श्री विश्वास विष्णु देशपांडे

? विविधा ?

☆ स्वदेशीचा जादू… भाग – ४ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे  

समृद्ध प्राचीन वारसा 

श्यामराव, श्यामलाताई , पिंकी आणि राजेश यांची जंगल सफारी मजेत सुरु होती. पिंकी आणि राजेश तर अतिशय खुश होते. बऱ्याच दिवसांनी आई बाबांबरोबर गाडीतून ते सहलीसाठी जात होते. तेथून जवळच एक प्राचीन हेमाडपंती शिवमंदिर होते. ते मुलांना दाखवावे म्हणून श्यामराव त्यांना तिथे घेऊन जात होते. सगळ्यांची वटवृक्षाखाली खाणं आणि थोडी विश्रांती झाली होती. त्यामुळे सगळ्यांचा मूड फ्रेश होता. गाडीत बाबांनी ‘ जय जय शिव शंकर ‘ गाणं लावलं होतं आणि त्या तालावर त्यांचं डोलणं आणि गुणगुणणं सुरु होतं. रस्त्यावर एके ठिकाणी प्राचीन शिवमंदिराकडे असा बोर्ड त्यांना लावलेला आढळला. मुख्य रस्त्याला सोडून गाडी आतमधील छोट्या कच्च्या रस्त्याकडे वळली. थोडेसे अंतर गेल्यानंतर लगेच शिवमंदिर होते. श्यामरावांनी एका लिंबाच्या झाडाच्या दाट सावलीत गाडी पार्क केली. सगळे खाली उतरले.

तिथे एका बाजूला काही माणसे फुले, हार, बेलपत्रे आदी विक्रीसाठी घेऊन बसली होती. शामलाताईंनी एका बाईजवळून बिल्वपत्रे विकत घेतली. दुरूनच शिवमंदिराची दगडी हेमाडपंती बांधणी लक्ष वेधून घेत होती. राजेशच्या मनात नेहमीप्रमाणेच काही प्रश्नांनी गर्दी केली होती. पण बाबा म्हणाले, ‘ बेटा, आपण आधी भोलेनाथांचं दर्शन घेऊ. मंदिरात दर्शन  घेताना काही बोलू नये. मग निवांतपणे तू काहीही विचार. ‘ राजेश म्हणाला, ‘ हो, बाबा.

‘गाभाऱ्याच्या बाहेर एक सुंदर दगडी नंदी होता. सगळ्यांनी आधी त्याला नमस्कार केला. मंदिरात गेल्यानंतर श्यामलाताईंनी आपल्याजवळील बेल काहीतरी मंत्र म्हणत भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण केला. श्यामराव, राजेश, पिंकी यांनीही काही बेलाची पाने पिंडीवर वाहिली.

बाहेरचा दगडी सभामंडप खूपच छान होता. तेथील खांबांवर आणि बाजूच्या कमानीवर छानपैकी नक्षी, पौराणिक चित्रे आणि आकृत्या कोरलेल्या होत्या. आजूबाजूला असलेला उन्हाचा ताप तिथे जाणवत नव्हता. काही क्षण तिथे बसल्यानंतर सगळे बाहेर पडले. आता मंदिराच्या भोवतालचा परिसर ते न्याहाळत होते. राजेश म्हणाला, ‘ बाबा, तुम्ही मघापासून हे मंदिर हेमाडपंथी आहे असं म्हणत होता. हेमाडपंथी म्हणजे काय ? ‘

बाबा म्हणाले, ‘ अरे बाबा, हेमाडपंथी नाही, हेमाडपंती. बरेच लोक हेमाडपंथी असा चुकीचा उच्चार करतात. पण ही मंदिर बांधण्याची पद्धत किंवा शैली हेमाडपंत याने सुरु केली म्हणून हेमाडपंती मंदिर असे म्हटले जाते. अरे तेराव्या शतकात देवगिरीत यादव राजांचे राज्य होते. हेमाद्री पंडित किंवा हेमाडपंत हा यादवांचा प्रधान होता. तो फार बुद्धिमान होता. त्याने मंदिर बांधण्याची एक नवीन पद्धत विकसित केली. ‘ पिंकी, राजेश, या मंदिराची बांधणी तुम्ही पाहिली का ? ‘ पिंकी म्हणाली, ‘ हो बाबा, नुसते दगडावर दगड ठेवलेले दिसतात. ‘

बाबा म्हणाले अगदी बरोबर, ‘ त्यालाच हेमाडपंती शैली म्हणतात.आजकाल बांधकामासाठी आपण जसा सिमेंटचा वापर करतॊ, तसाच पूर्वी चुन्याचा वापर केला जायचा. पण या अशा मंदिरांमध्ये हेमाडपंत याने असा कोणत्याच पदार्थाचा वापर केला नाही. चौकोनी, त्रिकोणी, पंचकोनी या आकारात दगडी चिरे कापून त्यांच्या खाचा किंवा खुंट्या एकमेकात घट्ट बसतील अशा आकारात कापून या मंदिरांची उभारणी केली आहे. ती इतकी मजबूत झाली आहे की अनेक शतके झाली तरी ही मंदिरे आजही टिकून आहेत. त्याशिवाय कित्येक टन वजन असलेल्या शिळा पंचवीस फुटांपेक्षाही अधिक उंचीवर नेऊन हे बांधकाम करण्यात आले आहे. केवढे विकसित तंत्रज्ञान असेल त्या मंडळींजवळ ! ‘ 

‘कमालच आहे ना बाबा, सिमेंट, चुना न वापरता अशा प्रकारचे बांधकाम करणे म्हणजे आपल्या पूर्वजांच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. ‘ राजेश म्हणाला.

‘हो, राजेश, आणि अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहेत बरं का ! वेरूळचे घृष्णेश्वर मंदिर, औंढा नागनाथ येथील मंदिरे अशीच आहेत. चाळीसगावाजवळील पाटणादेवी येथे असेच शंकराचे हेमाडपंती मंदिर आहे. ‘

पिंकी म्हणाली, ‘ बाबा, किती छान माहिती मिळाली या मंदिराबद्दल ! शाळेत ही माहिती सांगून मी बाईंची शाबासकी मिळवणार. ‘

‘शाब्बास पिंकी. आणि तुम्ही काय करणार राजे ? ‘ बाबा राजेशकडे पाहत म्हणाले.

‘बाबा, आपण या मंदिराचा फोटो घेतला आहे ना ! मी या मंदिराचे चित्र काढून आमच्या चित्रकलेच्या शिक्षकांना दाखवेन. माझे मित्र सुद्धा ते पाहून खुश होतील. ‘ दॅट्स ग्रेट! ‘बाबा म्हणाले.

‘आई, मला तुला काही विचारायचे आहे. मघाशी आपण भगवान शंकरांच्या पिंडीवर बेलाची पाने वाहिली. ती का वाहायची आणि तू काहीतरी मंत्र पुटपुटत होतीस तो पण सांग ना, ‘ राजेश म्हणाला.

‘राजेश, पिंकी, अरे बेलपत्र किंवा बेलाची पाने भोलेनाथांना अतिशय प्रिय बरं का ! श्रावणात तर दर सोमवारी भगवान शंकरांना बिल्वपत्रे अर्पण करतात. तुम्ही देव दानवांनी केलेल्या समुद्र मंथनाबद्दल ऐकले असेलच. त्यावेळी समुद्र मंथनातून निघालेले हलाहल शंकरांनी प्राशन करून आपल्या कंठात धारण केले. त्यांच्या सर्वांगाचा भयंकर दाह म्हणजे आग व्हायला लागली. तेव्हा त्यांच्या मस्तकावर बेलाचे पान ठेवण्यात आले. तेव्हापासून शंकराला बेलपत्र वाहण्याची प्रथा आहे. बेलाची तीन पाने सुद्धा अतिशय महत्वाची आहेत बाळांनो. तीन पाने म्हणजे भगवान शंकरांचे त्रिनेत्र, तशीच ही पाने म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजेच महादेव या तिन्ही देवांचे प्रतिनिधित्व करतात.’ 

‘अरे बापरे ! केवढे महत्व आहे बिल्वपत्राचे ! ‘ पिंकी म्हणाली. ‘ आई, तू कोणता मंत्र म्हणत होतीस बेल अर्पण करताना  ? ‘

‘सांगते, ‘ आई म्हणाली. भोलेनाथांना बेलाचे पान अर्पण करताना, ‘त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेत्रं च त्रिधायुतम | त्रीजन्मपापसंहारम बिल्वपत्रं शिवार्पणम ‘ या पौराणिक मंत्राचा जप करतात बरं का पिंकी.  या मंत्राचा अर्थ असा आहे की तीन गुण, तीन डोळे, त्रिशूल धारण करणारे आणि तीन जन्मांचे पाप नष्ट करणारे हे भगवान शिव, तुम्हाला तीन पाने असलेले बेलाचे पान आम्ही अर्पण करतो. बेलाच्या पानांमध्ये विषनाशक गुणधर्म असतो. शिवाला बेल वाहताना आपल्या हातावरील विषाणू तर नष्ट होतातच पण त्या पानांचा एक प्रकारचा सुगंधही आपल्या हाताला येतो. ‘

‘आणि आणखी एक महत्वाची गोष्ट सांगते तुम्हाला. भगवान शंकरांना हे बेलपत्र इतके प्रिय आहे की आपल्याजवळ दुसरे काही नसेल आणि आपण भक्तिभावाने एखादे बिल्वपत्र जरी त्यांना अर्पण केले, तरी ते संतुष्ट होतात. म्हणूनच त्यांना ‘ आशुतोष ‘ म्हणतात. आशुतोष म्हणजे सहज संतुष्ट होणारा. भगवान शंकर आपल्याला जणू सांगतात की तुम्ही सुद्धा माझ्यासारखे सहज संतुष्ट, समाधानी असणारे व्हा. ‘

‘आई, आशुतोष या नावाचा किती सुंदर अर्थ सांगितलास. माझ्या वर्गात शेखरकाकांचा मुलगा आशुतोष आहे ना. तो माझा चांगला मित्र आहे. पण आता मला या नावाचा अर्थ कळला. ‘ राजेश आनंदाने म्हणाला.

 खरंच आई, आपल्या देवांची नावं, हे बिल्वपत्राचं महत्व, आपल्या वनस्पती आणि एकूणच  सगळ्या गोष्टी, परंपरा किती अर्थपूर्ण आहेत ! पण कोणी अशा त्या समजावून सांगत नाही. ‘

श्यामराव म्हणाले, ‘ अरे, पण बेलाच्या झाडाची माहिती तर तुम्हाला आईने सांगितलीच नाही. तुम्हाला ऐकायची आहे का ? ‘

‘हो बाबा, सांगा. मी आता एका वहीत आपल्या सगळ्या वृक्षांची माहिती लिहून काढणार आणि तिथे त्यांची चित्रे चिकटवून एक छान हस्तलिखित तयार करणार. ‘ राजेश म्हणाला.

‘शाब्बास बेटा ,’ बाबा म्हणाले, ‘ बेल हा एक देशी वृक्ष आहे. बेलाची झाडे आपल्या आशिया खंडात सर्वत्र आढळतात. त्याची पाने, फुले, फळे, खोड असे सगळेच भाग औषधी आहेत. अनेक आयुर्वेदिक औषधात बेलाचा वापर केला जातो. अगदी पोटदुखीपासून ते मधुमेहाच्या आजारापर्यंत या पानांचा उपयोग होतो. बेलाच्या झाडापासून मुरंबा, जॅम, सरबत आदी गोष्टी बनवल्या जातात. बेलाच्या झाडावर पक्षी आपली घरटी बांधतात. कीटक त्याच्या आश्रयाने राहतात. त्याच्या फुलांवर बसलेल्या मधमाशा, फुलपाखरांमुळे परागीभवन होते. बेलाचे लाकूड टणक आणि टिकाऊ असल्याने त्याचा वापर फर्निचरसाठी सुद्धा केला जातो. शेतकरी शेतीची अनेक औजारे तयार करतात. मी तुम्हाला मागच्या वेळी जी वड, पिंपळ यासारख्या वृक्षांची माहिती सांगितली, त्याबरोबरच हे झाडही महत्वाचे आहे बरं, त्याचीही लागवड आपण केली पाहिजे. केवळ धार्मिकच नव्हे तर पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा अशी झाडे खूप महत्वाची असतात. ‘

पिंकी म्हणाली, ‘ बाबा, तुम्ही आणि आईने आज खूप वेगवेगळ्या विषयांची नवीन माहिती दिली आम्हाला. आम्ही आता आमच्या वहीत ही सगळी माहिती लिहून काढू. ‘

समोरच एका ठिकाणी उसाच्या रसाची गाडी होती. सगळेच आता तहानलेले होते. राजेश म्हणाला, ‘ बाबा, उसाचा रस घेऊ या ना. ‘

‘चला, आपण सगळेच रस घेऊ या, ‘ सगळ्यांनी मस्त थंडगार आले, लिंबू घातलेल्या उसाच्या आस्वाद घेतला आणि गाडी मग पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली. 

क्रमशः… 

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments