डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग ३४ परिव्राजक १२ – आदर ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

 खेतडीचे राजे अजितसिंग, वयाच्या नवव्या वर्षीच गादीवर बसलेले. हे संस्थान छोटंच होतं. त्यांच्या संस्थांनाची प्रगती आणि विकास होण्यात त्यांना अडचण वाटायची ती, अशिक्षित प्रजा. त्यामुळे त्यांना अनेक प्रश्न सतावत असत. जगमोहनलाल यांनी राजेसाहेबांची स्वामीजींबरोबर भेट ठरवली. पहिल्याच भेटीत दोघंही जुना परिचय असल्यासारखे मनमोकळे बोलू लागले. औपचारिक परिचय झाल्यावर अजितसिंग यांनी पहिलाच प्रश्न विचारला, “स्वामीजी जीवन म्हणजे काय?” स्वामीजी म्हणाले, “परिस्थितीच्या दडपणाचा प्रतिकार करत करत माणसाच्या ठायी असलेल्या आंतरिक शक्तीचा जो विकास आणि आविष्कार होतो ते जीवनाचे स्वरूप होय”. या उत्तराने प्रभावित होऊन त्यांनी पुढचा प्रश्न विचारला,“शिक्षण म्हणजे काय?” स्वामीजी म्हणाले, “मी असं म्हणेन की, विशिष्ट विचारांशी माणसांच्या जाणिवांचा जो अतूट असा संबंध निर्माण होतो, त्याला शिक्षण हे नाव द्यावं”. वा, म्हणजे फक्त अनेक विषयांची माहिती करून घेणे एव्हढाच शिक्षणाचा मर्यादित अर्थ नाही. त्यातील तत्वांमुळे जाणीव आणि भावना एकरूप होऊन जीवनाला विशेष अशी दिशा यातून मिळाली पाहिजे. तेंव्हाच त्याला खरे शिक्षण म्हणता येईल. स्वामीजींनी घेतलेल्या अनुभवावरून त्यांचे हे शिक्षणाबद्दल मत झाले होते.

यानंतर वरचेवर स्वामीजी आणि महाराज यांच्या भेटी होत राहिल्या. अनेकवेळा स्वामीजी भोजनासाठी जात. काहीवेळा काही निमंत्रित व्यक्तीही पंगतीला असत. एकदा खास भोजन आयोजित केले असताना महाराजांनी ठाकूर फत्तेसिंह राठोड, अलिगड जवळच्या जलेश्वरचे ठाकूर मुकुंदसिंग चौहान, जामनगरचे मानसिंह यांनाही बोलावले होते. या खास व्यक्तींमध्ये राजस्थान मधले समाजसुधारक हरविलास सारडा ज्यांनी तिथल्या बालविवाह प्रतिबंधित कायदा प्रयत्न करून संमत करून घेतला होता त्या काळात पुढे हा कायदा त्यांच्याच नावाने ओळखला जाऊ लागला असे लोक यावेळी उपस्थित होते.

हरविलास अजमेरचे आर्य समाजाचे अध्यक्ष पण होते. त्यांच्या याआधी स्वामीजीबरोबर अजमेर, अबू, इथेही भेटी झाल्या झाल्या होत्या. वेदान्त, स्त्रियांच्या सुधारणा, संगीत, मातृभूमीचं प्रेम आणि स्वतंत्र बाणा अशा अनेक विषयांवर चर्चा झाल्या होत्या. स्वामीजींचा त्यांच्यावरही खूप मोठा प्रभाव पडला होता.

राजे अजितसिंग यांच्याबरोबर तर त्यांचे नातेच जुळले होते. ते वयाने समवयस्कही होते. त्यामुळे घोड्यावरून रपेट मारणे, खेळ खेळणे, अशा काही गोष्टी ते एकत्र करत आणि आस्वाद घेत. स्वामीजी गाणं म्हणायला लागले की राजे स्वत: हार्मोनियमची त्यांना साथ करायला बसत. अशा प्रकारे संगीत ते तत्वज्ञानपर्यंतच्या त्यांच्या सर्व आवडीनिवडी जुळल्या होत्या. जसा राजस्थानच्या गौरवशाली इतिहासा बद्दल स्वामीजींना आदर होता तसा स्वामीजींच्या आध्यात्मिक अधिकाराचा आजीतसिंगांना आदर होता. या सहवासातून राजे अजितसिंग, जगमोहन, आणि काही जणांनी स्वामीजींकडून दीक्षा घेतली. अजितसिंग खेत्रीचे सत्ताधीश होते तरी पण, शिष्य म्हणून गुरुचं स्थान त्यांच्या दृष्टीने उच्चच होते. गुरुविषयी नितांत आदर आणि भक्ति होती. एव्हढी की, गुरुची सेवा आपल्या हातून घडावी असं त्यांना मनापासून वाटायचं.

स्वामीजी तेंव्हा राजवाडयातच राहत होते. ते झोपले असताना अजितसिंग हळूच येऊन पंख्याने वारा घालायचे, त्यांची झोपमोड होऊ नये म्हणून काळजी घ्यायचे, त्यांचे पाय दाबून द्यायचे. एकदा तर स्वामीजींना जाग आली आणि त्यांनी पाय दाबताना थांबवले तर, “माझा शिष्य म्हणून सेवा करण्याचा हक्क हिरावून घेऊ नका” असं काकुळतीला येऊन अजीतसिंगांनी त्यांना सांगितलं. भर दिवसा लोक आजूबाजूला असताना अजितसिंग स्वामीजींना गुढगे टेकवून प्रणाम करीत. इतकी नम्रता ते या पदावर असताना सुद्धा होती. पण स्वामीजींनी त्यांना या पासून परावृत्त केले कारण, नाहीतर त्यांचा प्रजेमधला जो आदरभाव होता त्याला धक्का पोहोचू शकत होता याचं भान स्वामीजींना होतं.

खेतडीला स्वामीजी दोन ते तीन महीने राहिले. गहन आणि तात्विक प्रशनाची उत्तरे स्वामीजींनी तर त्यांना दिली होतीच. पण आधुनिक विज्ञानातील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र यातील महत्वाच्या सिद्धांताचा परिचय पण त्यांना करून दिला होता स्वामीजींनी. स्वामीजींच्या सूचनेवरून राजवाड्यात एक प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. गच्चीवर एक दुर्बिण बसविण्यात आली. स्वामीजी व अजितसिंग दोघेही गच्चीतून त्याद्वारे आकाशातील तार्‍यांचे निरीक्षण करत असत. स्वामीजींचा संस्थानच्या बाहेरील सुद्धा लोकांशी संबंध येत असे. सर्वांना ते भेटत असत.

या वास्तव्यात स्वामीजींना खूप काही शिकायला मिळाले होते. एकदा राजवाड्यात नर्तकीचे गायन आयोजित केले होते. तंबोर्‍याच्या तारा जुळल्या, गाणे सुरू होणार तसे अजितसिंग यांनी स्वामीजींना ऐकायला बोलवले. तेंव्हा स्वामीजींनी त्यांना उत्तर पाठवले, आपण संन्यासी आहोत, कार्यक्रमास येऊ शकत नाही. हे त्या गायिकेच्या मनाला लागलं. तिने षड्ज लावला, आणि संत सूरदासांचे भजन म्हणण्यास सुरुवात केली. ध्रुवपद होतं,

हमारे प्रभू अवगुण चित न धरो,

समदर्शी प्रभू नाम तिहारो,

अब मोही पार करो!      

अर्थ – हे प्रभो माझे अवगुण मनात ठेऊ नका, आपल्याला समदर्शी म्हणजे सार्‍या भूतमात्राकडे समान दृष्टीने पहाणारे असे म्हणतात, तेंव्हा आपण माझा उद्धार करा .

रात्रीच्या शांत वेळी हे आर्त आणि मधुर सूर स्वामीजींपर्यंत पोहोचले. गीतातला पुढच्या ओळींचा अर्थ होता,

‘लोखंडाचा एक तुकडा मंदिरामध्ये मूर्तीत असतो, तर दूसरा एक कसायाच्या हातात सूरीच्या रूपात असतो, पण परिसाचा स्पर्श होताच,त्या दोहोंचे सुवर्ण होऊन जाते. आपण तसे समदर्शी आहात. आपण माझा उद्धार करा’.

एका ठिकाणचे पाणी नदीच्या प्रवाहात असते, तर दुसर्‍या ठिकाणी ते कडेच्या गटारातून वाहत असते.  पण दोन्ही पाणी एकदा गंगेला जाऊन मिळाले की, सारखेच पवित्र होऊन जाते. आपण तसे समदर्शी आहात, कृपा असेल तर माझा उद्धार करा’.

हे शब्द स्वामीजींच्या अंत:करणाला जाऊन भिडले. नंतर स्वामीजींनी त्या गायिकेची क्षमा मागितली. आपण बोलतो आणि वागतो त्यात विसंगती असते. या दोन्हीत एकरूपता साधायला हवी हा धडा स्वामीजींनी कायम लक्षात ठेवला. त्यांचा दृष्टीकोन बदलला.

जीवनातल्या यात्रेतल्या प्रत्येक वळणावर स्वामीजी स्वत: सतत शिकत राहिले होते आणि दुसर्‍यालाही काहींना काही देत होते. अशा प्रकारे स्वामीजींनी आता सहा महिन्यांनी खेत्रीचा जड अंतकरणाने निरोप घेतला.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Mayuressh Deshpande

वाहवा! हा लेख विशेष आवडला.