डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग – ४४ – ते … पाच आठवडे ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

आलीया भोगासी असावे सादर ! केव्हढा मोठा धक्का? ज्या सर्वधर्म परिषदेत भाग घ्यायला अमेरिकेत आलो ते ध्येय च साध्य होणार नाही? आपल्यासाठी सर्व शिष्यांनी एव्हढी धडपड केली ती सर्व व्यर्थ जाणार? मनातून स्वामीजी नक्कीच खूप अस्वस्थ झाले असतील. आपलीही चूक त्यांच्या लक्षात आली. म्हणजे या विषयीचं अज्ञान जाणवलं. कारण सर्वधर्म परिषद भरवण्याची योजना गेली दोन वर्ष चालू होती. जगातले सर्व प्रमुख धर्म, पंथ,संप्रदाय त्या त्या धर्माच्या विविध संस्था यांच्याशी पत्रव्यवहार चालू होता. त्यामुळे त्या त्या देशासाठी समित्याही स्थापन झाल्या होत्या. एव्हढच काय भारतासाठीही समिति झाली होती. पण याची तिळभरही कल्पना स्वामीजींना आणि त्यांच्या शिष्यांना नव्हती. शिवाय अशी अधिवेशने कशी भरतात,त्याची पद्धत काय असते, हे ही माहिती नव्हते. शिष्यांनाही वाटलं की एकदा अमेरिकेला पोहोचले की पुढचं सगळं आपोआप होईल. या त्रुटी लक्षात आल्या. आणखी एक महत्वाचं कारण होतं, या धर्म परिषदेसाठी केलेल्या भारतीय समितीत परंपरांबरोबर धर्माला विरोध करणारे ब्राह्म समाजाचे आणि सामाजिक सुधारणेचे पुरस्कर्ते होते. की जे स्वामीजींना पण ओळखत होते. त्यांनी महाबोधी समिति आणि जैन समिती च्या प्रतींनिधींना परवानगी दिली होती. भारतातला प्रमुख धर्म हिंदू असला तरी त्याच्या प्रतिनिधित्वाबद्दल विचार केला गेला नव्हता. दुर्दैवच म्हणावं.

परिषदेला अजून वेळ होता तोवर शिकागोतले हे थंडीचे दिवस कसे निघणार?जवळचे पैसे तर भरभर संपत होते. आता सर्वात गरज होती ती पैशांची. थंडीसाठी गरम कपडे घेण्यासाठी शंभर डॉलर्स लागणार होते. स्वामीजी हताश झाले त्यांनी अलसिंगा ना तार केली, ‘सर्व पैसे संपत आलेत उपाशी राहण्याची वेळ आली आहे’. मद्रासला अलसिंगा यांनी भरभर वर्गणी गोळा करून तीनशे रुपये आणि मन्मथनाथ यांनी पाचशे रुपये पाठवले.’ एका दुर्बल क्षणी’ आपण तार केली असे त्यांनी पत्रात म्हटले. पण त्यांचा निर्धार पक्का होता काही झाले तरी मागे हटायचे नाही. परिषदेत भाग घ्यायचाच.

इथली व्यवस्था लागेपर्यंत स्वामीजी वेळ सत्कारणी लावत होते. तिथे जे औद्योगिक प्रदर्शन भरलं होतं ते पहायला रोज जात. ते अवाढव्यच होतं. सातशे एकर जागेवर ते उभं केलं होतं. या कामासाठी दोन वर्ष, सात हजार मजूर काम करत होते. सातशे जखमी झाले, अठरा मृत्यूमुखी पडले. यावरून त्याच्या भव्यतेची कल्पना येते. त्यात वेगवेगळे विभाग होते, रचना सुंदर होती. अडीच कोटीहून अधिक लोकांनी याला भेट दिली होती. यात विज्ञानातील अद्ययावत संशोधन, त्याचा उपयोग, यंत्रे उपकरणे, हे सर्व मांडलं होतं. यातलं मानवाची बुध्दी आणि कर्तृत्व स्वामीजींना आकर्षित करणारं होतं. त्यांना ते आवडलं होतं. ते आठवडाभर रोज बघायला जात.

त्या प्रदर्शनात स्वामीजींना अनेक अनुभव आले. अमेरिकन वृत्तपत्राची नीतीमत्ता कशी याचा अनुभव आला.  कपूरथळयाचे महाराज प्रदर्शनात फिरत होते. पहिल्याच दिवशी प्रदर्शनात एक वार्ताहर एका भारतीय माणसाची मुलाखत घेत होता, तो भारतीय लोकांची अवस्था सांगू लागला, दुसर्‍या दिवशी वृत्तपत्रात ‘ हा महाराज दिसतो तसा नाही ,तो हलक्या जातीचा आहे, हे सर्व राजे ब्रिटीशांचे गुलाम आहेत, ते नैतिकतेने वागत नाहीत असं काही स्वामीजींना उद्देशून सनसनाटी वृत्त दिले, भारतातील एक विद्वान प्रदर्शनास भेट देतो अशी स्तुति करून, ते न बोललेली वाक्ये त्यांच्या तोंडी घातली होती.

त्यांच्या वेषामुळे सर्वांच लक्ष वेधलं जायचं. प्रदर्शन पाहता पाहता एकदा तर मागून कुणीतरी त्यांच्या फेट्याचं टोक ओढलं. स्वामीजींनी मागे वळून इंग्रजीतून आपली नाराजी व्यक्त केली. तसे, सद्गृहस्थ स्वामीजीना इंग्रजी येतं हे ऐकून, वरमून म्हणाले तुम्ही असा पोशाख का करता? कुतूहल म्हणून कुणी विचारलं तर ठीक, पण असा मागून ओढणं हा असभ्यपणाच. प्रदर्शन पाहताना एकदा गर्दीत तर त्यांना मागून ढकललं आणि मुद्दाम धक्का पण मारला गेला होता. असाही अनुभव त्यांना आला. वरच्या वर्गातील सुशिक्षित लोक असे वागतात याचं त्यांना आश्चर्य वाटलं.

बोस्टनला तर आणखीनच वाईट अनुभव. स्वामीजी रस्त्यावरून जात असताना त्यांना आपल्या मागून कुणीतरी येत असल्याचा भास झाला. त्यांनी मागे वळून पाहिले तर, काही मुलांचा आणि मोठ्या माणसांचा जमाव मागून येत असल्याचे दिसले ते पाहून स्वामीजी वेगात चालू लागले, तसे ते ही लोक वेगात आले. क्षणात आपल्या खांद्यावर काहीतरी आदळलं  हे कळताच स्वामीजी धावत सुटले आणि अंधार्‍या गल्लीत नाहीसे झाले. थोड्या वेळाने मागे पहिले तर तो जमाव निघून गेला होता. स्वामीजींनी सुटकेचा निश्वास टाकला. स्वामीजींना लक्षात आली पाश्चात्य देशातली वर्णभेदाची विषमता. समतेचं तत्व पाश्च्यात्यांकडून शिकावं असं भारतात अनेक वर्ष शिकवलं जात होतं. तिथेच हे अनुभव आले. पाश्चात्य संस्कृतीतल्या गुणदोषांची आल्या आल्याच जवळून ओळख होत होती. स्वामीजींवरील हा हल्ला परदेशात झाला होता . इथे प्रकर्षाने आठवण झाली ती नुकत्याच पालघर मध्ये झालेल्या निर्दोष साधूंच्यावरील हल्ल्याची. त्यात त्यांना प्राणास ही मुकावे लागले. जी सर्वसामान्य प्रत्येक माणसाला प्रचंड धक्का देणारी होती. आपल्याच देशात घडलेली ही घटना समता बंधुत्वाबद्दल काय सांगते?

आता विवेकानंदांना आर्थिक अडचण सोडवण महत्वच होतं. बोस्टनला राहील तर स्वस्त पडेल असं कळल्याने ते तिकडे जाण्याचं प्रयत्न करू लागले. स्वामीजी प्रथम जहाजातून व्हंकुव्हरला उतरून शिकागोला जाणार्‍या कॅनेडियन पॅसिफिक या गाडीत बसले तेंव्हा, स्वामीजिंना भेटलेल्या केट सॅंनबोर्न यांनी पत्ता दिला होता तो बोस्टन जवळचा होता. या पहिल्याच भेटीत ओळख झालेल्या स्वामीजींचं वर्णन करताना त्यांनी म्हटलंय की, “रेल्वेत मी विवेकानंदांना प्रथम पाहिलं, त्यांचे रुबाबदार व्यक्तिमत्व हा पौरुषाचा एक उत्तुंग आविष्कार होता. त्यांचे इंग्रजी माझ्यापेक्षाही अधिक चांगले होते. प्राचीन आणि अर्वाचीन साहित्याशी त्यांचा परिचय होता. शेक्सपियर किंवा लॉङ्गफेलो किंवा टेनिसन, डार्विन, मूलर, आणि टिंडॉल यांची वचने त्यांच्या मुखातून अगदी सहजपणे बाहेर पडत होती. बायबलमधील उतारे त्यांच्या जिभेवर होते. सारे धर्म आणि संप्रदाय याची त्यांना माहिती होती आणि त्या सर्वांविषयीची त्यांची दृष्टी सहिष्णुतेची होती. त्यांच्या सान्निध्यात असणे हेच एक शिक्षण होते”.असा ठसा त्यांच्या मनात पाहिल्याच भेटीत उमटला होता. ही एक चांगली आनंद देणारी बाब होती.

विवेकानंदांनी केट सॅंनबोर्न यांच्याकडे जाण्याचं ठरवलं आणि शिकागोहून रेल्वेने बोस्टनला आले. विश्रांगृहात थांबून त्यांनी आल्याची तार केली त्याला उत्तर आलं की, ‘आजच्या दुपारच्या गाडीने तडक इकडे या’. तिथून त्यांचे घर चाळीस किलोमीटर वर गूसव्हिल इथे होते. त्या स्वता विवेकानंदांना घ्यायला आल्या आणि त्यांना घरी घेऊन गेल्या. इथूनच सुरू झाला त्यांच्यासाठी अनुकूल घटनांचा काळ.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments