डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 16 – मी कोण होऊ? ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

आपल्याकडची सामाजिक परिस्थिति बघून नरेंद्र ने सामाजिक कामात लक्ष घालायचे ठरवले होतेच .त्याप्रमाणे शहरातील सामाजिक घडामोडींवर तो लक्ष ठेऊन होता. यावेळी ब्राह्मो समाजाचे काम पण सुरू झाले होते. हिंदू धर्मातील बराचसा भाग कालबाह्य रूढीवर आधारलेला होता. असे दिसत असले तरी आधुनिक काळात उपयोगी असलेल्या अशा पुष्कळ गोष्टी भारतीय अध्यात्मविचारात होत्या. आणि पश्चात्यांकडच्या चांगल्या गोष्टी आपण स्वीकाराव्यात अशाही होत्या. त्या समाजाला माहिती करून देणं आवश्यक होतं.

मग राजाराम मोहन राय यांनी सुवर्ण मध्य काढून ब्राह्मो समाज स्थापन केला. इथे पारंपरिक धर्मात सुधारणा करण्याचा उद्देश होता. धर्म सुधारला तर आचरण सुधारेल, आचरण शुद्ध झाले तर, सामाजिक प्रगतीचा पाया घातला जाईल. पुढे पुढे अनेक सुधारणा व कार्य या ब्राह्मो समाजाने केलं. त्यात जातीभेद निर्मूलन, सर्व मानव समानता, स्त्री शिक्षणाला महत्व, विवाहाची वयोमार्यादा वाढवणे, मिशनर्‍यांच्या कार्याला आळा घालणे अशी कामे होत होती. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, केशवचंद्र सेन हे तरुणांच्या स्फूर्तीस्थान बनले होते.

ब्राह्मो समाजाचे काम नरेंद्रला आवडत होते. सामाजिक सुधारणा या उद्दिष्टामुळे तो याकडे आकर्षित झाला होता. पण त्याची अध्यात्माची ओढ तशीच कायम होती. ती कमी नाही झाली. ईश्वर विषयक जिज्ञासा पण कायम होती. उलट जस जसे वाचन होत होते, अनुभव मिळत होता तसतसे त्याची चिकित्सक वृत्ती जास्तच धारदार झाली होती. कारण त्याच्या अंत:करणात अध्यात्मिकतेचा नंदादीप लहानपणापासून सतत तेवत राहिला होता. याही काळात त्याची ध्यानधारणा चालूच होती.

रोज रात्री अंथरुणावर पडल्यावर त्याला आपल्या भावी जीवनाचे प्रश्न सतावत असत. जीवनात आपण काय करावयाचे? कोण व्हायचे? आपल्याला काय साध्य करायचे आहे ? आणि मग त्याच्या डोळ्यासमोर याचे उत्तर म्हणून दोन चित्रं उभी राहत. एक म्हणजे, लौकिक जीवनात सर्वार्थाने यशस्वी आणि कीर्तीमंत झालेला कर्तृत्ववान पुरुष. ज्याच्याकडे उत्तम ज्ञान आहे, समाजात ज्याला श्रेष्ठ स्थान आहे. सत्ता अधिकार आहे. पायाशी लक्ष्मी दासी होऊन उभी आहे. असा यशस्वी पुरुष.

आणि दुसरे चित्रं म्हणजे, याच्या अगदी उलटे. अंगावर भगवी वस्त्रे घालून हातात दंड, दुसर्‍या हातात कमंडलू, निर्मोही, निर्लेप आणि तृप्त वृत्तीने संचार करणारा सर्वसंगपरित्यागी सन्यासी. आपण संकल्प केला  तर असा सन्यासी होऊ शकू. ते आपल्याला शक्य आहे अशी त्याला खात्री पण वाटत असे. संन्यासी का यशस्वी पुरुष? असा प्रश्न आलटून पालटून त्याच्या मनात सतत येत असायचा. असा विचार करता करता केंव्हा झोप लागायची ते कळायचेही नाही.

“शय्या भूमितलं दिशो~पि वसनं ज्ञानामृतं भोजनं” असे भर्तृहरींनी वर्णन केल्याप्रमाणे, ‘भूमी हीच शय्या, मोकळ्या दिशा हेच अंगावरील वस्त्र, आणि अमृतरूप आत्मज्ञान हेच भोजन’. असा पूर्णकाम संन्यासी एक साक्षात्कारी पुरुष असतो. साक्षात्कारी पुरुष म्हणजे ज्याला ईश्वराचे दर्शन झाले आहे तो. नरेंद्रला वाटे ईश्वर दर्शनाचा मार्ग कोण सांगू शकेल? ज्याला स्वताला ईश्वराचे दर्शन झाले आहे तोच आणि इथेच त्याच्या मनात तीव्र इच्छा निर्माण होई की, आपल्याला असे सांगणारा कोणीतरी भेटावा ज्याने देव पहिला आहे. अशी तळमळ त्याला सतत अस्वस्थ करीत असे. जे अधिकारी व श्रेष्ठ असे भेटत त्यांनाही तो जाऊन थेट प्रश्न विचारात असे. हे जाणून घ्यायला तो व्याकुळ व्हायचा.

याच वेळी नरेंद्रच्या लग्नासाठी विषय सुरू झाला होता. भुवनेश्वरी देवी आणि विश्वनाथ बाबू यांनी नरेंद्रला सर्व प्रकारे सांगून बघितले, चांगली स्थळ आणली. अनेक विद्वान व वडीलधार्‍यांनी समजाऊन सांगितले. पण नरेंद्रचा विवाहाला नकार कायम होता.

या वयात आपल्या आयुष्याचा इतका गंभीर पणे विचार करणे खरच किती आश्चर्याची गोष्ट होती. आजचा ग्रज्युएट होत असलेला तरुण आज त्याच्या आयुष्याच्या अशा वळणावर काय विचार करतो ? भविष्याबद्दल त्याला काही अंदाज बांधता येतात का? असा विचार मनात येतो.

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments