डॉ मेधा फणसळकर
विविधा
☆ संस्कृत साहित्यातील स्त्रिया… 7 – गंगादेवी ☆ डॉ मेधा फणसळकर ☆
भारतीय इतिहासात ‛विजयनगर साम्राज्य’ असे म्हटले की साहित्य- कला- संस्कृती- पराक्रम अशा वेगवेगळ्या आयामानी परिपूर्ण संस्कृती डोळ्यासमोर उभी राहते. विजयनगरची राजसत्ता मुस्लिम आक्रमणे रोखून धरण्यास यशस्वी ठरली. त्यामुळे या काळात हिंदू संस्कृतीचा सर्वांगीण विकास झाला. म्हणूनच भारतीय संस्कृती व कलांचा हा भरभराटीचा काळ मानला जातो. साहित्याच्या विशेषतः संस्कृत भाषेच्या दृष्टीनेही हा सुवर्णकाळ मानला जातो. स्त्री- पुरुषांना शिक्षणाच्या पण समान संधी होत्या. त्यामुळे पुरुषलेखकांच्या बरोबरीनेच या काळात स्त्री लेखिकांनीही साहित्यक्षेत्रात आपले उत्तम योगदान दिलेले दिसून येते. चौदाव्या शतकातील कम्परायण याची पत्नी गंगादेवी, सोळाव्या शतकात अच्युतराय याची पत्नी तिरुमलांबा यांची नावे प्रामुख्याने यात घ्यावी लागतील. यातील गंगादेवीचा परिचय आपण या लेखात करून घेणार आहोत.
गंगादेवीच्या पूर्वायुष्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. परंतु ती सामान्य परिवारात जन्मली असे काही इतिहासकार सांगतात. ती धर्मशास्त्र, पुराण, न्यायशास्त्र, नीतीशास्त्र आणि संगीतशास्त्रात प्रवीण होती. तिच्या या पांडीत्यावरच खुश होऊन राजा कम्परायण यांनी तिच्याशी विवाह केला. एकदा पतीबरोबर ती युद्धासाठी दक्षिणेकडे गेली. त्या युद्धाचे आणि विजयाचे वर्णन करणारे ‘मधुराविजयम् ‘ हे काव्य गंगादेवीने संस्कृत भाषेत लिहिले.
या काव्याचा अभ्यास करतानाच आपोआप गंगादेवीचे व्यक्तिमत्त्व आणि बुद्धिमत्ता लक्षात येते. या काव्यात एकूण नऊ सर्ग आहेत. त्यात तिने कवी वाल्मिकी, कवी कालिदास अशा कवींना वंदन करून काव्याची सुरुवात केली आहे. त्यातून तिचा या सर्व कवींच्या साहित्याचा अभ्यास होता असे लक्षात येते.
संस्कृत भाषेत काव्यशैलीचे प्रकार आहेत. त्यातील वैदर्भीय या प्रकारात तिचे काव्य मोडते. शिवाय उपमा, अलंकार यांनी नटलेले पण सुबोध, सरल पदानी युक्त अशी तिची रचना आहे. त्यामुळे तिचा व्याकरणाचा अभ्यासही परिपूर्ण होता.
सूर्योदय, चंद्रोदय, जलचक्र, सहा ऋतूंचे वर्णन, तुंगभद्रा नदीचे वर्णन यातून तिचा भूगोलाचा अभ्यास दिसून येतो आणि कवी कालिदासाचाही थोडाफार प्रभाव तिच्यावर असावा असे वाटते.
पहिल्या काही अध्यायात गंगादेवी विजयनगर साम्राज्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, राजा बुक्क याचे उत्कृष्ट राज्यशासन, कुमार कंपन्नाचे बालपण आणि प्रारंभिक जीवनाचे वर्णन केले आहे. पुढच्या काही अध्यायात त्याच्या दक्षिणेकडील आक्रमणाचे आणि कांचीपुरम् च्या विजयाचे वर्णन आहे. आपले काव्य हे एक ऐतिहासिक पुरावा असेल याची जाणीव असल्यामुळे गंगादेवीने विस्ताराने येथे इतिहास मांडलेला दिसून येतो.
तिच्या काव्यातून त्या काळातील राजकीय परिस्थिती, समाजाची मानसिकता, त्या लोकांची आर्थिक – सामाजिक- शैक्षणिक स्थिती, युद्धनीती याचे वर्णन येते. त्यातून तिची सूक्ष्म निरीक्षण शक्ती जाणवते.
आजपर्यंत आपण संस्कृत साहित्यातील लेखक- कवींनी वेद- पुराण याचा संदर्भ घेऊन किंवा काहीवेळा स्वतःच्या कल्पनेने निर्माण केलेल्या स्त्रीपात्रांचा परिचय करून घेतला. पण आजच्या शेवटच्या भागात मुद्दाम एका अशा स्त्रीचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला आहे की जी कोणत्याही साहित्यकृतीतील पात्र नसून स्वतःच लेखिका होती. तिच्या एकाच काव्यातून ती आजपर्यंत जनमानसात आणि संस्कृत साहित्याच्या इतिहासात अजरामर ठरली आहे. गंगा नदी ही भारताची मानबिंदू आहे तशीच गंगादेवी ही साहित्यातील स्त्रीलेखकांसाठी मानबिंदू आहे असे म्हणायला हरकत नाही. म्हणूनच तिच्यातील या प्रतिभाशक्तीला सलाम!
© डॉ. मेधा फणसळकर
सिंधुदुर्ग.
मो 9423019961
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
उत्तम सदर… अजून वाचायला आवडेल.