?  विविधा  ?

☆वर्षानुवर्षांच्या वास्तू-वस्तू ☆ सुश्री मृणालिनी मकरंद जोशी

“काय गं आई, चहा-साखरेचे डबे बदलूया का आता ? किती वर्षांपासून हेच डबे वापरते आहेस…!” इति कन्यका.

“अगं, आजीच्या संसारतले डबे आहेत हे… माझ्या लग्ना आधीपासून हेच डबे आहेत चहा-साखरेला… आणि डबे बदलले, तर एखाद्यावेळेस आजीला वाईट वाटेल गं…” माझे तिला उत्तर.

“अगं काही नाही वाईट वाटणार… मी सांगते तिला बरोबर. आता आपण किचनचे इतके छान  renovation केले आहे, तर करूयात ना काही बदल…. एखाद्या छोट्याशा बदलामुळेसुद्धा जरा फ्रेश वाटते गं… आई, हे बघ हे जे दोन प्लास्टिकचे कंटेनर आहेत ना, ते आताच्या आपल्या नवीन रंगसंगतीला किती मॅच आहेत बघ… आता यातच ठेवूया चहा-साखर.” कन्येचे प्रत्युत्तर…!

तिचे म्हणणे तसे बरोबरच होते. घरात काही सुसह्य बदल करायला काहीच हरकत नाही खरं तर… आपल्यालाच छान वाटते. पण…

किचन गरजेनुसार थोडे renew करून घेतले. जुने सुद्धा खूप सामान, भांडी माळ्यावर होती. काही वस्तू स्वच्छ करून कधीतरी उपयोगी पडतील, म्हणून पुन्हा ठेवून दिल्या. काही माझ्या मदतनीस मावशींना दिल्या. दोन-तीन वस्तू पुन्हा वापरायला काढल्या… तर काही वस्तू देववतही नव्हत्या पण ठेववतही नव्हत्या.

मनात एक विचार आला…. घराचा जसा वास्तू-पुरुष असतो ना… तशाच या ‘वास्तू-वस्तूही’ असतात नाही का ? वर्षानुवर्षे या वस्तू आपल्या घरात असतात. स्वयंपाक घरात तर अगदी हमखास… घरात घडणाऱ्या घटना, येणारे नवीन सदस्य, जन्म, मृत्यू, होणारे अनेक छोटे-मोठे बदल हे वास्तू-पुरुष पहात असतो, असं आपण मानतो. तसेच हे सर्व या ‘वास्तू-वस्तूही’ पहात असतात, नाही का…!

स्वयंपाक घरात पोळपाट-लाटणे, तवा, स्टील किंवा पितळी डबे, कढया, परात, नारळ खोवणी, विळी, किसणी, गॅस बर्नर, डायनिंग टेबल, पाणी भरून ठेवायची भांडी… अशा अनेक वस्तू असतात, ज्या वर्षानुवर्षे आपण त्याच वापरतो. माझ्याकडे सासूबाई वापरायच्या तो दगडी पोळपाट आहे… असाच वर्षानुवर्षं. खूप जड आहे, पण रोजच्या पोळ्या मी त्यावरच करते. सवय झाली आता… आईंना मात्र तो उचलायला जड जातो हल्ली… पण तशी त्यांना पोळ्या करायची वेळ  क्वचितच येते. मला अनेकींनी सुचवले, ‘बदलून टाक गं पोळपाट… किती जड आहे…’ पण मला मात्र तोच आवडतो.

वास्तू-पुरुषाप्रमाणेच स्वयंपाकघरातल्या या वास्तू-वस्तूही अनेक प्रसंगांचे साक्षीदार असतील. दोन-तीन पिढ्यांचे संसार…  प्रेमात, मायेत मुरलेली ‘लोणची’ भांड्याला भांडी लागल्यावर होणारे आवाज… चहाच्या पेल्यातली वादळे…  वेगवेगळ्या हातांतल्या काकणांची वेगवेगळी किणकिण… धुपाच्या सुवासात मिसळून गेलेले साग्रसंगीत स्वयंपाकाचे सुवास… कुलाचार सांभाळण्याची घरातल्या बायकांची लगबग… कधी बारशाचा तर कधी श्राद्धाचा स्वयंपाक….! कधी बाळांचे बोबडे बोल तर कधी वृद्धांच्या आवाजातील थरथर…

आणि… आणि….     

यासर्वांबरोबरच प्रेमातला गोडवा, शब्दांमधला कडूपणा, स्वभावातला तिखटपणा, डोळ्यातील पाण्याचा खारटपणा…. हे सगळं सुद्धा अनुभवत असतील… असेच वर्षानुवर्षे…!

घरातील बाईच्या या वस्तू इतक्या सवयीच्या झालेल्या असतात, की त्यांच्यासाठी तो एक comfort zone असतो. ‘वादा करो नहीं छोडोगे तुम मेरा साथ…. किचन में तुम हो… इसलिये मैं भी हुं l’ असं या दोघांमधील नातं असतं…! मुळात स्वयंपाकघर हेच मुळी बायकांच्या जिव्हाळ्याचे असते.

माळ्यावरच्या भांड्यांमध्ये काही तांब्या-पितळेची सुद्धा भांडी आहेत आमच्याकडे… ही भांडी तर खरोखर ‘वास्तू-वस्तू’ आहेत. आताची पिढी प्रॅक्टिकल विचार करणारी… लेक म्हणाली,”आई, कधी वापरतो तरी का गं आपण या वस्तू ? स्वच्छ करायलाही किती जिकिरीचं असतं गं… बरं बाई तू ठेवलीयेस अजूनही ही भांडी…” तिला म्हणाले,”खरंय गं राणी तुझं… पण या भांड्यांची किंमत (पैशातली नव्हे) आणि महत्व मनाला माहितीय ना… आयुष्यात  ‘आपल्याकडे या मौल्यवान वस्तू नाहीत,’ अशी खंत कधी मनाला वाटू नये ना… म्हणून ठेवल्यात मी अजूनही या वस्तू…. वर्षानुवर्षे. ‘वास्तू-वस्तूच’ आहेत त्या आपल्या… !!”

© सुश्री मृणालिनी मकरंद जोशी

औरंगाबाद

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments