श्री अरविंद लिमये
विविधा
☆ सत्ते पे सत्ता..! ☆ श्री अरविंद लिमये ☆
‘सत्ता‘ या शब्दाला वेढून राहिलेला माजोरीचा उग्र दर्प या शब्दातील विविध चांगल्या अर्थाचे कोंब झाकोळून टाकणारा ठरतो.
खरंतर सत्ता वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी नसतेच. रक्ताच्या असो वा मैत्रीच्या,जोडलेल्या,मानलेल्या विविध अतूट नात्यांचा अविभाज्य भाग असणारी मायेची, प्रेमाची सत्ता कधीच विध्वंसक नसते. ती संजीवकच असते.
आईवडिलांना त्यांच्या अपत्यांवरील मायेच्या नात्यातून मिळणाऱ्या सत्ता/अधिकारात मायेचा पाझर आणि आपल्या अधिपत्याखाली असणाऱ्या पाल्याच्या हिताची काळजी यांचेच प्राबल्य असते आणि सत्ता या शब्दाला तेच अपेक्षित आहे. म्हणूनच कौटुंबिक पातळीवरील अशा गृहीत सत्तेच्या बाबतीतही प्रेम आणि आदर यांची जागा जेव्हा अधिकार आणि वचक घेऊ लागते तेव्हा मात्र ती सत्ताही संजीवक न रहाता विध्वंसक बनू लागते.
खरंतर ‘सत्ता‘ ही निसर्गानेच स्वतःचं अधिपत्य अबाधित ठेवून निसर्गावर अवलंबून असणाऱ्या सर्वच निसर्ग घटकांच्या व्यवस्थापन सुविहित रहावं या उद्देशाने निसर्गनिर्मितीपासूनच अस्तित्वात आणलेली एक व्यवस्था आहे. सर्व प्राणीमात्रांमधे या सत्तेचं स्वरूप अर्थातच वेगवेगळं असतं. आपण माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे असं म्हणतो. पण खरं तर विविध पक्षी आणि प्राणी यांचे जीवनपद्धती पाहिली की त्यात वैविध्य असलं तरी एकमेकांच्या सोबतीने राहण्याची त्यांच्यातील असोशी हा एक समान धागा असल्याचं आपल्या लक्षात येतं. पक्ष्यांचे थवे, माकडांचे कळप, हत्तींची एकत्रकुटुंबे,समुहाने चरणारी जनावरे ही याचीच प्रतिके म्हणता येतील. या विविध पक्षीप्राण्यांमधे त्यांच्या त्यांच्या जीवन पद्धतीनुसार असणार सत्ताकेंद्र आणि त्याचं स्वरूप हा सखोल अभ्यासाचाच विषय ठरावा. अशा जाणीवपूर्वक केलेल्या अभ्यासातून आकाराला आलेली व्यंकटेश माडगूळकर यांची ‘सत्तांतर‘ ही कादंबरी माकडांच्या कळपातील प्रमुखाची सत्ता/वर्चस्व आणि योग्य वेळ येताच त्यात होणार सत्तांतर यांचं अतिशय अचूक आणि नेमकं चित्र करते.
या नैसर्गिक व्यवस्थेत सत्तेमुळे मिळणारा अधिकार आणि वर्चस्व हे गृहीत आहेच पण ते सत्तेमुळे आलेल्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पूर्ण करून अवलंबितांचं संगोपन, रक्षण, हित आणि समाधान जपण्याचं मुख्य कर्तव्य योग्य पद्धतीने पार पाडता यावं यासाठीच. याचं भान पर्यावरणाच्या घातक पडझड विध्वंसानंतरही इतर सर्व निसर्ग घटकांनी आवर्जून जपलेले दिसून येतं. अपवाद अर्थातच फक्त माणसाचा!!
म्हणूनच ‘सत्ता‘ या शब्दात मुरलेल्या माजोरीच्या उग्र दर्पाला जबाबदार आहोत आपणच.सत्तेला अपेक्षित असणारी कर्तव्य आणि जबाबदाऱ्या विसरून सत्तेचे थेट नातं राजकारणाशी जोडलं गेल्याचा हा परिणाम! ‘खुर्ची‘च्या असंख्य किश्शांमधे सत्तेचा लोभ महत्त्वाचा घटक ठरत गेल्याचं आपल्या लक्षात येईल. त्यामुळेच सत्ता प्राप्त होताच ती अबाधित ठेवण्याच्या अतिरेकी हव्यासामुळे सत्य न् स्वत्वाचं मोलही सहजी खर्ची घालण्याची अतिरेकी प्रवृत्ती मूळ धरु लागते आणि हळूहळू फोफावते.मग राजकारण ही व्यवस्था न रहाता विधिनिषेध धाब्यावर बसवून खेळला जाणारा क्रूर खेळ होऊन जातो.अशा परिस्थितीत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठीच्या कटकारस्थाने ‘सत्तेपे सत्ता‘ हा जशास तसे या न्यायाने परवलीचा शब्द होऊन बसतो!
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈