डाॅ.नयना कासखेडीकर
विविधा
☆ विचार–पुष्प – भाग 14 – अध्यात्मिकतेची खूण ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
नरेंद्रला मन एकाग्र होण्याची अद्भुत शक्ती बालवयातच लाभली होती.मनाची एकाग्रता आणि उत्तम स्मरणशक्ती हे त्याचे विशेष गुण लहानपणापासूनच लक्षांत येत होते. लहान मुलं ऐकत नसतील तर आपण त्यांना,कशाची तरी भीती दाखवतो,तू ऐकलं नाहीस तर बाऊ होईल,बुवा येईल,देवबाप्पा अमुक करेल,असे आणखी काही.अशीच भीती नरेंद्रला ही दाखवली गेली होती,त्याला लहानपणी खेळताना झाडावर उंच चढण्याचा छंद होता.
मित्रांशी खेळताना,एकदा अंगणातल्या चंपक वृक्षावर पारंब्याना धरून लांबच लांब झोके घेण्याचा खेळ नरेंद्र खेळत होता. ते मित्राच्या वडिलांनी, रामरतन बसूंनी पाहिले,या वृक्षाच्या फांद्या फार बळकट नसतात,तुटल्या तर, खाली पडेल,नरेंद्रचे हातपाय मोडतील या काळजीने त्यांनी सांगितले,”नरेंद्र,खाली उतर,पुन्हा या झाडावर चढू नकोस”, त्यावर नरेंद्रने विचारले,”का? चढले तर काय होईल?यावर काहीतरी भीती आताच घालून ठेवली तर बरे होईल या हेतूने बसू म्हणाले,”या झाडावर ब्रम्हरक्षस आहे, मोठा भयंकर आहे, झाडावर कोणी चढलं तर तो रात्री येऊन मानगुटीवर बसतो” नरेंद्रने हे शांतपणे ऐकून घेतले आणि बसू पुढे निघून गेल्यावर तो पुन्हा झाडावर चढला, तसे मित्र म्हणाला,अरे ब्रम्हराक्षस मानगुटीवर बसेल ना? क्षणाचाही विलंब न करता, नरेंद्र म्हणाला, अरे तू काय खुळा आहेस का? आपण या झाडावर खेळू नये म्हणून असंच सांगितलंय आपल्याला, खरोखरीच ब्रह्मराक्षस असता तर तो या आधीच माझ्या मानगुटीवर नसता का बसला? असा हा घटनेच्या मुळाशी जाऊन,त्याचं स्वरूप समजावून घेण्याची नरेंद्रची वृत्ती होती.
लहान वयातच ध्यान मंदिरात ध्यानधारणा करणे हे नरेंद्र सुरुवातीला खेळ म्हणून खेळायचा. नंतर छंद म्हणून करू लागला. पण तो ध्यानासाठी बसला की सर्व देहभान विसरून जायचा. त्याला भानावर आणावे लागे.
बैराग्यांच्या मस्तकावरच्या जटांचे त्याला लहानपणी भारी आकर्षण वाटायचे. एकदा त्यानं ऐकलं होतं की बराच वेळ शिवाचं ध्यान केलं की आपल्या डोक्यावर जटा वाढतात आणि खूप लांब होऊन जमिनीत शिरतात. मग काय नरेंद्र ध्यान लावून बसला आणि आपले केस वाढताहेत का, लांब झालेत का, ते तपासू लागला. खूप वेळ झाला तरी काहीच घडेना, मग आईकडे जाऊन, “एव्हढा वेळ झाला तरी जटा का वाढत नाहीत?असे विचारले. आईने सांगितले, इतका थोडा वेळ ध्यान केल्याने जटा वाढत नसतात, त्यासाठी खूप दिवस जावे लागतात,”अशा घटनातून नरेंद्रला संन्यासी आणि बैरागी यांच्या बद्दल मनातून ओढ असायची हे दिसते. संन्याश्या चे नाते शिवाशी असते असे त्याला माहिती होते.
एक दिवस त्याने आपल्या अंगावर भस्माचे पट्टे काढले,कपाळावर टिळा लावला,कमरेभोवती एक भगव्या रंगाचे कापड गुंडाळले,आणि “हे बघा मी शिव झालो,”असे आनंदाने ओरडत घरभर उड्या मारू लागला.ही नकळत असलेली ओढ पाहून भुवनेश्वरींना मनातून धास्ती वाटली,की आपला हा मुलगा आजोबांच्या मार्गाने जाऊन संन्यासी तर होणार नाही ना?
मोठा होता होता नरेंद्र युवावस्थेत येईतो लहानपणीचे ध्यान लावणे, मित्रांना जमवून गप्पा मारणे, चर्चा करणे, गंगेवर जाणे हे प्रकार पुढे परिपक्वतेने होऊ लागले. ज्ञानाच्या आधारे होऊ लागले.
दिखाऊपणा किंवा उथळपणा त्यांच्या वृत्तीत मुळातच नव्हता, केवळ उत्तम कपडेलत्ते घालून मिरवणे म्हणजेच आपले सर्वस्व समजणारी मुले/मित्र यांचा त्याला खूप तिटकारा होता. कुठल्याही मिळमिळीत गोष्टी करमणुकीसाठी का असेना, नरेंद्रच्या जीवनात त्याला स्थान नव्हते.
त्याच्या संन्यस्त वृत्तीचा युवा अवस्थेतला एक बोलका प्रसंग आहे. ‘शांतपणे अभ्यास करायला नरेंद्र आपल्या आजीच्या घरी अधून मधून जात असे, माडीवरच्या खोलीत तो अधून मधून गाणी पण म्हणत असे. गाणे चालू असताना, एकदा समोरच्या घरांत एक वैधव्य आलेली तरुण मुलगी नरेंद्रच्या मधुर आणि धुंद स्वरांनी भान हरखून गेली आणि क्षणात बाहेर पडून,नरेंद्र गात होता त्या खोलीच्या दारात येऊन उभी राहिली,एक नवयौवना आपल्या दाराशी येऊन आपल्याला निरखते आहे हे कळताच नरेंद्र तत्परतेने उठून तिच्या पायाशी वाकून तिला प्रणाम करत म्हणाला,”माताजी का आला होतात? काय काम होतं? मोकळेपणाने सांगा, मी तुम्हांला माझ्या आईच्या जागीच मानतो” यातून व्यक्त झालेला अर्थ त्या मुलीने समजायचा तो समजला आणि दुसऱ्याच क्षणी निमुटपणे घरी निघुन गेली. नरेंद्रने त्या दिवसापासून अभ्यासाची खोली बदलली, पुन्हा कधीही तो तिथे बसला नाही, या तरुण वयात संन्यस्त वृत्तीच्या प्रकृतीचा आविष्कार एका क्षणात घडला होता. ही नरेंद्रच्या आंतरिक अध्यात्मिकतेची च खूण होती.
© डॉ.नयना कासखेडीकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈