श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

⭐ व ज न ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“मंत्री साहेबांनी ट्रस्टिंवर वजन टाकलं, म्हणून कामाचा ठेका मिळाला !”

वजन ! किती साधा, सरळ, कुठल्याही काना, मात्रा, वेलांटीच स्वतः वजन न वाहणारा शब्द !  पण तो उच्चारतांना आपल्याला त्याच वजन जाणवतं !

आता कुणा व्यक्तीच्या शब्दाला समाजात किती वजन आहे, हे माझ्या मते त्या व्यक्तीच्या समाजात असलेल्या खऱ्या, खोट्या प्रतिष्ठवर अवलंबून असतं ! अर्थात त्या व्यक्तीच्या शब्दाला ते वजन प्राप्त होण्यासाठी, तुमच्या माझ्या सारख्या सामान्य लोकांनी, स्वतःच वजन खर्च करून त्यांना त्या पदावर बसवलेलं असतं, हे आपण नंतर विसरूनच जातो ! कारण आपलं एखाद सरकारी किंवा दुसरं कुठलंही काम मार्गी लावण्यासाठी, त्या स्वतः वजनदार असलेल्या नेत्याने आपल्या शब्दाचे वजन टाकून ते काम करावं, असं आपलं स्वतःच तोळामासा वजन त्याच्यावर खर्च करून त्याला विनवणी करायची पाळी नंतर आपल्यावरच येते ! असा माझ्या सारखा अनुभव आपण पण घेतला असेल, हे मी आपल्यावर माझ्या शब्दांच कुठलंही वजन न टाकता, तुम्ही कबूल कराल !

मंडळी सध्याचा जमानाच वजनाचा आलाय त्याला कोण काय करणार ! म्हणजे असं बघा, आपलं एखाद काम होण्यासाठी कुणाचा कधी वजनदार शब्द कामी नाही आला, तर आपल्या अर्जावर काहीतरी वजन ठेवल्याशिवाय तो मंजूरच होतं नाही ! या बाबतीत अशा प्रसंगातून गेलेले काही वजनदार “पेपरवेटच” जास्त वजन, सॉरी प्रकाश टाकू शकतील !

माझ्या पिढीच्या लहानपणी जवळ जवळ प्रत्येक रेल्वे प्लॅटफॉर्मवर, एक किंवा दोन वजनं करायची मशीन्स असायची. त्या मशीनवर उभं राहून त्यात एक रुपयाचे एक नाणे टाकले, की आपलं वजन दाखवणार एक तिकीट त्या मधून बाहेर येत असे ! त्या तिकिटाची एक खासियत अशी होती की त्याच्या एका बाजूला वजन करणाऱ्या माणसाचं वजन आणि मागच्या बाजूला त्याच त्या दिवसाचं भविष्य एका ओळीत लिहिलेलं असायचं ! ह्या दोन्ही छापील गोष्टी कधीच बरोबर नसायच्या हा भाग निराळा ! हल्लीच्या काळातील जगभरातल्या कुठल्याही कसीनोत दिसणाऱ्या स्लॉट मशीनचा, ही वजनाची मशिन्स म्हणजे बाल्यावस्था म्हणायला काहीच हरकत नाही ! कारण दोन्ही मशिन्स लोकांना हातोहात फसवून फक्त पैसे गिळंकृत करण्यासाठी बनली आहेत, हे मोठेपणी उमगते ! पण तो पर्यंत आपले खिश्याचे वजन बऱ्या पैकी कमी झालेलं असतं !

आधुनिक सायन्स नुसार प्रत्येकाच्या उंचीच्या प्रमाणात त्याचे किंवा तिचे, किती वजन असावे याच एक कोष्टक ठरलेलं आहे ! पण कुणाचं शारीरिक वजन किती असावं, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, असं माझं वजनान हलकं फुलकं मत आहे ! माझ्या या हलक्या फुलक्या मताशी माझे काही वजनदार मित्र मैत्रिणी नक्कीच सहमत होतील, यात मला तिळमात्र (कारण तीळ सुद्धा वजनाने हलके फुलके असतात) शंका नाही ! कारण कसं असतं नां, शेवटच्या ‘महायात्रेचा’ प्रसंग वगळता, शेवटी प्रत्येकाला स्वतःच वजन स्वतःच आयुष्यभर स्वतःच्या दोन पायावर वहायचं असतं ! त्यामुळे दुसऱ्याच्या वजनाचा त्रास आपल्याला जाणवायच तसं काही कारण नाही म्हणा ! पण हां, एखादी व्यक्ती जर का चुकून माकून, काही कारणाने आपल्या अंगावर पडली आणि ती जर का आपल्या पेक्षा वजनाने भरभक्कम असेल तर ? तर फार तर फार काय होईल, आपली किती हाडं मोडायची शिल्लक राहील्येत, हे आपल्याला फक्त कुठला तरी चांगला ऑर्थोपेडीक डॉक्टरच त्याची वजनदार फी घेवून सांगू शकेल इतकंच !

सध्याची पिढी खूपच हेल्थ कॉनशस झाल्याच आपण बघतो आहोत ! वजन कमी करण्यासाठी निरनिराळी डाएटस करणं, जिम जॉईन करणं, असे प्रकार ही तरुणाईतली मंडळी आजकाल करत असते ! त्यातील किती टक्के तरुण, तरुणी आपल्या वजन कमी करण्याच्या ध्येयापर्यंत पोचतात हा मला एक न पेलवणारा वजनदार प्रश्न ! कारण कुठलीही गोष्ट साध्य करण्यासाठी त्यात सातत्य आणि चिकाटी लागते ! पण या मंडळींपैकी काही आरंभशूरांमुळे, निरनिराळ्या जिम चालवणाऱ्या लोकांना आणि डाएटीशीयन लोकांना जरा बरे दिवस येवून त्यांची आर्थिक वजनं वाढल्याचे सध्या ऐकून आहे ! या बाबतीत एक मजेदार गोष्ट मला आठवते.  एका माणसाजवळ एक गाईचे वासरू होते. त्या वासराचा  काही कारणाने एकदा एक पाय मोडतो. त्यामुळे त्या वासराला नीट चालता येईनासे होतं. म्हणून तो माणूस त्या वासराला नेहमी कुठंही उचलून घेऊन जात असे. काही महिन्यांनी त्या वासराची गाय होते, तरी तो माणूस तिला उचलूनच नेत असे ! आता असं बघा, जर का कोणी त्या माणसाला एकदम गाय उचलायला सांगितली असती, तर ते त्याला शक्य झालं नसतं ! पण रोजच्या सरावामुळे तो पुढील काळात रोज गाय उचलू शकला, एवढं मात्र खरं ! समझने वालोंको……..! असो !

नुकत्याच ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीने केलेल्या एका वैज्ञानिक संशोधना नुसार, मुंगी हा जगातला असा एकमेव कीटक आहे, जो वेळ पडल्यास स्वतःच्या वजनाच्या सुमारे ५० ते ५०० पट वजन उचलू शकतो, असं सिद्ध केले आहे ! बापरे, ऐकावे ते नवलंच म्हणायचं आणि आपलं शाब्दिक वजन सोडा, पण निदान शारीरिक वजन तरी आपल्या उंचीनुसार आधुनिक सायन्सच्या कोष्टकाच्या जवळ पास मेंटेन कसं ठेवता येईल, यासाठी प्रयत्न करायला काय हरकत आहे मंडळी ?

शेवटी, आपले सगळ्यांचे शाब्दिक वजन लोकांच्या कोणत्या ना कोणत्या चांगल्या कामासाठी, नेहमीच कामी येवू दे, अशी मी माझ्या पूर्ण सत्तर किलोच्या शारीरिक वजनाने त्या ईश्वराच्या चरणी दोन्ही हात जोडून प्रार्थना करतो !

शुभं भवतु !

 

ता. क. – सर्वार्थाने वजनदार व्यक्ती काही “लाख डॉलर्स” खर्च करून, स्वतःचे वजन एखाद्या पिसासारखेच आहे असं अनुभवण्यासाठी, नुकत्याच रिचर्ड ब्रॉनसन यांनी चालू केलेल्या वर्जिन गॅलेकटीक या कंपनी तर्फे अवकाशात भ्रमण करून, तसा फिल घेवू शकतात बरं का !

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments