डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग-२९ परिव्राजक –७.मीरत / मेरठ ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

 हिमालयातील भ्रमंती, खाण्यापिण्याची आबाळ, कठोर साधना यामुळे स्वामीजींची प्रकृती खालावली. ते अतिशय कृश दिसत होते. तसं अल्मोरा सोडल्यापासूनच अधून मधून त्यांना ताप येत होता. पुरेशी विश्रांती मिळत नव्हती. नीट उपचार मिळाले नव्हते. मिरतचे डॉक्टर त्रैलोक्यनाथ घोष यांच्या उपचाराने आणि पंधरा दिवसांच्या विश्रांतीने स्वामीजींना बरे वाटू लागले. इतर गुरुबंधु पण इथे एकत्र आले. आणि सर्वजण शेठजींची बाग इथे राहायला गेले. शेठजींनी सर्व संन्याशांची आपल्या घरी निवासाची व्यवस्था केली होती. सगळे हाताने स्वयंपाक करीत. बाकी वेळ अध्यात्म चिंतनात जाई.

निरनिराळ्या दिशांना भ्रमण करत असलेले, स्वामीजी, ब्रम्हानंद, सारदानंद, तुरीयानंद, अखंडानंद, अद्वैतानंद, आणि कृपानंद असे सर्व गुरुबंधु वराहनगर मठ सोडल्यानंतर खूप दिवसांनी एकत्र आले होते. त्यामुळे मिरतचे हे वास्तव्य सर्वांनाच आनंद देणारे होते. भजन, ध्यानधारणा, शास्त्रांचे पठन याबरोबर संस्कृत आणि इंग्रजी मधल्या श्रेष्ठ साहित्य कृतींचे वाचन असा त्यांचा कार्यक्रम असे. मेघदूत, शाकुंतल, कुमारसंभव, मृच्छकटिक यांचे वाचन सर्वांनी मिळून केले.

मिरतमध्ये एक ग्रंथालय होतं. तिथून स्वामीजींनी अखंडानंदांना सर जॉन लुबाक यांचे ग्रंथ आणायला सांगितले. त्यानुसार अखंडानंद त्या ग्रंथलयातून रोज एक ग्रंथ घेऊन जात. स्वामीजी तो पूर्ण वाचून काढत आणि लगेच दुसर्‍या दिवशी परत ग्रंथालयात घेऊन जात. तो देऊन लगेच दूसरा ग्रंथ आणायला सांगत. असा रोजचा क्रम पाहून ग्रंथपालाला एक दिवस शंका आली. फक्त वाचनाचा देखावा करण्यासाठी ग्रंथ घेऊन जातात आणि लगेच परत आणून देतात अशी शंका त्यांनी अखंडानंदांकडे बोलून दाखविली, ती स्वामीजीनांही कळली. स्वामीजी त्या ग्रंथपालाला जाऊन भेटले आणि म्हणाले, “मी जे ग्रंथ आता वाचले आहेत त्या बद्दल काहीही आणि कोणताही प्रश्न मला विचारा. आणि काय, त्यांना विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरं स्वामीजींनी लगेच दिली. ग्रंथपाल हे बघून आश्चर्य चकित झाला. आणि अखंडानंद सुद्धा. त्यांनी विचारले तुम्ही इतकं वेगात कसं काय वाचू शकता? स्वामीजी म्हणाले, मी एकेक असा शब्द वाचत नाही. तर, संपूर्ण वाक्य एकदम वाचतो. कधी कधी याच पद्धतीने मी परिच्छेदामागून परिच्छेद वाचतो. एका दृष्टीत तो समजून घेऊ शकतो.”

इथे आपल्या लक्षात येत की, वाचण्यासाठी नुसता वेग नाही तर मन एकाग्र करण्याचे असाधारण सामर्थ्य स्वामीजींकडे होतं. त्यामुळेच ते असं करू शकत होते. म्हणजेच कोणतीही गोष्ट करतांना मनाची एकाग्रता होणं अत्यंत आवश्यक असतं.

इथे मिरतला म्हणजे आजचे मेरठला उद्यानगृहात झालेली राहायची आणि दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था, गुरु बंधूंचा सहवास, ध्यानधारणा आणि अध्यात्म संवाद, उत्तमोत्तम ग्रंथांचा आस्वाद व काव्यशास्त्रविनोद यांचा लाभ. एव्हढं सगळं असताना चिंता कसली? असे त्यांचे दोन महीने अतिशय आनंदात आणि दीर्घकाळ स्मरणात राहणारे गेले.

स्वामी तुरीयानंदांनी या आठवणी सांगताना म्हटले आहे, “मिरतच्या वास्तव्यात स्वामीजींनी आम्हाला, साधी चप्पल दुरुस्त करण्यापासून ते चंडीपाठ म्हणण्यापर्यंतचे सारे शिक्षण दिले. एकीकडे वेदान्त व उपनिषदे किंवा संस्कृतमधली नाटके यांचं वाचन चाले, तर दुसरीकडे जेवणातील पदार्थ कसे तयार करायचे त्याचे धडे ते आम्हाला देत.” एके दिवशी त्यांनी स्वत: पुलाव तयार केला होता. इतका स्वादिष्ट झाला होता. आम्हीच तो सारा संपऊ लागलो. तर स्वामीजी म्हणाले, “मी खूप खाल्लेलं आहे. तुम्ही खाण्यात मला समाधान आहे. सगळा पुलाव खाऊन टाका.” तुरीयानंदांनी ही आठवण मिरतला जाऊन आल्यावर पंचवीस वर्षानी काढली आहे. म्हणजे खरच मनावर कोरली गेलेली आठवण आहे.

असे अनेक आणखी सुद्धा अनुभव स्वामीजींनी याही वास्तव्यात घेतले. अनेक प्रकारचे लोक भेटले. आता तब्येत पण सुधारली असल्याने पुन्हा त्यांची परिव्राजकतेची प्रेरणा उफाळून आली, पण हिमालयात आता एकट्याने जाऊ शकणार नव्हते. मग दुसरीकडे जावे असं मनात आलं. पण प्रबळ इच्छा होती ते एकट्याने फिरण्याचीच. कारण श्रीरामकृष्ण यांनी दिलेल्या आदेशाचं पालन करून पुढची कार्याची दिशा ठरवण्याचं भान सतत त्यांना होतं. त्यांनी सर्व गुरुबंधूंना जाहीर सांगितलं की, आता यानंतर मी एकटाच फिरणार आहे कोणीही माझ्याबरोबर येण्याचा प्रयत्न करू नये. अखंडानंदांना याचं सर्वात वाईट वाटलं. तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही असं त्यांनी म्हणताच स्वामीजींनी समजूत घातली, “गुरुबंधूंचं सान्निध्य हा देखील आध्यात्मिक प्रगतिमध्ये एक अडसर ठरू शकतं. तोही एक मायेचा पाश आहे. तुमच्या बाबतीत तो अधिक बलवान होऊ शकतो.”

आता स्वामीजी दिल्लीला आले. भारताच्या प्राचीन काळापासूनचा इतिहास त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला. दिल्लीहून ते राजस्थान कडे निघाले. आता खर्‍या अर्थाने ते एकटेच भ्रमणास निघाले. दिल्लीच्या मोगल सत्तेशी झुंज देणारं राजस्थान. प्रत्येक प्रांतातला अनुभव वेगळा, माणसं वेगळी, वातावरण वेगळं. संस्थानाच्या राजधानीत अलवार मध्ये स्वामीजी येऊन दाखल झाले.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments