सौ राधिका भांडारकर
विविधा
☆ शिवशाहीर…… ☆ सौ राधिका भांडारकर ☆
बाबासाहेब बळवंत मोरेश्वर पुरंदरे
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाची बातमी ऐकल्या नंतर ,वाचल्यानंतर मन जड झाले.एका ऐतिहासिक पर्वाचाच अस्त झाला.
संपूर्ण जीवनात त्यांचा एकच ध्यास होता, शिवचरीत्र घराघरात पोहचवायचे.शिवाजी राजाचे उत्तुंग व्यक्तीमत्व ,आणि त्याचे विवीध पैलु जाणीवपूर्वक अभ्यासून त्यांनी श्रोत्यांपुढे वाचकांपुढे मांडले…
वयाच्या शंभराव्या वर्षापर्यंत अखंड वाचन आणि अभ्यास त्यांनी उपासकाच्या भूमिकेतून केला.नवे अभ्यासक,,नवे इतिहासकार व्हावेत म्हणून ते तरुणांना प्रेरणा देत.मदत करत…
कथाकथन, व्याख्यान, नाटक, जाणता राजा हे महानाट्य, पुस्तकं, विवीध मालीकांसाठी संहीता लेखन, या माध्यमातून त्यांनी शिवचरित्र घराघरात नेलं.. सुलभ भाषाशैली, प्रभावी ओघवतं वक्तृत्व .. यामुळे सामान्य माणसाना शिवाजी राजा, त्यांचे कर्तुत्व, त्यांचे माणूसपण, त्यांचे राजेपण, नेतृत्व, देवत्व याचे आकलन झाले.
त्यांच्या मुखातून शिवचरीत्र ऐकताना श्रोते शिवमय होत.मंत्रमुग्ध होत.गेली सात दशके बाबासाहेबांनी हे अमृत प्रांतोप्रांती पाजले…
बळवंत मोरोपंत पुरंदरे हे त्यांचं मूळ नाव..
पण जनमानसात त्यांची ओळख बाबासाहेब पुरंदरे याच नावाने आहे..
वयाच्या आठव्या वर्षी वाढदिवसाची भेट म्हणून त्यांनी वडीलांकडे सिंहगड दाखवण्याचा हट्ट केलाहोता वडीलांनी तो पुराही केला होता..
शाळेत त्यांनी केलेलं भाषण ऐकून, शिक्षकांनी त्यांना छातीशी कवटाळलं.. म्हणाले.. “खूप मोठा होशील.. अभ्यास कर.. इतिहासाचे संस्कार जनात वाट…”
“शिवभक्ती ही आपल्याला संस्कारातून आणि रक्तातूनच मिळाली आहे ..”असे ते सांगत.
भारत सरकारने पद्मविभूषण हा किताब त्यांना बहाल केला. महाराष्ट्रभूषण म्हणूनही त्यांना गौरवण्यात आले. मात्र या दोन्ही सन्मानाच्या वेळी उलटसुलट विचारप्रवाह वाह्यले. बाबासाहेब मात्र तटस्थच राहिले. त्यांनी स्वत:ला कधी इतिहासकार असे बिरुद लावले नाही. ते अभ्यासक, उपासकाच्या भूमिकेतच वावरले… लोकांनी मात्र त्यांना शिवशाहीरच मानले.
महाराष्ट्रभूषण पुरस्काराच्या दहा लाख रकमेतील फक्त दहा पैसे त्यांनी स्वत:जवळ ठेवले आणि पदरचे घालून पंधरा लाखाची देणगी त्यांनी पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पीटलला दिली.
गणगोतमधे पु.ल. देशपांडे त्यांच्याविषयी लिहीतात, “इतिहासाचा हा मोठा डोळस उपासक आहे. भक्त आहे. पण त्या भक्तीमार्गावर ज्ञानदीपाचा प्नकाश आहे. निराधार विधान करायचे नाही.ही प्रतिज्ञा आहे.लिहीताना अखंड सावधपण आहे..”
त्यांची स्मरणशक्ती दांडगी होती. बारीकसारीक तपशील त्यांच्या लक्षात रहात. अभ्यासात सातत्य होते. ते हाडाचे संशोधक होते. तेम्हणत “शास्त्रीय पद्धतीने लिहीलेलं लेखन अभ्यासकांपुरतं मर्यादित रहातं. मात्र रंजक पद्धतीचं लेखन सर्वसाधारण माणसांपर्यंत पोहचतं..”
सागर देशपांडे यांनी लिहीलेल्या बाबासाहेबांवरच्या बेलभंडार या पुस्तकात या संशोधकाची परिपूर्ण ओळख होते…
शंभराव्या वाढदिवसाच्या समारंभात ते म्हणाले होते, “मला जर १२५वर्षांचं आयुर्मान लाभलं तर मी शिवचरीत्र ब्रह्मांडाच्या पलीकडे घेऊन जाईन…”
त्यांच्याइतका लोकप्रिय संशोधक आजपर्यंत झाला नसेल.पानटपरीवरही आदराने त्यांचा फोटो कितीतरी जणांनी पाहिला असेल.तेही लोकांचा तितकाच आदर करत.लहान मुलांनाही ते अहो जाहो करत… असं हे थोर व्यक्तीमत्व..आज अनंतात लोपलं.
काळाच्या उदरांत विसावलं…
एक ध्यास पर्व संपलं…शिवभक्तीने तळपलेला हा महासूर्य अनंताच्या क्षितीजावर मावळला…
ऊरले आहेत ते चैतन्याचे, स्फुर्तीचे, प्रेरणेचे नारिंगी रंग…
अशा व्यक्तीमत्वापुढे नतमस्तक होऊन आदरपूर्वक वाहिलेली ही श्रद्धांजली..!!??
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈