाणाखुणा पेरलेल्या असतात त्याला सहज गंध मिळेल याचीही काळजी घेतली जाते… नाहीतर आपले सरकारी फलक… वाहन उभे करून झाल्यावरच समजते की आजतर P-2. आणि तोपर्यंत इटुकली पिटुकली पावती फाडून झालेली असते.
दुस-या प्राण्याच्या नाकासमोर ही खूण असेल, त्याला ती सहज हुंगता यावी, अशाच उंचीवर ही फवारणी अचूक केली जाते. आता, आपले कुत्रे जरी आपल्या आश्रयाने रहात असले तरी त्यांनी आपापसात आपले जागावाटप निश्चित करून घेतलेले असते. त्यांची वार्डरचना अगदी अचूक असते. बाहेरचा कुणी आला की त्याला सीमेच्या पलीकडे पिटाळून लावणे एवढंच काम सर्व मिळून करतात. बाकी संघर्ष टाळण्याचाच प्रयत्न जास्त असतो. म्हणून कुत्रे विजेच्या खांबावर विशिष्ट उंचीवरच खूण करून जातात. दुस-या कुत्र्याला उभ्याउभ्याच (अर्थात आडव्या आडव्याच) तो वास हुंगता यावा आणि तिथून मुकाट पुढे निघून जाता यावं) गोष्टी लक्षात याव्यात, अशी योजना असते. आता खांब कमी असतील आणि परिसर मोठा असेल तर मग कुत्रे अन्य मार्ग शोधतात. दुचाकी, मोटारी यांचे टायर्स अगदी सोयीचे ठरतात. रबरावरील खुणा लवकर मिटत नाहीत… यासाठीच टायर long lasting म्हणवले जात असावते! म्हणून कुत्रे याच वस्तूवर टांग वर करतात! बाहेरून आलेला कुत्रा अगदी सहज ह्या पाट्या पाहतो… आणि शारीरिक ताकद मर्यादित असेल तर पुढील मार्गावर निघून जातो.. शेपूट योग्य त्या ठिकाणी लपवून.
आता आपण जर आपली ही गंधीत दुचाकी घेऊन निघालो आहोत… आणि हा गंध भलत्याच श्वानांचा असेल तर आपण ज्या गल्लीतून जातो निघालो आहोत त्या गल्लीतील बाहु(दंत)बली सभासद लोकांना आक्षेप असणं साहजिकच नव्हे काय? हे लोक दुचाकी, कारच्या नव्हे तर त्यांच्या टायर्स वरील शत्रूपक्षाच्या सुकलेल्या खुणांचा मागोवा घेत धावत असतात.. आणि आपल्याला वाटतं की ते आपल्या मागे धावताहेत! असं घडत असताना (दुचाकीवरील) व्यक्तींनी आपलेही पाय थोडे वर उचलून धरले आणि सरळ रेषेत मार्गाक्रमण करीत राहिले तर काम होते… ते पहारेकरी त्यांच्या सीमा ओलांडून पुढे येत नाहीत.. उलट मागून येणा-या दुस-या वाहनांच्या मागावर… नव्हे वासावर राहतात… त्यांचे आपले वैय्यक्तिक वैर असण्याचं काही कारण नाही!
पण आपण नेहमीच त्यांच्या मार्गातून ये जा करीत असू, आणि ती ही रात्री… तर काही दिवसांनी हे ड्युटीवर असलेले पहारेकरी आपल्या ओळखीचेही होऊ शकतात. त्यांना अधोन्मधून चापानी देत गेलं की तर मग आपली साधी तपासणीही होत नाही. पण एखादेवेळी पहारेकरी बदलला गेला आहे आणि आपल्याला ते ठावे नाही, तर अशावेळी अतिआत्मविश्वास नडू शकतो.
एवढं सगळं असलं तरी भीतीही वाटतेच. यावर उपाय म्हणून काही लोक मार्ग बदलतात. पण असे मार्ग नसतातच मुळात. दाट मनुष्यवस्ती, गर्दी किती आहे! यावर एक गमतीशीर उपाय सांगणारा एक विडीओ सध्या खूप बघितला जातो आहे… काही लोक रात्री दुचाकीवरून गल्लीत घुसले आहेत….. अर्थात जागरूक कुत्रे त्यांच्या मागे धावाताहेत… दुचाकीवरील लोक ओरडून म्हणताहेत… लोकल ही भाई… इधर के ही हैं…. (आम्ही इथलेच आहोत भावांनो! स्थानिक निवासी आहोत… !) आणि हे ऐकून ते कुत्रे आपले आक्रमण रहित करतातही… असे दिसते!) टोल नाक्यावर साधारण असा संवाद ऐकू येत असतो.. पण हा मोकाट टोळश्वानांच्या तावडीतून सुटण्यासाठी वापरलेला फंडा मात्र अजब आणि मनोरंजन करणारा आहे. मात्र ही सबब सर्वच कुत्र्यांना समजेल असे नाही! त्यामुळे सावधान! आणि हो… शक्य झाल्यास वरचेवर वाहनांचे टायर्स पाण्याने स्वच्छ करीत जावे, हे उत्तम !
(या लेखात एकट्या मुलाला, व्यक्तीला गाठून त्याचा चावे घेऊन जीव घेणा-या कुत्र्यांचा विचार केलेला नाही! हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. दिल्लीत एका व्यक्तीचा मोकाट कुत्र्यांनी जीव घेतल्याची घटना ताजी आहे!)
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈