डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 26 – परिव्राजक –४. हिमालयाच्या वाटेवर ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

आज आपले ओळखपत्र/आय डी प्रुफ, सगळीकडे दाखवावे लागते. ती एक सिक्युरिटी चेक सिस्टिम आहे.यावरून तुम्ही कोण आहात? कुठले आहात? कुठून कुठे चालला आहात? असे कुठे विचारले तर राग यायचे काहीच कारण नाही. आपल्याच देशात आपल्याच सुरक्षिततेसाठी हे आहे. प्रवास करतांना किंवा पर्यटनाला जातांना आधार कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड,ड्रायविंग लायसन्स नाहीतर अगदीच इलेक्ट्रिक बिल्ल इत्यादी आपल्याला दाखवावे लागते. पण अशी पद्धत आजची नवी नाही. स्वामी विवेकानंदांना अमेरिकेत शिकागोला गेले तेंव्हा ही परिचय पत्र न्यावे लागले होते बरोबर आणि ते भारतात सुद्धा फिरले तेंव्हाही व्यवस्थे साठी ज्यांच्या कडे जायचे त्यांना कोणाचे तरी ओळखपत्र घेऊन जावे लागत होते.

हिमालयात भ्रमणासाठी जातांना ते आधी हिमालय ते तिबेट असा प्रवास करणार होते. त्यामुळे नेपाळ मध्ये असलेल्या आपल्या मित्राचे रीतसर परिचय पत्र घेऊन जायचे म्हणजे तिबेट मध्ये प्रवेश मिळण्यात अडचण येणार नाही.कारण अखंडानंदांना तशी एकदा अडचण आली होती. पण काही कारणामुळे हा मार्ग  बदलून त्यांनी अल्मोरा मार्गाने जायचे ठरवले. पहिला मुक्काम भागलपूर मध्ये झाला.  

भागलपुर मध्ये पोहोचल्यावर थकले भागलेले स्वामीजी व अखंडांनंद गंगेच्या काठी उभे होते. शेजारीच राजा शिवचन्द्र यांचे निवास होते. तेजस्वी संन्याशांकडे तिथले एक प्रतिष्ठित कुमार नित्यानंद सिंग यांचे लक्ष गेले. त्यांनी ती रात्र दोघांना घरी ठेऊन घेतले आणि दुसऱ्या दिवशी त्यांना बाबू मन्मथनाथ यांच्याकडे घेऊन गेले. त्यांना वाटले असतील कोणी साधूबैरागी त्यामुळे फार लक्ष दिलं नाही. आणि जेवणं झाल्यावर बौद्ध धर्मावरील इंग्रजीतल पुस्तक वाचत बसले. स्वामीजींनी विचारले की, कोणतं पुस्तक वाचताहात? मन्मथबाबूंनी नाव सांगून विचारलं तुम्हाला इंग्रजी येतं का? स्वामीजी म्हणाले थोडंफार येतं. यानंतर जो संवाद झाला त्यात स्वामीजींनी बौद्ध धर्मावर चर्चा करतांना अनेक इंग्रजी ग्रंथांचे संदर्भ दिले. मन्मथबाबू  चकित झाले. त्यांच्या लक्षात आलं हा तरुण संन्यासी आपल्यापेक्षा हजार पटींनी हुशार आहे.

आणखी एक दिवस, योगसाधनेवर चर्चा झाली. यावर स्वामीजींनी व्यक्त केलेले विचार मन्मथबाबूंनी यापूर्वी आर्य समाजाच्या स्वामी दयानन्द सरस्वतीं कडून ऐकलेल्या विचारांशी मिळतेजुळते होते. पण यावेळी अजूनही नवीन ऐकायला मिळाले त्यांना. त्यानंतर त्यांनी उपनिषदांचा विषय काढला. स्वत:जवळची उपनिषदावरची पुस्तके समोर ठेवली आणि त्यातील एकेक वचने काढून अर्थ विचारू लागले. स्वामीजींनी दिलेल्या उत्तरामुळे मन्मथबाबू चकितच झाले. स्वामीजींची तर याबाबत मोठी तपस्या आणि साधना होती हे त्यांना माहिती नव्हते.

एकदा स्वामीजी असेच गुणगुणत होते. बाबूंनी लगेच विचारलं तुम्हाला गाणं येतं का? स्वामीजी उत्तरले,” अगदी थोडंफार येतं.” बाबूंनी आग्रह केल्यामुळे स्वामीजींनी काही गीतं म्हटली. बाबू आश्चर्याने स्तिमित झाले. अरे या संन्याशाला जितकं गहन शास्त्राचं ज्ञान आहे तितकाच संगीतासारख्या कलेवर सुद्धा त्यांचं प्रभुत्व आहे . झालं दुसऱ्याच दिवशी मन्मथबाबूंनी भागलपुर मधल्या संगीतप्रेमींना घरी बोलवलं. त्यात काही संगीत उस्ताद पण होते. रात्री नऊ पर्यन्त कार्यक्रम संपेल असे त्यांना वाटले. पण संगीत श्रवणाच्या आनंदात कोणाला जेवणाखाण्याचे व वेळेचे भान नव्हते उरले. रात्री दोन वाजता कार्यक्रम संपला. सर्वजण तिथेच थांबले आणि दुसऱ्या दिवशी गेले. केवळ आठ दिवसाच्या वास्तव्यात स्वामीजींचे निरासक्त, निसंग, वैराग्यशीलता ,विनम्रता हे विशेष गुण आणि त्यांचे,चर्चांमधून, प्रतिक्रियातून आणि काही प्रसंगातून विविधरंगी आणि समृद्ध व्यक्तिमत्व आपल्याला दिसतं.

एव्हढ्याशा काळातल्या अनुभवावरून मन्मथबाबूंच्या मनावर स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाचा खोलवर ठसा उमटला. खरं म्हणजे ते कट्टर ब्राह्मसमाजी होते. पण या काळात ते आतून बाहेरून पूर्ण बदलले आणि पुन्हा हिंदू धर्माचे चाहते झाले. एव्हढे की पुढे आयुष्यभर दोघांचाही खर्च स्वत: करून स्वामीजींच्या सहवासात वृंदावनला कायमचे राहण्यास तयार झाले. पण स्वामीजींनी त्याला नम्रतेने नकार दिला. इथल्या नाथनगरमध्ये असलेल्या जैन मंदिराला स्वामीजींनी भेट दिली. तिथल्या जैन आचार्यांशी जैन तत्वज्ञानवर चर्चा केली. मन्मथबाबूंकडे राहणारे मथुरानाथ सिन्हा म्हणतात की, ” धर्म आणि तत्वज्ञान यावर झालेल्या चर्चेतून ज्ञान आणि अध्यात्मिकता  हे जणू स्वामीजींचे श्वासोच्छवास आहेत आणि त्यांच्या सर्व विवेचनात उत्कट आणि नि:स्वार्थी देशप्रेमाची भावना आहे.

मन्मथबाबू आपल्याला सोडत नाहीत असे पाहून स्वामीजींनी ते घरात नसताना जाण्याचे ठरवले तेंव्हा, बाबू घरी आल्यावर ते पाहून अस्वस्थ झाले आणि लगेच त्यांच्या मागोमाग त्यांना गाठायला निघाले. पण स्वामीजी हिमालयात अल्मोऱ्या पर्यन्त गेले होते. हे ऐकून ते अल्मोऱ्या पर्यन्त गेले तरीही स्वामीजींना ते गाठू शकले नाहीत. शेवटी निराश होऊन मन्मथबाबू भागलपुरला परत आले. स्वामींजीच्या आठवड्याच्या सहवासातून मन्मथबाबूंसारख्या थोडी आध्यात्मिक संवेदनशीलता असलेल्या सुशिक्षित व्यक्तीवर केव्हढा प्रभाव पडला होता याच हे बोलकं उदाहरण आहे. जे स्वामीजींना भेटत ते त्यांचेच होऊन जात.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments