सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ विविधा ☆ श्वान प्रेम – भाग – 2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
एकदा यूरोपच्या प्रवासात पॅरिस हून लंडनला जाताना इंग्लिश खाडी खालून जाणाऱ्या रेल्वेने प्रवास करायचा होता. त्यावेळी पॅरिस स्टेशनवर आम्हाला आमच्या सामानासकट उभ करण्यात आलं. 5 सात तगडे, कडक युनिफॉर्म मधील पोलीस भल्यादाडग्या उग्र कुत्र्यांना घेऊन आले. त्यांचं बोलणं नीट कळायच्या आधीच त्यांनी हातातल्या कुत्र्यांच्या साखळ्या सोडल्या. गाईडने सांगितलं होतं की तुम्ही शांत उभे राहा. ते कुत्रे काही करणार नाहीत. तरीही ते कुत्रे,सामान आणि आम्ही यांचं आक्रमकपणे चेकिंग करायला लागल्यावर, माझं काळीज बाहेर येऊन यूरोप यात्रे ऐवजी माझी जीवन यात्रा पूर्ण होणार असं मला वाटलं होतं.
देवांच्या गाई राक्षसांनी पळवून नेल्यामुळे त्या सोडवून आणण्यासाठी इंद्र देवांना सरमा नावाच्या कुत्रीने मदत केल्याची गोष्ट लहानपणी वाचली होती. श्री दत्तगुरू भोवती चार कुत्रे दाखविलेले असतात. त्याना वेदांचे प्रतीक मानले जाते. छत्रपती शिवरायांच्या वाघ्या कुत्र्याची कथा सर्वांना माहित आहे. विशिष्ट ट्रेनिंग दिलेले कुत्रे गुन्ह्यांचा शोध लावण्यासाठी पोलिसांना मदत करतात. लष्कराकडे ही असे श्वानपथक असते. हे आणि आणखी असेच सन्माननीय अपवाद असतीलच. पण……
एका रविवारी सकाळी डोंबिवलीहून धाकट्या बहिणीचा फोन आला.तिच्याकडे मोठी बहीण रहायला आली होती आणि डोंबिवलीत राहणारी मधली बहीण सकाळपासून तिच्याकडे येणार होती. हे सांगून बहिण म्हणाली तू लगेच निघून इकडे ये. कोकणातून आलेला फणस पिकला आहे. तू आल्याशिवाय फणस फोडायचा नाही असं ठरवलंय. लवकर ये. मीही उत्साहाने डोंबिवलीला पोचले. बहिणींच्या भेटी आणि शिवाय फणसाचं मोठं आमिष होतं. आंब्या सारखाच मला फणस ही खूप प्रिय आहे हे सगळ्यांना माहीत होतं. खूप गप्पा, हसणं, जुन्या आठवणी आणि फणस.फणस खाऊन पोट भरलं पण गप्पा संपल्या नाहीत.’ मी आता निघतेच आहे’ असा घरी फोन करूनही अर्धा तास होऊन गेला होता. डोंबिवली लोकलने घाटकोपरला येऊन मेट्रोनेअंधेरीला उतरले आणी समस्या सुरू झाली. एकही रिक्षावाला जोगेश्वरी पूर्वेला यायला तयार नव्हता. जोगेश्वरी हे माझ्या तोंडून पूर्ण बाहेर पडायच्या आधीच रिक्षावाले भरकन निघून जात होते. घड्याळाचा काटा पुढे सरकत होता आणि माझी अस्वस्थता वाढत होती इतक्यात 9 -10 वर्षांचा, चांगला दिसणारा मुलगा माझ्याजवळ आला आणि म्हणाला ‘ऑंटी, तुम्हाला रिक्षामध्ये कुत्रा चालेल का? एका रिक्षेकडे बोट दाखवून तो म्हणाला,’ ते रिक्षावाले काका तुम्हाला घरी सोडायला तयार आहेत. रिक्षामध्ये मी आणि आमचा रॉबिन आहोत. अडला हरी..च्या धर्तीवर नाईलाजाने मी म्हटलं, ‘चालेल’ मनाचा हिय्या करून मी अंग चोरून त्या रिक्षात बसले. रिक्षावाले काका म्हणाले,’ 5..7 रिक्षावाले तुम्हाला नाही म्हणता ना पाहिलं. म्हणून थांबलो. राजेश ला म्हटलं त्या काकूंना विचारून ये. जवळच जायचं असेल त्यांना. ‘हो जोगेश्वरी ईस्ट ला. थँक्स.’
राजेश म्हणाला,’ आमच्या रॉबिनला रात्री रिक्षातून फिरायला आवडतं. मी रोज या काकांना घेऊन त्याला फिरवून आणतो. तुम्ही नीट बसा. रॉबिन तुम्हाला काही करणार नाही. राजेश च्या पलीकडे असलेला रॉबिन, सारखा रिक्षातून तोंड बाहेर काढत होता. माझं त्याच्यावर लक्ष होतंच.
अरे तो बघ,सारखा तोंड बाहेर काढतो आहे. किती गाड्या, रिक्षा जात आहेत. त्याला आत घे.
‘ऑंटी, तुम्ही काळजी करू नका. रॉबिन खूप हुशार आहे. बस गाड्या आल्या की तो बरोबर तोंड आत घेतो. आमचा रॉबिन पूर्ण शाकाहारी आहे. म्हणजे ‘मी सुटले.’ मी मनातच म्हटलं. उकडलेले बटाटे त्याला खूप आवडतात.
मला नणंदेच्या घरचा’ सनी’ आठवला. ‘सनिलाना, आइस्क्रीम आणि घारगे खूप आवडतात. आणि दर गुरुवारी तो आम्ही बाहेरून परत यायची अगदी वाट बघत असतो. दत्ताच्या देवळातून येताना आम्ही प्रसादाचे पेढे आणतो ना, त्याला आधी चार पेढे भरविल्या शिवाय तो आम्हाला सोडतच नाही. ‘ त्यावेळी मी त्या गुरुवार लक्षात ठेवणाऱ्या सनीला चेहऱ्यावर हसू आणून, कौतुकाने मान डोलावली होती. नणंदेच्या सासरचे म्हणजे समर्था घरचे श्वान होते ते.
अंधेरी जोगेश्वरी अंतर कमी असली तरी ट्रॅफिक खूप होता राजेश कौतुकाने सांगायला लागला की, ‘आंटी, मागच्या महिन्यात आम्ही भेळेची, शेवपुरी ची तयारी करून बाहेर गेलो. आल्यावर बघतो तर उकडलेल्या बटाट्यांपैकी एकही बटाटा शिल्लक नाही. आम्ही रॉबिन ला खूप रागावले तर तो रुसून बसला. रडायला लागला. शेवटी त्याला जवळ घेतल्यावर रडायचा थांबला. ‘पुढे तो म्हणाला,’ या सीझनमध्ये रॉबिन ला आंबा आणि फणस खायला खूप आवडतं.’
मी दचकून, आश्चर्याने रॉबिन कडे पहात राहिले. तेवढ्यात घर आलं. रिक्षातून उतरून मीटर पेक्षा जास्त पैसे देऊन रिक्षावाल्या काकांचे आभार मानले. राजेश म्हणाला, ‘बाय ऑंटी.’ ‘बाय बेटा. सुखी रहा.’ आणि माझ्यासारखी आंब्या फणसाची आवड असणाऱ्या, पाठमोऱ्या रॉबिन ला मनापासून अच्छा करून त्याला त्या सन्माननीय अपवादान्च्या यादीत स्थान दिले.
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
11.08.2020
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈