☆ विविधा ☆ वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी ☆ सुश्री स्नेहा दामले
आपलं जगणं बऱ्याच अंशी वृक्ष-वनस्पतींवर अवलंबून असतं .. आपल्या तोंडचा घास आणि आपला श्वास सगळी वनस्पतींची देणगी..
तुकाराम महाराजांनी उगीच नाही त्यांना सोयरे म्हटलं.. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी’
आपल्या कुटुंबात,आपण आपल्या सोयरे मंडळींना/पाव्हणे मंडळींना खूप आदराचं, मानाचं स्थान देतो.
तसा आदर आणि मान, आपलं जगणं ज्या सोयर्यांवर अवलंबून आहे, त्या या वनस्पतींना आपण देतो का?
उत्तर बहुतेक नाही असंच येतं; आपण अति परिचय झाल्यासारखं फारच गृहीत धरतो त्यांना किंवा चक्क दुर्लक्ष करतो त्यांच्याकडे…
नर्मदालय’ संस्थेच्या माध्यमातून मध्यप्रदेशातील नर्मदा किनारीच्या मागास व वंचित मुलांसाठी शिक्षण विषयक काम करणाऱ्या भारती ठाकूर . त्यांची एक गोष्ट मध्यंतरी वाचली होती.. गोष्टीचं शीर्षक होतं ‘क्षमा..’
शेजाऱ्यांच्या तक्रारीवरून एकदा रागाच्या भरात भारती ताईंनी आपल्या बागेतलं १०-११ फुटी जास्वंदीचं झाड अगदी दोन अडीच फुटांपर्यंत छाटलं..
आपल्या या अविवेकी कृत्याचा त्यांना लगेच पश्चात्तापही झाला.. पावसाळा होता त्यामुळे झाड पुन्हा लगेच वाढलं पण शेजाऱ्यांच्या कंपाउंडमध्ये एकही फांदी वाढली नाही परत! झाड वाढलं पण फुल मात्र एकही येईना; खतपाणी, सगळे प्रयोग करून झाले. मग कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्राच्या दीदींच्या सांगण्यावरून भारतीताईंनी त्या झाडाची क्षमा मागितली; त्याच्याशी रोज संवाद करू लागल्या, गप्पा मारू लागल्या.. एक वेगळंच जिव्हाळ्याचं नातं त्यांचं झाडाशी निर्माण झालं आणि मग काही दिवसात झाड कळ्यांनी पुन्हा भरून गेलं . झाडाने त्यांना ‘क्षमा’ केली होती..
ही गोष्ट मी वाचली आणि ती माझ्या अगदी हृदयाला भिडली.. मलाही झाडांची आवड आहे. झाडं आपल्याला प्राणवायू देतात, त्या जीवावर आपण खरं तर जगतो; पण आपण काय करतो त्यांना जगण्यासाठी? या विचाराने मी या मातीतल्या, देशी आणि नर्सरीत सहसा न आढळणाऱ्या झाडांची बियांपासून रोपं बनवते आणि मग कुणाला हवी त्याला देऊन टाकते लावायला. बिया एकत्र रुजत घालते आणि मग रोपांनी डोकं वर काढलं की त्यांना वेगळं काढून वेगवेगळ्या पिशव्यांत लावते. याचं कारण प्रत्येक बी वेगवेगळ्या पिशवीत लावायला आणि त्या पिशव्या ठेवायला माझ्याकडे तेवढी जागा नाही. हे रोप असं काढून पिशवीत लावलं की ते काढताना त्याच्या नाजूक मुळांना थोडी तरी इजा होतेच आणि मग त्या चिमुकल्या रोपाची पाने एक दिवस जरा मलूल असतात.. पुन्हा दुसऱ्या दिवशी नवीन परिस्थितीशी जुळवून घेत टवटवीत होतात. हा माझा नेहमीचा अनुभव..
वरील गोष्ट वाचली तेव्हा मी रुजत घातलेल्या गोकर्णीचं रोप पिशवीत लावण्याजोगं झालं होतं, यावेळी मी जरा अधिक हळुवारपणे ते मातीतून काढायचा प्रयत्न केला पण तरीही त्याला थोडंसं दुखलं असणारच अशा विचाराने सॉरी हं,दुखलं का रे तुला? असं म्हणत त्या पिटुकल्या रोपाशी मी संवाद केला आणि काय सांगू..या एका वाक्याने माझं मलाच केवढं बरं वाटलं..’आता तुला नवीन जागा देते हं’ असं म्हणून मी ते पिशवीत लावलं. थोडी माती दाबली, पाणी घातलं. भारतीताईंसारखा अनुभव यावेळी मलाही आला. यावेळी पिशवीतल्या रोपट्याने दुसऱ्या दिवशी मान टाकली नाही.
वनस्पतींनाही संवेदना असतात, त्या प्रतिक्रिया देतात हे सगळं आपण शिकलेलं असतो. विज्ञानाने ते सिद्धही केले आहे.. आपल्या ऋषीमुनींना मात्र ही गोष्ट आधीपासून माहित असणार..पद्मपुराणात तो श्लोक आहे. कोणतीही वनस्पती आपल्या उपयोगासाठी तोडण्या आधी तिची प्रार्थना करून हा श्लोक म्हणायचा असतो.
आयुर्बलम यशो वर्च: प्रजा: पशून्वसूनिच |
ब्रह्म प्रज्ञां च मेधां च तत्वं नो देहि वनस्पते ||
हे वनस्पती तू आम्हाला आयुष्य, उत्तम बल, यश, धन, प्रज्ञा आणि चांगली बुद्धी दे..
हा श्लोक मी वाचला होता आधी; पण त्या मागचा ऋषींचा वनस्पतींबद्दलचा आदर आणि प्रेमभाव या माझ्या अनुभवातून माझ्यासमोर लख्खपणे स्पष्ट झाला होता..
सुश्री स्नेहा दामले
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈