श्री अमोल अनंत केळकर
विविधा
☆ वृद्धपण आणि मौन… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
वृद्धपण आणि मौनः
“मौन” हा शब्द ऐकल्याक्षणी कुसुमाग्रजांची कविता आठवली.
शिणलेल्या झाडापाशी
कोकिळा आली
म्हणाली, गाणे गाऊ का ?
झाड बोललं नाही
कोकिळा उडून गेली.
शिणलेल्या झाडापाशी
सुग्रण आली
म्हणाली घरटे बांधु का?
झाड बोललं नाही
सुग्रण निघून गेली.
शिणलेल्या झाडापाशी
चंद्रकोर आली
म्हणाली जाळीत लपू का?
झाड बोललं नाही.
चंद्रकोर मार्गस्थ झाली.
बिजली आली
म्हणाली मिठीत येवू का?
झाडाचे मौन सुटलं
अंगांअंगातून
होकारांचे तुफान उठलं.
.
.
.
.
पहिल्यांदा वाचली तेव्हा नव्हती समजली. परत वाचली….
परत परत वाचली…
आणि लक्षात आले की हे तर शिणलेल्या झाडाचे समजूतदार मौन आहे….
अनेक वर्ष कोकिळा येवून गात असेल, बर्याच सुगरण पक्षांनी पिल्लांसाठी सुंदर घरटी विणली असतील, चंद्रकोर तर कितीतरी वेळा झाडाच्या जाळीत लपली असेल….
असे सगळ्यांच्या सोबतीत ऐश्वर्यसंपन्न आयुष्य घालवलेल्या झाडासाठी आता आपण थकलो आहोत…
शिणलो आहोत हे स्विकारणे किती कठिण झाले असेल…
पक्षांच्याही लक्षात आले आहे की झाड दमलेय….
म्हणून तर विचारताहेत….
की शिणलेल्या झाडाला एकटे वाटू नये म्हणून येताहेत…
“नाही” पण म्हणता येत नाही आणि “हो” पण…
अश्या वेळी मौनाची सोबत असते….
थोडीशी घुसमट…
पण शब्दाशिवाय पोहोचते बरेच काही….
अशी ही मौनाची भाषा…
आणि कवितेचा शेवट तर….
समर्पणाचा…
मनाला चटका लावणारा…..
यानिमित्ताने आठवत राहिले ते स्वतःहून स्विकारलेलेले मौन….
पटत नसले तरी त्या क्षणी वाद वाढू नये म्हणून,
खूप आनंदाच्या वेळी शब्दातून व्यक्त होता येत नाही तेव्हा,
जंगलातील नीरव शांततेत,
कधीतरी स्वतः लाच चाचपडत असतांना….
माणसामाणसातील नात्यांमध्ये तर
कधीतरी समोरच्याला समजून घेतांना
एकाने थांबणे पण गरजेचे….
.
.
.
.
यानिमित्ताने एक प्रसंग आठवला. तरुण मंडळींनी गावातल्या एका आजीबाईंना विचारले की
इतकी वर्ष तुम्ही आनंदाने कसा संसार केला?
त्या म्हणाल्या “तो आग झाला की मी पाणी व्हते…”
गम्मत म्हणजे एका तरुण मित्राने लगेच प्रतिसाद दिला आणि म्हणाला
“म्हणून तर ती राजाची राणी होते “
……असे पाणी होतांना मौनाची सोबत नक्की होत असेल का?
खरं तर मला असे वाटते की ठरवून धारण केलेल्या मौनाची ताकद असतेच असते पण कधी व्यक्त व्हायचे आणि कधी मौनात रहायचे हे समजले की आयुष्य मात्र नक्की सोपे, सहज होते.
लेखक : अज्ञात
संग्राहक :श्री. अमोल केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
kelkaramol.blogspot.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈