डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ वारसा….राधा ओक… ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

काल सासूबाईंचे ८३ वर्षाचे भाऊ आले होते. त्यांच्याकडे बघून कोणी त्यांच्या वयाचा अंदाज बांधून दाखवावा. तरतरीत चेहरा, दात घट्ट, ऐकायला छान येतंय, हातात काठी नाही, डोळ्याला चष्मा नाही. वयपरत्वे किरकोळ तब्येतीच्या तक्रारी सोडता तरुणांना लाजवेल असा उत्साह. मध्यंतरी मी एका पुस्तकासाठी लेखन केलं होत. त्या पुस्तकाचं प्रकाशन करणाऱ्या लेखिका स्वतः पुस्तक द्यायला आल्या होत्या. वय वर्ष ८०+. तरीही आवाज खणखणीत, डोळे उत्तम, सरळ बांधा. फार दूर कशाला माझ्याच घरात माझ्या सासूबाई ७४ वर्षांच्या.  पण आजही  या वयात माझ्या दुप्पट काम करतात. या सर्वांची उदाहरणे द्यायचा एकच उद्देश म्हणजे मागच्या पिढीला मिळालेलं उत्तम आरोग्य म्हणजे देणगीच नाही का? आणि इथूनच मला माझ्या नवा लेखाचा विषय मिळाला तो म्हणजे वारसा. 

आज आपल्या पैकी ७०% घरांमध्ये सकाळी नाष्ट्यापासून संध्याकाळच्या स्वयंपाकापर्यंत घरात प्रत्येक कामाला बाई असतेच. नाश्ता, स्वयंपाक, केर, फरशी, भांडी. या प्रत्येक कामासाठी बहुतेक घरांमध्ये कामाची बाई लावलेली दिसते. या मुख्य कामांच्या यादीमध्ये भाजी आणणे, निवडणे, चिरणे, कपड्यांच्या घड्या घालणे, घर आवरणे, बेसिन बाथरूम टॉयलेट घासणे, या सारखी अनेक छोटी कामं लपलेली असतात. घरात बाई लावण्यामागे प्रत्येकाच्या वेगळ्या गरजा किंवा कारणे  असू शकतात.  त्याबद्दल मी काहीच बोलणार नाहीये. पण घरातली ही सगळी कामं आपल्या हातावेगळी होऊन पण आपल्याला असे कुठले शारीरिक कष्ट पडतात, की ज्यामुळे चाळीशी पन्नाशीमध्ये गुडघे, सांधे दुखणे असे हाडाचे दुखणे किंवा शरीराच्या इतर असंख्य  व्याधी निर्माण होतात? 

एखादा दिवस बाई नाही येणार म्हटलं की आपल्याला अगदी जीवावर येतं. मग बिनधास्त त्या दिवशी आपण बाहेरून ऑर्डर करतो, किंवा मग भांडी तशीच ठेऊन देतो. पण त्यापैकी एखादे  काम आपण करावे  असं का नाही वाटत? याचं  कारण कामाची कमी होत चाललेली सवय. आज फूड प्रोसेसर, व्हेजिटेबल कटर यामुळे हाताने कणिक भिजवताना किंवा भाजी निवडताना- चिरताना होणारे बोटाचे व्यायाम होतच नाहीत. घरात केर फरशीला बहुतेक घरामध्ये बाई असते.  त्या मुळे वाकून केर काढणे किंवा बसून फरशी पुसणे हा व्यायाम होतच नाही. घरातील अशी असंख्य कामं असतात ज्यामध्ये आपल्या शरीराला उत्तम व्यायाम मिळतो. आणि हेच कारण आहे ज्यामुळे आपल्याला चाळिशीतच शरीराच्या अनेक व्याधी निर्माण होतात. कारण शरीराला काही हालचाल किंवा ताण नाहीच. दुर्दैवाने असे व्यायाम आपल्यापैकी अनेकांच्या स्टेटसमध्ये बसत नाहीत किंवा स्वतःला करायचे नसतात. किंबहुना so called वेळच नाही मिळत, या सबबीखाली ढकलले जातात. पण मग ऑफिसच्या आधी किंवा नंतर  जिम, योग क्लास इथे  व्यायाम करायला वेळ असतो. 

वारसा म्हणजे  फक्त संपत्तीवरचा हक्क, जमीन जुमला, याचा नाही बरं का. तो वारसा आहे उत्तम  आरोग्याचा, निरोगी शरीर आणि मनाचा. मागच्या पिढीत पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचं आरोग्य जास्त चांगलं दिसत. का असेल बर असं? आज आपल्यापैकी ९०% स्त्रियांना ३५-४०शी मधेच तब्बेतीच्या असंख्य तक्रारी आहेत. पण याची खरी कारण आपण समजून किंवा जाणून घेतोय का? पूर्वी घरातली असंख्य काम घरातील बाई दिवसभर करत राहायची. त्यापैकी सगळ्याच स्त्रिया house wife नसायच्या. पण आपली नोकरी, व्यवसाय सांभाळून घरातील काम, सणवार यांचं management त्या जबरदस्त करायच्या. कारण मुळात त्यांच्याकडे स्वतःच्या घरासाठी काटकसरीनं जगायची आणि कष्ट करायची तयारी असायची. तिला आजूबाजूला बघायला देखील वेळ व्हायचा नाही. त्या बायकांना तासतासभर फोनवर बोलायला किंवा इतरांची उणीदुणी काढायला वेळ नसायचा. पण आपल्या पिढीमध्ये आपण “मला वेळच नाही ग मिळत” हे जे म्हणतो ना, त्याच्या खरं तर उलट, आपल्या कडे वेळच वेळ आहे. म्हणूनच कदाचित आपल्या पिढीमध्ये हेवेदावे, ego issues जास्त आहेत. कारण आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक माणसाचा विचार करत बसण्याइतका वेळ आहे. 

आपण पुढच्या पिढीला काय देतोय? एक कृत्रिम आयुष्य जे फक्त तंत्रज्ञांच्या भोवती फिरतंय. आपल्या मुलांना स्वतःच्या गोष्टी जागेवर ठेवणे, स्वतःच्या कपड्यांच्या घड्या घालणे, कपाट आवरणे, जेवलेलं स्वतःचं  ताट उचलून ठेवणे, अशी छोटी कामं देखील करून देत नाही. कारण त्यांच्या बघण्यात ही कामं  दुसराच कोणी तरी करतोय ज्याला पैसे दिले की आपलं काम झालं ही  भावना आपणच त्यांच्यात निर्माण करतोय, असं नाही का वाटत? आपल्या मुलांच्यात कष्टाची तयारीच निर्माण होत नाहीये. सगळं आयतं हातात मिळतं आहे. कॉलेजला जायला लागलं की   हातात गाडी मिळते,  पण मग कधी तरी चालत जायची वेळ आलीच  तर अशा वेळी मुलं कॉलेज बंक करून घरी बसतात. का? कारण कष्ट करायची तयारी नाही. 

आज आपल्याला एक किंवा फार फार तर दोन मुलं असतात. त्यामुळे त्यांना सगळं चांगलं द्यायच्या नादात आणि अति प्रोटेक्टिव्ह स्वभावामुळे आपण त्यांना अजून जास्त दुबळे बनवत आहोत. मध्यंतरी माझी एक मैत्रीण म्हणाली,  “ बर ग बाई तुला दोन मुलं आहेत. आम्हाला एकच आहे तेच जीवापाड जपायचं आहे. आमची राजकन्या आहे ती.”  प्रश्न मला दोन मुलं आहेत किंवा एक  मूल  याचा नाहीये. पूर्वीच्या काळी बायकांना ८-१० मुलं असायची.  पण म्हणून त्या त्यातल्या ८ मुलांना वाऱ्यावर नाही सोडायच्या. तसंच मला दोन मुलं आहेत म्हणजे मी एकाच्या बाबतीत प्रोटेक्टिव्ह आणि दुसऱ्याच्या  बाबतीत हवालदिल नाहीये. मुळात प्रश्न हा आहे की, मूल एक असो किंवा दोन, त्याला समाजात लढायची , कष्ट करायची , एखादी गोष्ट मिळवण्यासाठीचा ध्यास घेण्याची वृत्ती आपण निर्माण करतोय का नाही ? 

हा लेख म्हणजे मी काही ब्रह्मज्ञान देत नाहीये. किंबहुना मी देखील तुमच्या सगळ्यांच्यासारखीच आहे. पण स्वतःचं काही चुकत असेल तर मान्य करायची माझी तयारी आहे. तंत्रज्ञानाने माणसाला जितकं जवळ आणलं, मॉडर्न बनवलं, तितकंच पांगळही केलं. पूर्वी ६०ला सिनियर सिटीझन म्हटलं  जायचं. पण हे जर असंच सुरु राहिलं तर कदाचित येत्या काही वर्षात ४०लाच सिनियर सिटीझन म्हटलं जाईल. कारण जे म्हातारपण पूर्वी ६० नंतर यायचं, ते अलिकडे सरकत आत्ताच ४०ला येऊन पोचलंय. म्हणूनच वाटतं की आपल्या पुढच्या पिढीला संपत्ती, पैसे याचा वारसा देण्यापेक्षा, उत्तम आरोग्यासाठी कानमंत्र देऊया, जो त्यांचं आयुष्य अजून सुंदर करायला मदत करेल.

लेखिका :-  राधा ओक

संग्राहक :- डॉ. ज्योती गोडबोले 

 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments