सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ सेनापती बापट : आमचे अभिमानास्पद पूर्वज ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
नशीब ही गोष्ट आहे की नाही ह्याबद्दल कायमच मतमतांतरे असतात. परंतू एक गोष्ट नक्की, तुम्ही कुठे जन्म घेता हे तुमचं नशीबच ठरवतं. आणि एकदा आपण ज्या घरात वा घराण्यात जन्म घेतला, त्या घराण्याचा आपल्याला अभिमान वाटतो. ह्या घराण्यातील आपल्या थोर पूर्वजांचा आपण आदर्श घेतो, त्यांच्या वाटेवरुन चालायचा प्रयत्न करतो.
पुरुषांना आपलं घराणं हे एकदाच, म्हणजे जन्मजातच मिळतं. परंतू स्त्रिया थोड्या जास्त नशीबवान, त्यांना जन्मजात एक घराणं तर मिळतंच, पण विवाहानंतर दुसरं घराणं पण स्वतःच्या मनाने निवडायला मिळतं.——
१२ नोव्हेंबर— म्हणजे आज सगळ्यांसाठीच आदर्शवत असणाऱ्या आमच्या पूर्वजांची जयंती—–
—आज सशस्त्र क्रांतिकारक, समाजसेवक, तत्वनिष्ठ, अशा सेनापती बापट ह्यांची जयंती. ते आमचे पूर्वज आहेत ह्याचा आनंद, अभिमान प्रत्येक बापट व्यक्तीला वाटतोच वाटतो.
सेनापती बापटांची प्राथमिक ओळख अशी —– ते महादेव तसेच गंगाबाई बापट यांचे पुत्र. त्यांचा जन्म पारनेर (जिल्हा अहमदनगर) येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आणि बी. ए. पर्यंतचे उच्च शिक्षण मुख्यत्वे करून पुणे येथे झाले. त्यांनी अहमदनगरला मॅट्रिकची परीक्षा दिली, तेव्हा त्यांना मानाची म्हणून मान्यता पावलेली संस्कृतची ‘ जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती ‘ मिळाली होती. त्यांना बी. ए. परीक्षेत इ. स. १९०३ साली उत्तीर्ण झाल्यावर मुंंबई विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली आणि ते इंग्लंडला गेले. एडिंबरो येथे त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला—-
— पण तिथेच देशाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न आणि चक्र त्यांच्या डोक्यात फिरायला लागले. आपली मातृभूमी परकीयांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी आपण प्रत्यक्ष कृती केली पाहिजे, असे त्यांना प्रकर्षाने वाटू लागले. या विचाराने ते इतके झपाटून गेले की , कॉलेजचे शिक्षण घेत असतानाच १९०२ मध्ये त्यांनी आपल्या परतंत्र मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी पुढीलप्रमाणे शपथ घेतली. ती त्यांच्याच शब्दांत अशी —-” मी आजपासून देशासाठी आजीवन काया, वाचा, मनाने झटेन आणि त्याची हाक येताच देशसेवेसाठी धावत येईन. या कामी मला देहाचा होम करावा लागला तरी मी फिरून याच भरतखंडात जन्म घेईन व अपुरे राहिलेले काम करून दाखवीन,“.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी गुप्तपणे बॉम्ब तयार करण्याची कला शिकून घेतली आणि त्यानंतर सेनापती बापट आणि हेमचंद्र दास या आपल्या सहकारी मित्रांना हे तंत्र शिकण्यासाठी पॅरिसला पाठविले. अलीपूर बॉंब खटल्यात सहभागी असल्याचा त्यांच्यावर आरोप होता. इ. स. १९२१ पर्यंत ते स्वतःच्या जन्मगावी शिक्षक म्हणून राहिले आणि त्यांनी समाजसेवा हेच व्रत घेतले. पहाटे उठल्याबरोबर गावचे रस्ते झाडणे व शौचकूप साफ करणे हे व्रत त्यांनी जन्मभर निभावले.
इ. स. १९२१ ते इ. स. १९२४ या कालखंडात पुणे जिल्हयातील मुळशी पेटा येथील धरणग्रस्त शेतकऱ्यांना जमीन मिळवून देण्याकरिता सत्याग्रहाचे आंदोलन चालवले. या आंदोलनादरम्यान बापट यांना “ सेनापती “ म्हणून ओळखले जाऊ लागले. या आंदोलनात त्यांना तीनदा कारागृहवासाची शिक्षा झाली. शेवटची सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. संस्थानांतील प्रजाजनांच्या हक्कांकरिता चालू असलेल्या आंदोलनांत भाग घेऊन त्यांनी संस्थानाच्या प्रवेशबंद्या मोडल्या व त्याबदल कारागृहवासही सोसला. स्वातंत्र्योत्तर काळातही भाववाढ विरोधी आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, इत्यादी आंदोलनांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला.
कुठल्याही सुधारणेची सुरुवात ही आपल्या स्वतःपासून करावी, कारण सांगणं सोप्पं पण आचरणं कठीण, हे सेनापतींचं ठाम मत होतं. म्हणून नोव्हेंबर १९१४ मध्ये त्यांना मुलगा झाल्यावर, त्याच्या बारशाच्या निमित्ताने बापटांनी पहिले भोजन हरिजनांना दिले.
एप्रिल १९१५ मध्ये ते पुण्यात वासूकाका जोशी यांच्या ‘ चित्रमय जगत ‘ या मासिकात नोकरी करू लागले.
त्यांनी लोकमान्य टिळकांच्या इंग्रजी वृत्तपत्रात, दैनिक मराठातही नोकरी केली आहे. दैनिक मराठा सोडल्यानंतर ते लोक-संग्रह नावाच्या दैनिकात राजकारणावर लिखाण करू लागले. त्याचबरोबर डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या ज्ञानकोशाचे कामही ते बघत.
पुढे सेनापती बापट मुंबईतीत झाडूवाल्यांचे नेतृत्व करू लागले. त्यासाठी त्यांनी मुंबईच्या ‘संदेश’ नावाच्या वृत्तपत्रात एक मोठे निवेदन दिले. ‘ झाडू-कामगार मित्रमंडळ ‘ नावाची संस्था त्यांनी स्थापन केली. सप्टेंबर १९२९ मध्ये, झाडूवाल्यांशी मानवतेने वागण्याचा पुकारा करीत बापटांनी गळ्यात पेटी लटकावून, भजन करीत शहरातून मुंबईच्या चौपाटीपर्यंत मोर्चा काढला. शेवटी त्यांनी पुकारलेल्या संपाची यशस्वी सांगता झाली.
अंदमानमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगताना इन्द्रभूषण सेन यांनी आत्महत्या केली होती. त्यांना भयंकर यातना सहन कराव्या लागल्या होत्या हे पाहून, सेनापती बापटांनी अंदमानमध्ये काळ्या पाण्याची जन्मठेप भोगत असलेल्या कैद्यांच्या सुटकेसाठी, डॉ. नारायण दामोदर सावरकर यांच्यासह एक सह्यांची मोहीम चालवली. त्यासाठी ते घरोघर फिरत, लेख लिहीत, सभा घेत. या प्रचारासाठी बापटांनी ’ राजबंदी मुक्ती मंडळ ‘ स्थापन केले होते. इ.स.१९४४ साली नागपूर येथे सेनापती बापट यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
मराठी भाषेच्या दृष्टीने एक अत्यंत मोलाचे काम श्री. पां.म.बापट यांनी केले. योगी श्रीअरविंद यांच्या ग्रंथांचे सेनापती बापट यांनी मराठीत भाषांतर केले आहे. श्रीअरविंद आश्रम, पुडुचेरी यांच्यामार्फत हे ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. सेनापतींनी लिहिलेल्या या काव्यपंक्तींवरून त्यांचा जाज्वल्य महाराष्ट्राभिमान दिसून येतो. महर्षी अरविंद घोष यांच्या क्रांतिकारी व आध्यात्मिक अशा दुहेरी व्यक्तिमत्त्वाचा सेनापती बापटांवर प्रभाव होता. महर्षी अरविंदांच्या
‘दी लाईफ डिव्हाइन‘ या ग्रंथाचा त्यांनी ‘ दिव्य जीवन ‘ या नावाने मराठीत अनुवाद केला आहे. याखेरीज ‘ चैतन्यगाथा ’ हा ग्रंथही त्यांनी लिहिला आहे. संस्कृत, इंग्रजी व मराठी या भाषांतून त्यांनी काव्यरचना केली आहे. हैदराबादच्या तुरुंगात सेनापती बापट यांनी Holy Sung (होली संग) या नावाचा इंग्रजी काव्यसंग्रह लिहिला.
अशा प्रकारे सशस्त्र क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक, समाजसेवक, तत्त्वचिंतक अशा विविध नात्यांनी भारतमातेची व भारतीय जनतेची सेवा करणारा हा सेनापती बापट यांचा २८ नोव्हेंबर, १९६७ रोजी मृत्यू झाला.
त्यांचे पारनेर मधील घर “ सेनापती बापट स्मारक “ म्हणून ओळखले जाते.
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
माहितीपूर्ण लेख! सुंदर!