श्री विश्वास विष्णु देशपांडे
विविधा
☆ स्वदेशीचा जादू… भाग – १ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆
जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती हैं बसेरा, वो भारत देश हैं मेरा. माझ्या देशातल्या मातीत, पानोपानी सोने आहे. पण त्याची जाणीव तुम्हा आम्हाला नसते. चमकणाऱ्या विदेशी वस्तू आम्हाला आकर्षित करतात. पण जे चकाकते ते सगळेच सोने नसते ही गोष्ट आम्ही सोयीस्कर विसरतो. जेव्हा आमच्या हळदीवर, बासमती तांदळावर, कडुलिंबाच्या औषधी उपयोगांवर दुसऱ्या देशांनी पेटंट घ्यायचा प्रयत्न केला, तेव्हा कुठे आम्हाला जाग आली. अन्यथा आपल्या गोष्टींचे महत्व आम्हाला कुठे ? पूर्वी आमच्या दंतमंजनात कोळसा आणि मीठ आहे म्हणून हिणवणाऱ्या विदेशी कंपन्या आज मोठ्या गर्वाने आमच्या टूथपेस्टमध्ये कोळसा, मीठ वगैरे आहे म्हणून टेंभा मिरवतात. तेव्हा आम्हाला त्याचे महत्व कळते. एखादी गोष्ट जोपर्यंत दुसरे लोक सांगत नाहीत, तोपर्यंत आम्हाला त्याचे महत्व कसे बरे पटावे ? वस्तूंच्या बाबतीतच काय, पण माणसांच्या बाबतीत सुद्धा आम्ही असेच वागतो. स्वामी विवेकानंद जोपर्यंत अमेरिकेतील शिकागो येथे आपले विचार प्रकट करून जगन्मान्य होत नाहीत, तोपर्यंत आम्हाला सुद्धा त्यांचे महत्व कळत नाही. स्वदेशी वस्तू, स्वदेशी वनस्पती, स्वदेशी खाद्यपदार्थ आणि आमच्याकडील विचार, सेवा आणि बुद्धिमत्ता यांचा वरदहस्त असलेली माणसे या सगळ्यांचे महत्व आम्हाला कधी कळणार ?
व्होकल फॉर लोकल, आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया या सगळ्या घोषणांचे म्हणूनच महत्व आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात, म्हणून मी हे म्हणतो असे बिलकुल नाही. हा निर्णय आजच्या काळाला सुसंगत आणि आवश्यक असा आहे म्हणूनच त्याचे महत्व समजून घेण्याची गरज आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सुरुवातीला लोकमान्य टिळक आणि नंतर म, गांधी यांनी स्वदेशीचा नारा दिला होता. स्वदेशी चळवळीची गरज आजही तेवढीच आहे. फक्त आज संदर्भ बदलले आहेत. त्या काळात तो लढा ब्रिटिश सत्तेविरुद्ध होता. आज आपल्याला आपल्या स्वतःसाठी तो लढायचा आहे. जागतिकीकरण, खुल्या अर्थव्यवस्थेच्या या काळात आपल्याला घड्याळाचे काटे उलटे फिरवता येणार नाहीत, पण तारतम्याने विचार करावा लागेल. त्याबाबतचे राजकीय, राष्ट्रीय धोरण राज्य सरकारे, केंद्र सरकार भलेही ठरवील. ते त्यांना ठरवू देत, पण तुम्ही आम्ही आहार विहार, आचार विचाराने स्वदेशी होऊ या.
स्वदेशीची जादू कोरोना काळात आपण अनुभवली आहे. लोकल उत्पादने, लोकल मार्केट, लोकल सप्लाय चेन या गोष्टींनी आम्हाला त्या वेळी फार मोठा मदतीचा हात दिला आहे. आपल्या मागण्यांची पूर्तता केली आहे. या लोकललाच आपला जीवनमंत्र बनवला पाहिजे. या कोरोना काळातच आपण अनेक अवघड गोष्टी करून दाखवल्या आणि स्वदेशीची जादू पाहिली आहे. कोरोना काळात ज्यांची तीव्रतेने आवश्यकता भासली असे व्हेंटिलेटर आपल्या देशात कितीसे बनत होते ? पण कोरोनाचे संकट आले आणि अनेक कंपन्यांनी यात आघाडी घेवून ते बनवायला सुरुवात केली. मग भारतानेच अनेक देशांना व्हेंटिलेटर पुरवले. त्याच पद्धतीने कोरोना लशींवर भारतीय वैद्यकीय संस्थांनी संशोधन करून विक्रमी वेळेत लशी तयार केल्या. यापूर्वी मिसाईल मॅन आणि आपले माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली आपण स्वदेशीचा वापर करून अण्वस्त्रे तयार केली. आज आपण अनेक उपग्रह, चांद्रयान बनवतो आहे, त्यांचे प्रक्षेपण करतो आहोत.
या सगळ्या गोष्टी अभिमान वाटावा अशा निश्चितच आहेत. पण आमच्या आचार विचारात, जगण्यात स्वदेशी आले आहे का ? आमच्या जगण्याचा तो एक भाग झाला आहे का या प्रश्नाचे उत्तर निश्चितच नकारार्थी द्यावे लागेल. राज कपूरच्या ‘ श्री ४२० ‘ या चित्रपटात एक गाणे आहे. ‘ मेरा जुता हैं जपानी, ये पतलून इंग्लीस्तानी, सरपे लाल टोपी रुसी, फिर भी दिल हैं हिंदुस्तानी ‘ असे गाणे आहे. त्यात त्याच्या वापराच्या सगळ्या वस्तू जरी विदेशी असल्या तरी मन मात्र हिंदुस्तानी आहे. पण यात आता बदल व्हायला हवा. केवळ ‘ दिलच हिंदुस्तानी ‘ असून भागणार नाही, तर वापरातील सर्वच वस्तू स्वदेशी असायला हव्यात. कदाचित आपल्याला माझे म्हणणे पटणार नाही, कोणाला माझा सूर नकारार्थी वाटेल तर अजून कोणी म्हणेल की असे काय आहे त्यात, ज्याबद्दल तुम्ही सांगताय ? पण ज्यावेळी मला काय म्हणायचे आहे हे आपण समजून घेऊ तेव्हा आपल्याला माझे म्हणणे पटेल. तोपर्यंत स्वदेशीची जादू कळणार नाही. आमच्या आहारातील खाद्यपदार्थ, आमची पेये, आमच्या वनस्पती, झाडे, वृक्ष, वेली, आम्ही घेत असलेली पिके, वापरत असलेली खते, कीटकनाशके, आमचा आयुर्वेद,आमचा योग या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने स्वदेशी हव्यात. कशासाठी ? या सगळ्या गोष्टी आमचे जीवन समृद्ध आणि आरोग्यसंपन्न करणाऱ्या आहेत.
आपण सुरुवात खाद्यपदार्थांपासून करू. एकदा मी आणि माझे कुटुंबीय एका मोठ्या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलो होतो. त्या हॉटेलमध्ये पिझ्झापासून ते थालीपीठापर्यंत सर्व पदार्थ उपलब्ध होते. मला तिथले थालीपीठ खाण्याची इच्छा होती. तिथे आलेली तरुणाई मात्र पिझ्झावर ताव मारत होती. आणखी एका हॉटेलमध्ये आम्ही गेलो होतो, तिथे विविध प्रकारचे बर्गर्स उपलब्ध होते आणि त्या सोबत पिण्यासाठी पाणी नव्हते तर तिथे दिले जाणारे कोल्ड ड्रिंक घ्यायचे होते. या सगळ्या प्रकारांनी मी विचारात पडलो. हे सगळे पदार्थ कितपत आरोग्यदायी आहेत, यावर माहिती घेऊ लागलो.
पिझ्झा, बर्गर, नूडल्स, फ्राईज, पॅटिस, पेस्ट्री, कुकीज, मोमोज, चाऊमिन यासारख्या पदार्थांना फास्ट फूड किंवा जंक फूड असे नाव आहे. यातील बरेचसे पदार्थ मैद्यापासून बनलेले असतात. पाव, बिस्कीट आदी सगळे बेकरी प्रॉडक्ट्स सुद्धा मैद्यापासूनच बनतात. मैदा हा पोटाच्या तक्रारी वाढवणारा आणि अजिबात फायबर नसलेला पदार्थ आहे. हे सगळे पदार्थ आणि कोल्ड ड्रिंक्स कधीतरी ठीक आहेत पण वारंवार खाल्ल्याने अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकते. या पदार्थांमध्ये कॅलरीज आणि अतिरिक्त साखर असते. पौष्टिक तत्वे मात्र नगण्यच असतात ! जास्त फॅट, अतिरिक्त साखर आणि मीठ यामुळे हे पदार्थ चविष्ट तर बनतात पण आरोग्यावर दुष्परिणाम करतात. रक्तातील बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढवतात. या पदार्थानी टाईप टू डायबिटीस, हृदयविकार आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. वजनात वाढ होणे, श्वसन संस्थेचे आजार बळावणे असेही दुष्परिणाम होऊ शकतात.
चायनीज खाद्यपदार्थांमध्ये अजिनोमोटो नावाचा घटक वापरतात. त्याला चायनीज सॉल्ट असेही म्हटले जाते. त्यामुळे खाद्यपदार्थांना एक वेगळी चव येते. तरुणाई विशेष करून या पदार्थांकडे आकृष्ट होते. या पदार्थांची लहान मुलांना लवकर सवय लागते. पण वारंवार असे पदार्थ खाणे आरोग्याला घातक ठरते. आपल्याकडील भाकरी, पोळी, भाज्या, पोहे, थालीपीठ इ देशी पदार्थात भरपूर फायबर्स असतात. आरोग्यासाठी ते उपकारक असतात. त्यात अनेक पोषक तत्वे असतात. आपण ते करताना अतिरिक्त साखर, मीठ इ चा वापर करत नाही. त्यामुळे त्यांच्या दुष्परिणामापासूनही दूर राहतो.
क्रमशः…
©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे
चाळीसगाव.
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈