डाॅ.नयना कासखेडीकर
विविधा
☆ विचार–पुष्प – भाग 59 – सारा चॅपमन बुल (१८५० -१९११) ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
सप्टेंबर महिना स्वामी विवेकानंद यांनी बोस्टन मध्ये घालवला. थोडी फार व्याख्याने झाली पण मोकळा वेळ बराच मिळाल्याने आता शांतता मिळते तर काहीतरी धर्माविषयक लिहावे ,अनेक भेटी, अनेक चर्चा, अनेक संवाद झालेले होते. तेंव्हा काही गोष्टी अजूनच स्पष्ट झाल्याने, धर्म या बद्दल मोकळेपणाने आपले विचार कागदावर उतरवावेत असे वाटून, ते मिसेस आर्थर स्मिथ यांना पत्र लिहून म्हणतात की, “ आपल्याला शांतता हवी आहे आणि तशी व्यवस्था मिसेस ग्युएर्न्सी आनंदाने करतील” . नेमके हेच सारा बुल यांच्या कानावर आले आणि लगेच त्यांनी विवेकानंदांना पत्र लिहून मी तुमची सारी व्यवस्था करेन तुम्ही केंब्रिज ला यावे असे कळवले. त्याप्रमाणे विवेकानंद ऑक्टोबर मध्ये बुल यांच्याकडे गेले.तशी सारा ची विवेकानंद यांच्याबरोबर १८९४ मध्ये भेट झाली होती, तेंव्हाच ती विवेकानंद यांच्या आध्यात्मिक ज्ञानामुळे प्रभावित झाली होती.
नॉर्वेमधील सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक/ संगीतकार ओले बुल यांची पत्नी .म्हणजे सारा बुल . लग्ना आधीची मिस सारा थॉर्प. यांची कहाणी फार वेगळी आहे.
वयाच्या सतराव्या वर्षीच ओली बुल यांच्या व्हायोलिन वादनाचा कार्यक्रम ऐकून त्यांच्यावर लुब्ध होऊन यांच्याशीच लग्न करायचे ठरवले.सारा वीस वर्षांची, तर बुल साठ वर्षांचे. एव्हढे मोठे अंतर . वडिलांनी विरोध केला पण आईने संमती दिली आणि १८६८ मध्ये लग्न झाले. सारा, ओले बरोबर कार्यक्रमाच्या दौर्यावर अमेरिका आणि युरोपला जात असे. त्यांच्या संगीत मैफिलीत ती पियानोवादक म्हणून साथ करे. दोन वर्षानी मुलगी ओलियाचा जन्म झाला. आणि सारा च्या आईला अनुभवायला आले की हा अव्यवहारी नवरा साराला योग्य नाही/ चुकीची निवड झाली आहे, म्हणून तिने मुलीसह सारा ला परत आपल्या घरी आणले. पण सारा चे बुल यांच्यावरील प्रेम जिंकले आणि परत आईवडिलांना न जुमानता ती मुलीला घेऊन बुल यांच्याकडे नॉर्वेला येऊन राहिली. आता मात्र तिने स्वतात बदल केला होता. त्याचे व्यवहार सुरळीत करण्या करिता तिने आपल्या हातात सर्व सूत्रे घेतली. आणि जीवनाला एक शिस्त आणली . त्याच्या कार्यक्रमांची आखणी करणे, प्रोग्राम ठरवणं, प्रवास नियोजन, आर्थिक व्यवहार सर्व काही स्वत: हिमतीने पाहू लागली. तिच्या कुशलते मुळे या कलाकाराच्या जीवनाच्या उत्तरार्धात शांती आणि स्थैर्य आले.
कारण त्या आधी लोक ओली बुल यांना व्यवहारात लुबाडत असत. त्यांना अमाप पैसा मिळत होता. प्रसिद्धी होती. म्हणून सारा कार्यक्रमाचे बारीक बारीक तपशील सुद्धा नियंत्रित करू लागली आणि व्यवहाराचे अनुभव घेत यातूनच समृद्ध होत गेली. पण हे सगळं होतं ते तिच्या ओली बुल यांच्या प्रेमावरील अत्यंत निष्ठेमुळे . अशा अल्लड लहान वयात सुद्धा ती विचाराने आणि अनुभवाने परिपक्व झाली. तत्वज्ञानाचा लौकीकार्थाने अभ्यास नसला तरी जीवनाचे तत्वज्ञान शिकली. आणि जीवनाकडे बघण्याचा तीचा एक दृष्टीकोण तयार झाला. विचार पक्के झाले. १८८० मध्ये ओली बुल यांच्या मृत्यूमुळे एकतीस वर्षांची सारा केंब्रिजला आपल्या आई वडिलांकडे परत आली. लग्न करताना असलेलं बुल यांच्यावरील प्रेम आणि त्या वयातली विलासी वृत्ती आता संपून विचारात गांभीर्य आले. सारा ने ओले च्या मृत्यूनंतर लगेचच ‘ओले बुल एक संस्मरण’ या नावाने आत्मचरित्र लिहिले आहे. बोलता बोलता चौदा वर्षे झाली होती बुल यांना जाऊन. पुढे एव्हढं मोठ्ठं आयुष्य पडलं होतं. पण बुल यांच्यावरील प्रेम तसच कायम होतं. आपल्या घरात सारा यांनी कलावंत बुल यांची अनेक चित्रे ठिकठिकाणी लावली होती. आपले बुल वरील प्रेम नंतरही जपले होते.
कुठल्याही विषयावर चर्चा आणि विचार याची ओढ सारा ला नेहमीच असायची. पुढे पुढे ती अध्यात्मिकतेकडे ओढली गेली. तिचे घर एक वैचारिक घडामोडींचे केंद्रच बनले होते. त्यामुळे प्रसिद्ध अशा बुद्धिजीवींचे तिच्याकडे सतत येणेजाणे असायचे. सारा ने आता एक केंब्रिज कॉन्फरन्स आपल्या घरात चालू केली होती. त्यात विल्यम जेम्स,थॉमस वेंटवर्थ, हिगिन्सन, जेन अॅडम्स, जोशिया रॉईस, अशा नामवंत व्यक्ती सहभागी होत. हे सर्व जण तत्वज्ञानाचे एक स्वतंत्र दृष्टीकोण असणारे विचारवंत, गाजलेले प्राध्यापक होते. हार्वर्ड विद्यापीठातले असे अनेक विचारवंत प्राध्यापक बुल यांच्याकडे विवेकानंदांच्या व्याख्यानला व वर्गाला येत. विषय असे वेदान्त. त्यामुळे विवेकानंद यांचा त्यांच्याशी जवळून परिचय झाला. इतका की पुढे याच विद्यापीठात विवेकानंद यांना व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. ही अमेरिकेच्या विश्वातली मोठ्या सन्मानची बाब होती. आणि एव्हढच काय पुढे जाऊन तर हार्वर्ड विद्यापीठातील पौर्वात्य तत्वज्ञानाच्या विभागाचे अध्यासनपद स्वीकारण्याची विनंती विवेकानंद यांना केली गेली होती, पण ती त्यांनी नाकारली. खरच अमेरिकेसारख्या देशात एका भारतीय नागरिकाला ही संधी म्हणजे अभिमानाचीच गोष्ट होती.
केंब्रिज हे गजबलेल्या बोस्टन शहरातले एक शांत उपनगर होते. वातावरण शांत, गर्दी नाही. हार्वर्ड विद्यापीठ आणि केंब्रिज यांच्यामधून वाहणारी शांत चार्ल्स नदी. हे निसर्गरम्य शांत सुंदर वातावरण असलेलं ठिकाण विवेकानंदांना न आवडेल तरच नवल.
सारा ने विवेकानंद हे आध्यात्मिक धारणा असलेले एक महापुरुष आहेत हे केंव्हाच ओळखले होते. त्यांच्या जीवनात आणि कार्यात आपण कशी मदत करू शकू याचा सारासार विचार करून ठेवला होता. ही मदत ती कुठेही याची वाच्यता न करता आपल्या कृतीतून सहजतेने, आदरपूर्वक आणि कौशल्याने वेळोवेळी करत असे. सारा ने विवेकानंदांना अतिथि म्हणून बोलावले .तिच पत्र व्यवहार विवेकानंद यांच्या बरोबर होत होता त्यात तिने एकदा म्हंटले होते की माझे पती आज हयात असते तर त्यांनी तुम्हाला आपला पुत्र मानला असता.तर माझ्या या घराचा पण आपल्या महान कार्यासाठी केंव्हाही उपयोग करून घ्यावा, तुम्ही आणि तुमचे देशबांधव हे आमचेही बांधव आहेत ,यांच्यासाठी मदत म्हणून मी पैसे देईन त्याचा उपयोग करावा. आणि हे वचन त्यांनी पुढे निभावलेले दिसते.विवेकानंद त्यांचे भारतीय पुत्र आणि गुरु झाले.
अनेक मोठ्या व्यक्तींशी त्यांचा परिचय करून दिला. त्यांचा हा मुक्काम आठवडा भर होता. जसे सारा ने विवेकानंद यांचे श्रेष्ठत्व सुरुवातीलाच ओळखले होते तसेच विवेकानंद यांनीही या भेटीत, सारा यांचे व्यक्तिमत्व ओळखले होते. त्यांचा मोठेपणा ओळखला होता.आपल्याकडे बघण्याचा सारा यांचा दृष्टीकोण त्यांना कळला आणि त्यांनीही सारा यांना आपली अमेरिकन माता या रूपात स्वीकार केला. ते त्यांना धीरा माता/शांत माता म्हणत . विवेकानंद सारा यांच्यापेक्षा वयाने खूप मोठे नव्हते तरीही त्यांनी आदरपूर्वक मातेच्या रूपात सारा यांना स्वीकारले होते ते त्यांच्या धीरोदात्त, समंजस आणि निर्मळ प्रेमा मुळेच.या पहिल्याच अतिथि भेटीत सारा यांनी पाचशे डॉलर भेट दिले आणि एक आदरपूर्वक पत्रही. त्यात लिहिले होते, “आपल्या वास्तव्याने आपल्या उच्च कार्यासाठी या घराचा उपयोग केल्याने माझी ही वास्तू पावन झाली आहे..” त्यांचा हा विश्वास आणि भाव पुढे विवेकानंद यांचे कार्य, वेदान्त वर्ग, पुढे बुल यांच्या घरात सुरू होण्यात उपयोगी ठरला.पुढे विवेकानंद यांचा पुढचा प्रवास वोशिंग्टन,बाल्टिमोर न्यूयॉर्क असा सुरू झाला. उपक्रमशील सारा यांनी डिसेंबर मध्ये केंब्रिज येथे २,३ आठवड्यांचा असा कार्यक्रम ठरवला. त्या व्याख्यानला त्यांनी संगीताची जोड दिली. एम्मा थर्स्बी यांना सारा यांनी पियानो ची साथ दिली. व्याख्यानला संगीतसाज ही कल्पना वातावरण निर्मितीला पोषक ठरली.
सारा बुल यांच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीने हेरले की, सार्वजनिक व्याख्यानांपेक्षा विवेकानंद यांचा आध्यात्मिक विचार नीट पोहोचायला हवा असेल तर ३०,४० जिज्ञासू च पुरेत. मोठ्या समुदायापुढे ठराविक व्याख्यानपेक्षा २,३ आठवड्याचा वर्ग घेतला तर विषय सलग पोहोचेल. कमी माणसां मुळे श्रोता आणि वक्ता यांच्यात चांगला संवाद होऊ शकेल आणि जिज्ञासूंना त्याचा उपयोग होईल. हे निरीक्षण तंतोतंत खरे ठरले . सारा यांनी विवेकानंद यांसी जी काही भाषणे, व्याख्याने चर्चा झाल्या त्या सर्व , त्या स्टेनेग्राफर कडून नोंद करून ठेवत.
अभेदानंद, तुरीयानंद. सारदानंद, हे विवेकानंद यांचे गुरुबंधु अमेरिकेत आले ते सारा यांच्या आधारावरच.पुढे सारा यांनी भारत दौरा केला.वेदान्त सोसायटीच्या या कार्यासाठी मोठी आर्थिक मदत करत राहिल्या.त्यांच्या घरातच वेदांताचे वर्ग चालू झाले.शेवट पर्यन्त सारा काम करत राहिल्या. श्रीरामकृष्ण आणि विवेकानंद यांच्या परिवरातीलच एक सदस्य झाल्या . कलकत्त्यामध्ये जिथे शारदा मातांसाठी बांधलेलं घर होतं, त्या घरात पुढे सारदानंद बसत तिथे शारदा मातांच्या फोटो बरोबर सारा बुल यांचाही फोटो लावलेला असे. १९११ साली सारा बुल अर्थात विवेकानंद यांच्या अमेरिकन माता स्वर्गवासी झाल्या.
क्रमशः…
© डॉ.नयना कासखेडीकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈