डाॅ.नयना कासखेडीकर
विविधा
☆ विचार–पुष्प – भाग – ५३ – सायक्लोनिक हिंदू ? ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
वृत्तपत्रातील विवेकानंद यांच्या बद्दल आलेल्या, मजकुरामुळे अस्वस्थ झालेल्या बॅगले यांनी अॅनिस्क्व्याम हून पत्रात लिहिलं, “विवेकानंद यांच्या बद्दल आदरभाव व्यक्त करण्याची संधी मला मिळत आहे.याचा माला फार आनंद वाटतो. जे कोणी त्यांच्या विरूद्ध लिहीत आहेत,त्यांच्या मनात विवेकानंदांची श्रेष्ठता आणि आध्यात्मिक धारणा यांबद्दलचा मत्सर आहे. धर्माचा उपदेष्टा आणि सर्वांनी ज्याचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवावे अशी त्यांच्या तुलनेची दुसरी योग्य व्यक्ती मला दिसत नाही.ते संतापी आहेत हे साफ खोटे आहे. माझ्या घरी त्यांचे तीन आठवड्याहून जास्त काळ वास्तव्य होते. माझ्या कुटुंबातील सर्वांशी त्यांचे वागणे अतिशय सौजन्याशील होते. आनंद देणारा एक मित्र आणि हवाहवासा वाटणारा पाहुणा असे त्यांचे वागणे बोलणे असे”.
“ शिकागोचे हेल कुटुंब अशीच साक्ष देणारे आहेत. ते प्रेस्बिटेरियन आहेत,पण विवेकानंदन यांना आपल्यापासून दुसरीकडे कोठे जाऊ देण्यास ते तयार नसत. विवेकानंद हे असे एक सामर्थ्यसंपन्न आणि अतिशय थोर व्यक्तिमत्व आहे की जे ईश्वराचा हात धरून चालत राहणारे आहे. त्यांची भाषणे ऐकून अनेकजण उद्गार काढतात की, असे बोलणारा दुसरा वक्ता आपण या आधी कधी ऐकला नाही.ते श्रोत्यांना एका उदात्त विश्वात घेऊन जातात आणि ऐकणारे सारेजण त्यांच्या धर्माविषयक श्रद्धेशी तद्रूप पावतात. माणसाने निर्माण केलेले पंथ आणि संप्रदाय या सर्वांच्या अतीत असणारे असे काहीतरी श्रोत्यांना जाणवते . विवेकानंदांना समजून घेतले आणि त्यांच्या सहवासात एका घरात राहता आले तर , प्रत्येक व्यक्ती उन्नत होऊन जाईल.प्रत्येक अमेरिकन माणसाने विवेकानंद जाणून घ्यावेत. आणि भारताजवळ असतील तर असेच आणखी विवेकानंद त्याने आमच्याकडे पाठवावेत. हे मला हवे आहे”.
प्रा.राईट यांनी विवेकानंद यांच्या असामान्य योग्यतेबद्दल सर्व धर्म परिषदेसाठी पत्र लिहिलं होतं, त्याच अॅनिस्क्व्याम मधून बॅगले यांनी हे पत्र लिहिलं होतं.मिसेस स्मिथ यांनी विवेकानंद यांच्या बद्दल छुपा प्रचार चालुच आहे हे ऐकून पुन्हा बॅगले यांना न राहवून विचारले होते. बॅगले यांनी पुन्हा उत्तर दिले ,त्यात आधीच्या पत्रातील मजकूर होताच पण त्यात चिडून म्हटले होते, “ माझे अनेक नोकर आहेत. मोलकरणी आहेत. सारे जण माझ्याकडे अनेक वर्षे काम करीत आहेत”.म्हणजे बदनामी करण्याची किती हीन पातळी गाठली होती. त्यांनी काही तक्रार नाही केली आणि हे सांगणारी ही कोण? त्याच्या नंतर बॅगले यांच्या मुलीनं स्मिथ यांना कडक पत्र लिहून कानउघडणी केली.
चारित्रहननाची ही मोहिम सव्वा वर्ष सुरू होती पण विवेकानंद यांनी काहीही व्यक्त केले नव्हते, शांतपणे ते सहन करत होते.
आपणही असे अनुभव घेत असतो. मत्सरी लोक आपल्या आसपासच असतात. त्यामुळे इतर लोकांचे आपल्याबद्दल कान फुंकायचे ,विरोधी मत तयार करायचे अशा चुकीच्या गोष्टी लोक करत असतात. पण बॅगले यांच्या सारख्या सत्यासाठी परखड शब्दात कान उघडणी करणारे असले की किमान दुसरी बाजू लोकांसमोर येते आणि न्याय अन्याय, खरे खोटे, काय? कोणाचे? हे स्पष्ट होते, हेही तितकेच खरे आहे. ऐकावे जनाचे पण करावे मनाचे!
डेट्रॉईटला विवेकानंद यांची आणखी व्याख्याने होत होती. इतक वादळ उठलं होतं पण स्वामीजी धर्म परंपरा, स्त्रिया, निर्बंध ,त्यातून तयार झालेल्या रूढी यावर भारत व अमेरिका यांच्यावर तुलनात्मक बोलत होते.त्यांनी वाचलेला आणि पाहिलेला अमेरिका आणि आपल्या देशाची मूल्ये आणि शिकवणूक त्या लोकांना, श्रोत्यांना समजून सांगत होते.त्यांच्यात आणि श्रोत्यांमध्ये मनमोकळा संवाद होत होतं. गप्पा होत होत्या. भारतातील धार्मिक आणि सामाजिक अस्वस्थेवर प्रश्न विचारून लोक स्वामीजींकडून समाधान करून घेत. विवेकानंद सर्व प्रश्नांची उत्तरे प्रांजळपणे देत असत. काही दोष तर सरल मान्य करत आणि काही प्रश्न सुटणे अवघड आहे हेही सांगत. राजकीय आक्रमणामुळे सामाजिक निर्बंध स्वीकारावे कसे लागतात ते समजावून देत. हेच निर्बंध मग पुढे जाऊन कशा रूढीत बदलतात हे सविस्तर सांगत .
भारतातील स्त्रियांच्या प्रश्नांबद्दल लोक जाणून घ्यायला उत्सुक असत.
इथे एका व्याख्यानात विवेकानंद सांगत होते, “ भारतातील स्त्रिया काही शतकांपूर्वी मोकळेपणाने फिरत असत. सिकंदराने केलेल्या स्वारीच्या वेळी तर राजकन्याही इकडे तिकडे संचार करीत होत्या. पण पुढे मुसलमानांच्या उगारलेल्या तलवारीमुळे आणि इंग्रजांच्या रोखलेल्या बंदुकांमुळे आन्तरगृहाचे दरवाजे बंद करावे लागले होते. पुढे विनोदाने म्हणाले दाराशी वाघ आला तेंव्हा दार लावून घेतले. असे निर्बंध पुढे रूढी झाल्या.
भारतातील स्त्रिया या विषयवार विवेकानंद यांनी व्याख्यान दिले. ते खूप गाजले. अमेरिकेतील बुद्धीमान आणि कर्तृत्व संपन्न स्त्रियांबद्दल त्यांनी कौतुक केले. पण ते करताना हेही बजावले की, वैवाहिक जीवनात चारित्र्याचा आणि पतिपत्नीच्या नात्यातील निष्ठेचा अभाव हा पाश्चात्य संस्कृतीचा एक महान दोष आहे. वृत्तपत्रीय वादळात ही डेट्रॉईट मध्ये विवेकानंद यांच्या विचारांनी लख्ख प्रकाश पडला होता. तीन आठवड्याचा हा काळ भरगच्च कार्यक्रमांचा झाला.
मिसेस बॅगले यांच्याकडे विवेकानंद राहत होते पण थॉमस विदरेल पामर यांच्या आग्रहाखातर काही दिवस स्वामीजी त्यांच्याकडे राहायला गेले होते. पामर मोठे उद्योगपती आणि अमेरिकेचे सिनेट सदस्य होते.तिथल्या स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून त्यांनी ४० वर्षे प्रयत्न केले होते.कोलंबियन एक्सपोझिशन चे चीफ कमिशनर म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्यांनी तर डेट्रॉईट मधल्या अनेक लोकांना सतत आमंत्रित करून भोजन समारंभ केले. सर्व क्षेत्रातल्या नामवंतांसहित कोणीही स्वामीजींना जवळून बघितले नाही असा कोणी बाकी राहिला नाही. स्वामीजींच्या एव्हढ्या प्रेमात ते पडले होते.
विवेकानंद यांची व्याख्याने १८९३ च्या नोहेंबर पासून स्लेटन लायसियम लेक्चर ब्यूरो यांच्या झालेल्या कारारा नुसार झाली होती.पण दोन महीने होत नाहीत तो विवेकानंद यांना शंका येऊ लागली. आपली फसवणूक होते आहे हे लक्षात आलं. एका कार्यक्रमाचे उत्पन्न दोन हजार डॉलर्स झाले असताना विवेकानंदांना फक्त दोनशे डॉलर्स देण्यात आले होते. त्यांनी हेल यांचा सल्ला घेतला. पामर यांनाही सांगितले . या करारा बाबत वकिलांचा सल्ला ही घेतला. आणि सरळ स्लेटन यांना रीतसर सांगून ते या करारातून मुक्त झाले. यात पामर यांनी स्वता शिकागोला जाऊन मदत केली. तीन वर्षांचा झालेला करार तीन महिन्यातच संपला होता. अतिशय वाईट अनुभावातून एकच चांगली गोष्ट घडली होती की, तिथल्या थोरा मोठ्यांचा परिचय व भेटी झाल्या होत्या. प्रसिद्धीही भरपूर मिळाली होती.
तिथल्या जाहिरात बाजी आणि धावपळीला ते कंटाळलेच होते. सायक्लॉनिक हिंदू म्हणून त्यांची जाहिरात केली होती. जी स्वामीजींच्या शांत आणि गंभीर व्यक्तिमत्वाला शोभेशी नव्हतीच.ते हेल भगिनींना याविषयी पत्रात म्हणतात , “ मी तुफानी वगैरे काही नाही त्याहीपेक्षा वेगळा आहे. मला जे हवे आहे ते या करारा नुसार कराव्या लागणार्या कामात नाही. हे तुफानी वातावरण मी आता फार काळ सहन करू शकत नाही. स्वता पूर्णत्व प्राप्त करून घेणे आणि काही मोजक्या स्त्री पुरूषांना पूर्णत्वाकडे नेणे हा माझा मार्ग आहे. असीम कर्तृत्वाची माणसे तयार करावीत अशी माझी कल्पना आहे. आलतूफालतू माणसांमध्ये आपली विचार रत्ने विखरून टाकावीत आणि वेळ, शक्ति आणि आयुष्य व्यर्थ घालवणे हा माझा मार्ग नाही”
व्याख्यानच्या द्वारे पैसे मिळवायचे नाहीत असा निर्णय विवेकानंद यांनी घेतला.भारतात जाऊन एखादी शिक्षण संस्था उभी करायची ही योजना पण बाजूला ठेवली. आपण योजना प्रत्यक्षात आणणार नसलो तर मिळालेल्या देणग्या ठेऊन घ्यायचा काय अधिकार ? म्हणून ज्यांनी पैसे दिले होते त्यांना ते परत करू लागले तर त्या लोकांनी ते नाकारले. त्यांना बाकीच्या तपशीलाशी काही देणे घेणे नव्हते. स्वामीजींवरील प्रेम आणि आदरापोटी ते पैसे दिले होते. भारतात आता परत जावे इथला मुक्काम हलवावा असे मनात आले होते पण विवेकानंद यांना आता न्यूयॉर्क चे आमंत्रण आले होते…
क्रमशः…
© डॉ.नयना कासखेडीकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈