डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग ४८ – असामान्य, अद्वितीय, स्वामी विवेकानंद ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

आणि सर्वधर्म परिषद सुरू झाली. धर्मविषयक वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा होत होत्या. यात प्रामुख्याने दोन भाग केले होते, पहिला भाग होता, प्रत्येक धर्मातील तत्वचिंतन आणि विविध सिद्धांत, तर दुसर्‍या भागात, परमेश्वराचे स्वरूप, धर्माचे महत्व, ईश्वरी साक्षात्कार, परमेश्वरचा अवतार, अंनैतिकतेच्या कल्पना असे विषय ठेवले होते. या चर्चा  दहा दिवस चालल्या होत्या. तर उत्तरार्धात चर्चेचे विषय होते, कौटुंबिक जीवन, ललितकला, विज्ञानातील शास्त्रे, नीतीविषयी सिद्धांत, अखिल मानवमात्रा विषयीचे प्रेम, ख्रिस्तधर्मप्रचारक मिशनर्‍यांची कार्यपद्धती. भिन्न धर्माच्या अनुयायांनी एकमेकांना समजून घ्यावे हा हेतु होता.

परिषदेच्या चौथ्या दिवशी, बॉस्टनचे रेव्हरंड जोसेफ कुक यांनी आवेशात विषय मांडला, तो असा, “आपण ईश्वराला टाकू शकत नाही किंवा आपली सद्सद्विवेक बुद्धी बाजूला सारू शकत नाही. मानवाच्या आत्म्याला शांती देईल, आपल्या पापांचे भान राखून ईश्वरापुढे नम्र होण्यास शिकवेल, असा कोणता धर्म या पृथ्वीवर वा परलोकात कोठे असेल, तर तो ख्रिस्त धर्म हा एकमेव होय”.

याशिवाय आपल्यावरची टीका समजून घेणारे आणि त्या टीकेपासुन आपण काय शिकावे याचा विचार करणारे पण काहीजण होते. रशियातून आलेले सर्जी वोल्कोन्सकी आणि केंब्रिजचे कर्नाल थॉमस वेंटवर्ध हिगीसन्स हे दोन जण समजून घेणारे होते. धर्म आकाशा एव्हढा व्यापक आणि सर्वांचा समावेश करून घेणारा हवा असं मत त्यांनी मांडलं. तर विवेकानंदांच्या विचारांचं त्यांनी स्वागत केलं.

हिंदुधर्मातील मूर्तीपूजेवर ख्रिस्ती धर्मप्रचारकांकडून फार टीका होत असे. तिला उद्देशून बॉस्टनच्या रेव्हरंड ई.एल.रेक्सफोर्ड यांनी आपल्या निबंधात म्हटले की, “जोवर कोणतेही दैवत रूप एखाद्या व्यक्तीच्या विनम्र `मनाला आणि अंतकरणाला धरून ठेवीत आहे तोवर न्यायाच्या दृष्टीने विचार केला, तर कोणाही माणसाला त्यावर निष्ठूरपणे प्रहार करता येणार नाही . एखादी मूर्ती फोडून टाकण्याचा खरा अधिकार या जगात एकाच व्यक्तिला असतो. आणि ती म्हणजे, जीने त्या मूर्तीची पूजा केली असते. त्या मूर्तीचे आपल्या दृष्टीने आता काही काम उरले नाही हे केवळ ती व्यक्तीच म्हणू शकते. आणि हे निश्चित आहे की, जी ईश्वरी शक्ती या सर्व आकारांच्या द्वारे, कार्य करीत आहे आणि त्या सर्वांना आपले माध्यम बनवीत आहे, ती दिव्य शक्ती एखाद्या ओबडधोबड मूर्तीच्या द्वारा देखील आपल्या बालकापर्यंत पोहोचू शकते”. ख्रिस्ती धर्माचे बहुतेक सारे प्रतिनिधी हिंदू धर्मावर टीका करण्याची एकही संधी सोडत नसत.

विवेकानंदांच्या भाषणातून चैतन्य सळसळत असायचे त्यामुळे हा विलक्षण प्रभाव कसा रोखायचा ही चिंता सतत धर्मोपदेशकांना होती. म्हणून त्यांचा हिंदू धर्मावरचा हल्ला परिषद पुढे जात होती तसतसा प्रखर होत गेला.

विवेकानंदांनी आपला हिंदू धर्मावरचा निबंध नवव्या दिवशी सादर केला. सकाळपासून आरोप प्रत्यारोप,टीका असे करत विवेकानंदांना संध्याकाळी पाच वाजता व्यासपीठ मिळाले. विषय हिंदू धर्म आहे हे माहिती असल्याने कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती. सर्वजण जागा मिळावी म्हणून तासभर आधी येऊन बसले होते. काहींना प्रवेश मिळू शकला नाही इतकी गर्दी झाली. कोलंबस सभागृह गच्च भरले होते. स्त्रियांची संख्या जास्त होती.

आठवडा झाला विवेकानंद आपल्या हिंदू धर्मावर होत असलेली टीका आणि ख्रिस्त धर्माचा गौरव ऐकत आले होते. हिंदू धर्माला कमी लेखले जात होते त्यामुळे, स्वामीजींचा स्वाभिमान डिवचला गेला होता. त्यांनी या टीकेचा कठोर शब्दात समाचार घेतला. ते म्हणाले, “ आम्ही पूर्वेकडून आलेले प्रतिनिधी गेले काही दिवस इथे बसलो आहोत आणि एका अधिकारपदाच्या भूमिकेतून आम्हाला सांगितलं जात आहे की, आम्ही सर्वांनी ख्रिस्त धर्माचा स्वीकार करायला हवा. का? तर ख्रिस्त धर्मीय राष्ट्रे आज सर्वात अधिक प्रगतिशील आहेत.

आम्ही आता आमच्या आसपास पाहतो, तर आम्हाला असं दिसतं की इंग्लंड हे ख्रिस्त धर्मीय राष्ट्र आज जगात सर्वात पुढारलेले आहे आणि ते पंचवीस कोटी लोकांच्या मानेवर पाय रोवून उभं आहे. आम्ही इतिहासात मागे वळून पाहतो, तर आम्हाला आढळून येतं की, ख्रिस्तधर्मी युरोपच्या समृद्धीचा प्रारंभ स्पेन पासून झाला. त्या स्पेनच्या समृद्धीची सुरुवात झाली ती, मेक्सिको वर आक्रमण करण्यापासून,आपल्या बांधवांचे गळे कापून ख्रिस्त धर्म प्रगतीशील होत जातो. अशा प्रकारची किंमत देऊन मिळणारी समृद्धी सौम्य प्रकृतीचा हिंदू स्वीकारणार नाही.

मी इथे बसलो आहे. आणि मी जे काही सारं ऐकलं तो असहिष्णु वृत्तीचा कळस होता. इस्लाम धर्माचे गोडवे गायलेले मी आता ऐकले, हे मुसलमान भारतात हातात तलवार घेऊन अत्याचार करीत आले आहेत. रक्तपात आणि तलवार ही हिंदूंची साधनं नाहीत. त्यांचा धर्म सर्वांविषयीच्या प्रेमाच्या आधारावर उभा आहे”. यावर श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

हे तर जगातल्या ख्रिस्त धर्मियांबद्दल झाले. पण, भारतात मिशनरी हिंदू धर्माचा प्रचार करतात त्याला म्हणावे तेव्हढे यश येत नाही. यावर विवेकानंद म्हणाले, “एका हातात बायबल आणि दुसर्‍या हातात तलवार घेऊन तुम्ही येता.ज्या तुमचा धर्म केवळ कालपरवाचा म्हणावा, ते तुम्ही आम्हाला उपदेश करण्याकरता येता ज्या आम्हाला आमच्या ऋषीमुनींनी तुमच्या धर्माइतकीच उदात्त तत्त्वं आणि भगवान येशू ख्रिस्ताएव्हढीच पावन जीवनं यांचा आदर्श हजारो वर्षांपूर्वीच घालून दिला आहे. तुम्ही आम्हाला पायाखाली तुडविता आणि आपल्या पायाखाली असणार्‍या धुळी एव्हढीच किंमत आम्हाला देता. आमच्या लोकांना दारू पिण्यास शिकवून तुम्ही त्यांना अधोगतीचा रस्ता दाखविता. आमच्या स्त्रियांचा तुम्ही अपमान करता. आमच्या धर्माची हेटाळणी करता, की जो धर्म अनेक दृष्टीने तुमच्या धर्मापेक्षा सरस आहे, कारण तो माणुसकी अधिक जपणारा आहे. आणि असं सारं केल्यावर तुम्ही विचारात पडता की भारतात ख्रिस्ती धर्माचा एव्हढा थोडा प्रसार का होतो? याचं कारण मी सांगतो, याचं कारण हे आहे की, तुम्ही मंडळी त्या येशू ख्रिस्तासारखी नाही, की ज्याच्या बद्दल आम्हाला आदर वाटावा. तुम्हाला असं वाटतं का, त्याच्याप्रमाणच सर्वांसाठी प्रेमाचं संदेश घेऊन, त्याच्या सारखी ऋजुता व नम्रता धारण करून आणि इतरांसाठी कष्ट घेण्याची व काहीतरी सोसण्याची तयारी ठेऊन तुम्ही आमच्या दाराशी आलात,तर आम्ही तुमचं स्वागत करणार नाही? नाही, तसं कधी होणार नाही. अशा भूमिकेनं जो कुणी आमच्याकडे येईल त्याचं म्हणणं आम्ही आमच्या प्राचीन ऋषींचं म्हणणं ऐकण्याइतकच आदरानं ऐकू”.

विवेकानंदांनी मिशनर्‍यांच्या प्रचार पद्धतीवर कडक टीका केली आणि त्यांनी काय केल तर भारतात त्यांचं स्वागत होईल हे ही संगितले. वीस सप्टेंबरला ‘पापी मानवाचा ख्रिस्ताच्या द्वारा होणार उद्धार’ आणि ‘पेकिंगमधील (आताचा प्रचलित उच्चार बियींग)  धर्म’ हे दोन विषय मांडले गेले. पण यावरची चर्चा लवकर आटोपली. कारण काही नियोजित वक्तेच आले नव्हते. सभागृह तुडुंब भरलेले. याचवेळी विवेकानंद व्यासपीठावर आलेले दिसले. तर लोकांना हा एव्हढा आनंद झाला.

विवेकानंदांचे चार शब्द जरी ऐकायला मिळाले तरी ते श्रोत्यांना हवे असत. इतक त्यांचं आकर्षण होतं. कित्येक वेळा कंटाळवाणी झालेली भाषणे ऐकून श्रोते निघून जातील अशी भीती वाटली की व्यासपीठावरून सांगितले जायचे की सत्राच्या शेवटी विवेकानंद थोडा वेळ बोलणार आहेत.  मग श्रोते सहनशीलतेने बसून राहत.

20 सप्टेंबरला ‘पेकिंगमधील धर्म’ हा विषय श्री हेडलँड यांनी मांडला. चीनच्या धार्मिक परिस्थितिबद्दल जी विधाने हेडलँड यांनी केली त्याचा खरपूस समाचार विवेकानंदांनी घेतला. विवेकानंद यांनी ऐनवेळी विषय मांडला, कारण चीनवर होणारी टीका पर्यायाने भारतावर टीका होती. चीनमध्ये बुद्ध धर्म होता. बुद्ध धर्माबद्दल विवेकानंदांना आदर होता. यावर ते म्हणाले, “अमेरिकेतील माझ्या ख्रिस्तधर्म बांधवांनो, चीनी जनतेच्या आत्म्याचा उद्धार व्हावा यासाठी मिशनरी तेथे जातात. चीनमधल्या भीषण दरिद्र्याचा उल्लेख येऊन गेला. मला असं विचारायचं आहे, त्यांच्या आत्म्याचं राहू देत, त्यांची शरीर भुकेमुळे गतप्राण होऊ नयेत म्हणून मिशनर्यांनी कोणते प्रयत्न केले?  

भारतातील तीस कोटी लोकसंख्येपैकी अर्ध्याहून अधिक लोकांना एकवेळचं जेवण ही पुरत नाही. त्यांना मिशनरी जरूर मदत करतात पण केंव्हा? ते आपला धर्म सोडून ख्रिस्त धर्म स्वीकारतील तेंव्हा. मग हिंदूंना ती मदत मिळत नाही. पूर्वेकडच्या देशांना आज खरी गरज आहे, ती चतकोर भाकरीची. आमच्याकडे धर्म नको इतका आहे. त्यांना अन्न हवं आहे. पण त्यांना धोंडे मिळतात. तेंव्हा तुम्हाला मानवी बंधुत्वाचा अर्थ समजावून द्यायचा असेल तर, हिंदूंशी सहानुभूतीने वागा. मग भले हिंदूंनी आपला धर्म टाकला नाही तरी त्याचा विषाद मानू नका. मिशनरी जरूर पाठवा, पण रोजचे दोन घास अन्न सुलभतेने मिळण्यासाठी त्यांनी काय केले पाहिजे हे शिकवण्यासाठी पाठवा. तत्वज्ञानातल्या सिद्धांतांचे घोट पाजण्यासाठी पाठवू नका”. ज्यांनी ज्यांनी भारतातल्या दारिद्र्याचा उपहासात्मक उल्लेख केला होता, त्यांना उत्तर म्हणून ते म्हणाले, माणसाची किंमत भारतात, तो दरिद्री आहे का धनवान यावर केली जात नाही. धर्माची शिकवणूक देणार्‍यांच्या बाबतीत तर दरिद्री असणं हे भूषण मानलं जातं. मी स्वत: निष्कांचन आहे. मला ओळखणारे काही लोक इथे व्यासपीठावर आहेत, ते तुम्हाला ग्वाही देतील की, माझं उद्याचं जेवण कुठे आहे हे मला माहिती नाही. अशा अवस्थेत माझी गेली कित्येक वर्षे गेली आहेत. तेंव्हा जवळ पैसा असणं की नसणं याला महत्व नाही. भारतात तर पैसे घेऊन जो धर्म सांगतो तो भ्रष्ट मानला जातो”.

समारोप करताना ते म्हणाले, “आपण सर्वजण जाणतो की, जो ख्रिस्ताचा अनुयायी होत नाही त्याला ख्रिस्त धर्मियांकडून कोणतीही मदत मिळणार नाही. मानवाचं मूलभूत स्वातंत्र्य, विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य या गोष्टींना या देशात खूप मोठा मान आहे असं मी कितीतरी वेळा ऐकत आलेलो आहे. मी अद्याप धीर सोडलेला नाही. सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद!”  अशा प्रकारे धर्मविषयक सर्व तात्विक प्रश्नांचा ऊहापोह वेगवेगळ्या कार्यक्रमातून झाला.

विवेकानंदांच्या निबंधाबद्दल भगिनी निवेदिता यांनी मत व्यक्त केले की, असे म्हणता येईल की जेंव्हा त्यांनी बोलण्यास प्रारंभ केला,तेंव्हा त्यांचा विषय होता, हिंदूंच्या धर्मविषयक कल्पना. पण जेंव्हा त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला, तेंव्हा हिंदू धर्म एका नव्या रूपात अवतीर्ण झाला”. तर रोमां रोलां यांनी म्हटलंय, “विवेकानंदांचा निबंध हा भारतामध्ये तीन हजार वर्षात धर्म, अध्यात्म आणि तत्वज्ञान या संदर्भात जे काही चिंतन होत आले होते, त्याचा सारभूत निष्कर्ष होता”. 

निबंधाची मांडणी करता करता विवेकानंदांनी भिन्न धर्माच्या अनुयायांना आपलेसे करून घेतले होते. सर्वांच्या मनात भाव निर्माण केला की आपले मार्ग भिन्न असले, आपल्या विचारधारा वेगळ्या असल्या, तरी  आपण सर्वजण भिन्न मार्गाने जात असलेले पूर्णतेचे यात्रिक आहोत. हेच ते विश्वबंधुत्व होते.

विवेकानंद जे बोलत होते ते फक्त एखाद्या ग्रंथाच्या आधारे नव्हते, विचारांच्या आधारे नव्हते तर स्वत:च्या अनुभवावर आधारित बोलत होते. त्यामुळे सर्व लोकांना ते खात्रीने पटत होते. सतरा दिवस चाललेली ही परिषद समारोपाकडे वाटचाल करत होती.

२७ सप्टेंबर, परिषदेचा समारोप. आतापर्यंतच्या इतिहासात कधी झाली नव्हती अशी गर्दी लोटली होती. चोहोबाजूंनी श्रोते तासभर आधीपासून येत होते. कोलंबस आणि वोशिंग्टन सभागृह गच्च भरून गेले होते. सात ते आठ हजार लोक उपस्थित होते . ज्यांना प्रवेश मिळाला नाही ते लांबपर्यंत रस्त्यांवर उभे होते. ही परिषद उद्घाटनापासूनच उत्तरोत्तर यशस्वी होत होती. विवेकानंद व्यासपीठावर दुसर्‍या रांगेत बसले होते. त्या क्षणाला त्यांच्या मनाची अवस्था वेगळी होती. अस्वस्थ होती. लोकांना ते अज्ञात होते, पण आज ते समारोपाला जमलेल्या प्रचंड जनसमुदायातील आणि शिकागो शहरातील प्रत्येकाच्या परिचयाचे झाले होते, त्यांना ओळखत नाही असा एकही माणूस नव्हता. शिकागो शहरात त्यांची मोठमोठी छायाचित्रं लागली होती. त्यावर लिहिले होते, ‘हिंदू संन्यासी विवेकानंद’. ती सर्वांच लक्ष वेधून घेत होती.ते पाहताच येणारे जाणारे त्या छायाचित्रापुढे नतमस्तक होत होते. विवेकानंदांचे नाव अमेरिकेच्या कानाकोपर्‍यात वृत्तपत्राद्वारेपण पोहोचले होते. 

सर्वधर्म परिषदेच्या समारोपात एखाद्या संगीत मैफिलीची भैरवीने सांगता होते तसे विवेकानंदांनी सर्व धर्माच्या अनुयायांना संदेश देऊन भाषण संपवले. ते म्हणाले, “ कोणत्याही ख्रिस्ती माणसानं हिंदू वा बौद्ध होण्याची गरज नाही, किंवा कोणत्याही हिंदू वा बौद्ध माणसाने ख्रिस्त होण्याची गरज नाही. प्रत्येकानं दुसर्‍या धर्मातल सारभूत तत्व ग्रहण करायचे आहे. त्याच वेळी आपलं वैशिष्ट्यही जपायच आहे. आणि अखेर स्वत:च्या स्वाभाविक प्रवृत्तीला अनुसरून आपला विकास करून घ्यायचा आहे”.

भारताच्या गौरवाचं हे सुवर्णाक्षरांनी लिहिलेल पान होतं. विश्वबंधुत्व आणि विश्वधर्म याचा उद्गाता असलेले स्वामी विवेकानंद, असामान्य! अद्वितीय !  

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments