डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 17 – उपदेश ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

नरेंद्र आणि श्री रामकृष्ण यांची पहिली भेट १८८१ च्या डिसेंबरमध्ये दक्षिणेश्वरला झाली. ‘मन चलो निज निकेतने’, म्हणजे, ‘हे माझ्या मना आपल्या घरी परत चल’,आणि ‘जाबे की दिन अमार विफले चलीये’, म्हणजे, ‘माझे सारे दिवस असे व्यर्थच जाणार काय? अशी दोन बंगाली गीतं नरेन्द्रने मोठ्या आर्ततेने म्हटली आणि नरेंद्रचे व्यक्तिमत्व वेगळेच होते, कलकत्त्याच्या भौतिक शहरातून आलेला असूनही आध्यात्मिक धारणा असलेला नरेंद्र बरोबरच्या मित्रांमध्ये  वेगळा उठून दिसत होता. जे रामकृष्णांना  अत्यंत भावले होते. नरेंद्रचे भजन म्हणणे इतरांहून निराळे होते. त्या आर्त स्वरांनी श्री रामकृष्णांच्या अंत:करणाची तार छेडली गेली होती. “पहा पहा साक्षात सरस्वती त्याच्या उज्ज्वल दर्शनात प्रकट होत आहे”. असे उद्गार त्यांनी यावेळी भक्तांसमोर काढले होते.

नरेंद्रचे सुप्त आध्यात्मिक गुण रामकृष्णांनी ओळखले होते. त्यांनी नरेंद्रला विचारले, “रात्री झोपी जाताना डोळ्यासमोर प्रकाश दिसतो का?” नरेंद्र म्हणाला, “हो दिसतो”. त्यावरून रामकृष्णांनी ओळखले की हा जन्मत:च ध्यानसिद्ध आहे. पहिल्या भेटीतच रामकृष्ण नरेंद्रला म्हणाले होते, “किती उशीर केलास? प्रपंचात बुडालेल्या या सार्‍या लोकांच्या कथा ऐकून माझे कान किटून गेले आहेत. माझ्या खोल मनातील अनुभव ऐकून समजून घेणार्‍याची मी कधीची वाट पाहतोय. हे प्रभो मी जाणून आहे, की नारायणाचा अवतार असा जो प्राचीन नर ऋषि तो तू आहेस आणि मानव जातीच दु:ख हरण करण्यासाठी या पृथ्वीवर जन्म घेऊन आला आहेस”. आपलं असं कौतुक ऐकून नरेंद्र गोंधळून गेला होता.      

पुढे अजून भेटी झाल्या. रामकृष्णांना नरेंद्रची भेट रोज व्हावी असे वाटू लागले. श्रीरामकृष्णांच्या  रूपाने देव पाहिलेली व्यक्ती आपल्याला अखेर भेटली याचा आनंद नरेंद्रला झाला होता. वेगवेगळे अनुभव येत होते. नरेंद्र ब्राम्ह समाजात जात होताच. मूर्तिपूजा निषेध हा तिथल्या सिद्धांतापैकी एक सिद्धांत होता. इकडे श्री रामकृष्ण तर, कालिमाता मानणारे, तिन्ही त्रिकाल  पूजाअर्चा करणारे मूर्तिपूजक होते. मनात द्वंद्व चालू होतच. या सगळ्याचा मेळ लावायचा नरेंन्द्र प्रयत्न करत होता. काहीतरी सखोल अनुभूति त्यांच्यात आहे हे जाणवत होते. पवित्र अंत:करणाचा, सर्व मानवजातीने आदर करावा अशा योग्यतेचे ते आहेत असे मनाला पटले आणि नरेन्द्रने त्यांना मनोमन नमस्कार केला. जवळ जवळ चार वर्षे नरेंद्रला श्रीरामकृष्णांच्या सहवासात येऊन झाली होती.

श्रीरामकृष्ण यांच्याकडे रोज भक्तगण येत असत. त्यांच्याशी ते संवाद साधत असत, एखादा अवघड सिद्धांत स्पष्ट करताना ते छोट्या छोट्या कथांचा वापर करत आणि समजावून  सांगत असत. त्यांचे बोलणे हे नुसत्या ग्रंथांतील सिद्धांताच्या आधारवर नसे तर ते स्वत:च्या अनुभवावर आधारित असायचे. एकदा असेच भक्तांशी संवाद चालू असताना श्रीरामकृष्ण सांगत होते, “लोक आपल्यावर टीका करतील, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करावे. आणि आपला मार्ग सोडू नये. कुत्री भुंकत असतात पण हत्ती आपल्या मार्गाने जात राहतो तशी आपली वृत्ती असावी”. असे विवेचन चालू असताना त्यांनी नरेंद्रला विचारले, काय नरेन तुला काय वाटतं ?ईश्वराची भक्ती करणार्‍यांची संसारी लोक त्यांच्या मागे निंदा नालस्ती करतात. तुझ्या माघारी लोक तुझ्याबद्दल वाईट बोलू लागले तर, तू काय करशील”? नरेन्द्रने उत्तर दिले, “ ती माणसं म्हणजे,उगाच भुंकणारी कुत्री आहेत. असं म्हणून मी त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करीन”. यावर श्री रामकृष्ण म्हणतात, “नाही नरेन एव्हढी कठोर प्रतिक्रिया होता कामा नये. अचेतन सचेतन अशा सार्‍या चराचरात तो ईश्वर भरून राहिलेला आहे. तेंव्हा कोणी  कसाही वागो, त्याच्याबद्दल योग्य तो आदर आपण ठेवला पाहिजे”.लोकांच्या टीकेकडे आपण दुर्लक्ष करावे. खरे पण त्या टीका करणार्‍यांबद्दल ही आपण आपल्या मनात दुजाभाव धरू नये. जो वाईट वागतो, त्याचेही आपण हिताच चिंतावे. असा उपदेश यातून दिसतो.

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments