सौ. विद्या पराडकर
🌳 विविधा 🌳
☆ वटपौर्णिमा अशी असावी— ☆ सौ. विद्या पराडकर ☆
आज वटपौर्णिमा… भारतीय संस्कृतीने जतन केलेला पती,पत्नीच्या अतूट व अलौकिक प्रेम धाग्यात गुंफलेला एक अजोड पुष्पहारच जणू. पौराणिक कथेनुसार यमराजाच्या हातून ज्या सावित्रीने सत्यवानाला अत्यंत नम्र विनंती करुन, बुध्दीचातुर्याने, विवेकाने ज्या निर्धाराने सोडविले व चार वर मोठ्या खुबीने मिळविले, .म्हणजेच सौभाग्य मिळविले, ती सावित्री त्रिखंडात अजरामर आहे. पतीवरील नितांत प्रेम व अखंड सौभाग्याची शिंपण ही ह्या व्रतामागील मूलभूत प्रेरणा आहे.
आज समाज कितीतरी बदलला आहे. मानवी जीवनाची गतिमानता वाढली आहे शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन असल्यामुळे आजची स्त्री घराचे कुंपण ओलांडून बाहेर पडली आहे. शिक्षणाने ती समृद्ध झाली आहे. तिचा भौतिक विकास झाला आहे. तिचा शैक्षणिक विकास झाला आहे. परंतू शिक्षणाचा जो दुसरा आणि महत्त्वाचा उद्देश ‘संस्कृती संवर्धन व नैतिक मूल्यांची जोपासना करणे‘ आहे– हे कार्य आजचे शिक्षण पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे आजच्या स्त्रीला परंपरागत जीवन जगणे अशक्यप्राय झाले आहे. आजच्या प्रगत समाजात प्रगत जीवन पद्धतीत स्त्रीला दोन्ही तारांवर नाचता येत नाही. पण दोन्ही मतांचा सुवर्णमध्य मात्र साधता येतो. जीवनाच्या अंधारमय रस्त्यावर नव्या विचारांच्या नव्या प्रकाश वाटा दिसू लागतात. या सुवर्ण मध्याचा उपयोग केल्यास मानवी जीवन सुखकर होऊन समृद्ध होऊ शकते.
ढासळलेल्या कुटुंब पद्धतीला व समाजाला आधार देण्याचे काम हा सुवर्णमध्य साधू शकतो. एकत्र कुटुंब पद्धतीतील सेवा व्रत हे कोणत्याही धार्मिक व्रताच्या योग्यतेचे नव्हे का? प्रेम जिव्हाळा आपुलकी यांना पारख्या झालेल्या नात्याला नव संजीवनी मिळू शकते व निद्रिस्त नात्याला उजाळा मिळू शकेल.
आजच्या समानतेच्या जीवन संघर्षात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री उभी आहे. कधी तिला कौटुंबिक, सामाजिक, तर कधी आर्थिक संघर्ष करावा लागतो. या संघर्षात पतीने पत्नीला साथ देणे आवश्यक आहे. भारतीय स्त्री ही समर्पिता आहे. षड्ररिपूवर नियंत्रण ठेवून, कर्तव्य म्हणजेच देव मानणारी तिची भूमिका असावी. सुख व दु:ख पती पत्नीचे समान खेळणे असावे. यशस्वी संसाराकरता, समृद्ध जीवनासाठी उत्तम संकल्पाचे बीजारोपण केल्यास मानवी जीवन वृक्ष वृध्दींगत होऊ शकतो.
आज आपण कलियुगाच्या मध्यावर आहोत. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विशाल छायेत माणूस राहत आहे. भौतिक व चंगळवाद व दहशतवाद यांचे प्रचंड तांडव आज सुरू आहे. अहंकाराला कवेत घालून माणूस जगत आहे. मानवी मूल्यांचा नाश होत आहे. अशा वेळी मानव्याला जपणाऱ्या संस्कारांची नितांत गरज आहे. ही गरज वटसावित्री या सणातून आधुनिक सावित्री भागवू शकते. नात्यातील समरसता, प्रेम, निष्ठा, कर्तव्य भावना, विशाल दृष्टिकोन, सेवाभाव, सहकार्याची भावना, ही सर्व या व्रताची सूत्रे आहेत. ही सूत्रे परस्परांनी जोपासल्यास कुटुंब व्यवस्था भर भक्कम पायावर उभी राहून समाजाला उन्नत अवस्था प्राप्त होईल… आधुनिक सावित्री या वाटेने गेल्यास प्रेमवीणेवरून संसाराची तार छेडली जाईल. जुने व नवे यांचा मेळ घालून, सणांचे ओझे न घेता, मानवी मूल्यांचे जतन करून, स्त्री समृद्ध होऊ शकेल.
© सौ. विद्या पराडकर
वारजे पुणे.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈