सौ. गौरी गाडेकर
विविधा
☆ वक्ता दशसहस्रेषु ☆ सौ. गौरी गाडेकर ☆
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. त्यापैकी ‘वक्ता’ हा एक झळाळणारा पैलू. तो त्यांनी कष्टपूर्वक साध्य केला होता.
त्यांचं पहिलं भाषण म्हणजे चौथीत असताना वर्गात सांगितलेली गोष्ट. पाठ केलेलं आठवेना. मग प्रत्येक वाक्यानंतर ‘झालं’-‘झालं’ करत पुढचं वाक्य
आठवायचे. मग ‘झालं’ म्हटलं, की वर्गात हशा पिकू लागला. अभावितपणे का होईना, त्यांच्या विनोदी भाषणाची मुहूर्तमेढ अशी रोवली गेली.
पुढे इंग्रजी चौथीत गेल्यावर त्यांनी वक्तृत्वस्पर्धेत भाग घेतला. भाषण तोंडपाठ केलं. खणखणीत आवाजात त्यांनी केलेल्या या भाषणाने टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. त्यांना पहिलं बक्षीस मिळालं. ‘हशा आणि टाळ्या’मधल्या टाळ्यांची ही सुरुवात.
यामुळे त्यांचा आत्मविश्वास एवढा वाढला, की पुढची लागोपाठ तीन वर्षे ते वक्तृत्वस्पर्धेत पहिले येत राहिले.
काही विद्यार्थी सासवडला दरवर्षी नाटक करीत. तेव्हा पडद्याबाहेर येऊन, प्रेक्षकांना “आणखी एक अंक झाल्यावर नाटक संपेल,” हे प्रेक्षकांना सांगण्याचे काम अत्रे करत. त्यामुळे पूर्वतयारी न करता बोलायची सवय झाली व श्रोत्यांचे भय वाटेनासे झाले.
कॉलेजच्या चार वर्षांत त्यांनी मोठमोठ्या वक्त्यांची व्याख्याने काळजीपूर्वक ऐकून त्यांचा अभ्यास केला.
लोकमान्य टिळक, शिवरामपंत परांजपे, केशवराव छापखाने, श्रीकृष्ण नीलकंठ चापेकर, दादासाहेब खापर्डे, अच्युतराव कोल्हटकर वगैरे वक्त्यांच्या वक्तृत्वशैलीचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. त्यापैकी खापर्डे व कोल्हटकरांच्या वक्तृत्वाचा अत्रेंच्या मनावर अतिशय परिणाम झाला.
दादासाहेब खापर्डे हे त्या काळातील एकुलते एक विनोदी वक्ते होते. घरगुती पद्धतीने गोष्टी सांगत ते श्रोत्यांना हसवत, तल्लीन करून टाकत.पण त्यांच्या व्याख्यानात विनोदाखेरीज इतर रसांचा परिपोष कमीच असे.
अच्युतराव कोल्हटकर मात्र कोणत्याही रसाचा परिपोष लीलया करत. प्रभावी व्यक्तिमत्त्व, ऐट,वजनदार आवाज, वाङ्मयीन संदर्भ देत केलेले मार्मिक, परिणामकारक बोलणे यांची श्रोत्यांवर छाप पडे. पहिल्या दोन-चार वाक्यांतच ते टाळ्या घेत किंवा हशा पिकवत. पुढे भाषणातील रस आणि गती ते अशी काय वाढवत नेत, की मुख्य मुद्दा आला की टाळ्यांचा प्रचंड गडगडाट होई. त्या काळात ते अग्रगण्य राजकीय वक्ते होते. अत्रे त्यांना गुरुस्थानी मानत.
पुढची काही वर्षे अत्रेंची भाषणे फारशी ‘जमली’ नाहीत.
बी.टी. चा पद्धतशीर व जीवन तोडून अभ्यास केल्यामुळे ते पहिल्या वर्गात पहिले आले. त्यांचा आत्मविश्वास वाढला.
‘गडकरी स्मृतिदिना’निमित्त दिलेल्या व्याख्यानात, कोणतीही तयारी न करता, गडकऱ्यांची व आपली पहिल्याने ओळख कशी झाली, ते घरगुती भाषेत सांगून (दादासाहेब खापर्डे शैलीत) श्रोत्यांचे ‘हशे’ मिळवले.उत्तरार्धात अच्युतराव कोल्हटकरांप्रमाणे नाटकी स्वर वाढवून कडकडून टाळ्या घेतल्या. या व्याख्यानापासून, त्यांच्या विशिष्ट शैलीची सुरुवात झाली.
पुढे इंग्लंडमध्ये सुप्रसिद्ध शिक्षणशास्त्रज्ञ डॉ. पी. बी. बॅलार्ड यांची व्याख्याने अत्रेंनी ऐकली व अभ्यासली. मानसशास्त्रासारखा अवघड विषय ते गोष्टी सांगून मनोरंजक करीत.
इंग्लंडहून परत आले, तेव्हा त्यांचे शरीर भारदस्त झाले होते.ही वक्त्यासाठी जमेची बाजू.
गडकरी स्मृतिदिनाचे अध्यक्ष म्हणून अत्रेंनी ठणठणीत आवाजात व स्पष्ट भाषेत बोलायला सुरुवात करून तिसऱ्याच वाक्यात कोटी केली, तेव्हा हास्याचा प्रचंड स्फोट झाला. नंतरही दोन-तीन वाक्यांनंतर ‘हशे’ घेत राहून श्रोत्यांना कह्यात घेतलं. मधेच काही कारणाने सभा बिनसते की काय, अशी भीती वाटल्यावर विनोद सोडून देऊन ‘अच्युतरावी’ पद्धतीचा अवलंब केला. एकूण, वक्ता म्हणून त्यांना लोकांनी डोक्यावर घेतले.
गर्दीचे मानसशास्त्र अत्रेंना पक्कं ठाऊक होतं. ठणठणीत आवाजात पहिलं वाक्य बोललं, की वक्ता घाबरलेला नाही, याची खात्री पटून श्रोते शांत होतात. पहिल्या दोन-चार वाक्यांत त्यांना हसवलं, की पुढचा मार्ग मोकळा.
काही श्रोत्यांना मध्येच काहीतरी बोलण्याची सवय असते. त्याचा अगोदरच अंदाज बांधून त्यांची उत्तरे अत्रे आधीपासूनच ठरवून ठेवत. श्रोत्यांवर मात्र त्या प्रसंगावधानाचा प्रभाव पडे.
श्रोत्यांनुसार ते आपली वक्तृत्वशैली ठरवत असत. लहान मुलांसमोर सोपे, बुद्धिमान कॉलेजयुवकांसमोर विनोदी, तर गंभीर चेहऱ्याच्या प्रौढ व वृद्ध लब्धप्रतिष्ठितांसमोर प्रारंभीच ते वीररसाचा अवलंब करत असत.
सुरुवातीला अत्रे व्याख्यानाचे सर्व मुद्दे, संदर्भ, कोट्या यांची नोंद करून, टिपणे नीट तोंडपाठ करून, टिपणे हातात न घेताच ते तसंच्या तसं बोलत. नंतरनंतर मात्र व्याख्यानाला जाण्यापूर्वी पाच- दहा मिनिटे मनातल्या मनात मुद्द्यांची उजळणी करत.
राजकीय विषयांवर, पन्नास हजारांपासून एक लाखपर्यंत श्रोत्यांसमोर बोलताना विनोदी पद्धती, बेडर वृत्ती व ठणठणीत प्रकृती यांचा अत्रेंना खूपच फायदा झाला.
अत्रेंच्या मते व्याख्यान रंगणे हे वक्त्यापेक्षा जास्त श्रोत्यांवर अवलंबून असतं.
दहा हजार माणसांत एखादाच वक्ता सापडतो, या अर्थाचं एक संस्कृत सुभाषित आहे. पण अत्रेंच्याच शब्दांत सांगायचं, तर अत्रेंसारखा वक्ता गेल्या दहा हजार वर्षांत झाला नाही आणि पुढच्या दहा हजार वर्षांत होणार नाही.
© सौ. गौरी सुभाष गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈