सुश्री मंजिरी येडूरकर
विविधा
☆ स्वागत… ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆
एका उदास संध्याकाळी आकाशाला फार रितं रितं वाटत होतं. सारखं कुणीतरी यावं, कुणीतरी यावं असं वाटायला लागलं. म्हणून त्यानं स्वागताची भव्य तयारी केली सुरू केली. इंद्रधनूची सप्तरंगी कमान उभी केली, पायवाटेवर लाल मखमल अंथरली पण कुणी आलंच नाही. त्याला वाटलं आपण या सजावटीसाठी एवढे कष्ट केले, इतकी सुंदर रांगोळी पण घातली तरी कोणी का आले नाही? तो सूर्य किंवा चंद्र कोणाला तरी जबरदस्तीने घेऊन यावं का? पण जर जबरदस्तीनं आणलं तर हे उदास वातावरण तसंच राहील. त्याच्या लक्षात आलं कि कुणीतरी यावं असं वाटणं हे अर्थशून्य आहे. कुणाला तरी यावं असं वाटणं हेच जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे आपल्या तयारीचा काही उपयोग नाही. अखेर सगळी स्वागताची तयारी त्यानं गुंडाळून ठेवली आणि खिन्नपणे बसून राहीला. थोडया वेळाने एक एक करत तारे आले. तारकां आल्या सारं आकाश त्यांच्या चमचमाटानं भरून भारून गेलं. वारा ही मग इकडून तिकडे, तिकडून इकडे पळापळा करू लागला. खिन्न असलेलं वातावरण क्षणात आल्हाददायक झालं. आकाशाला कळेना, अरे! कुणी कमान कां उभी केली नाही म्हणून विचारलं नाही, कुणी गालीचा कां अंथरला नाही म्हणून थांबलं नाही. कुणाला या ही म्हणावं लागलं नाही. म्हणजे कुणाला तरी यावं असं वाटणं महत्त्वाचं असतं. मग त्याच्या मागून उल्हास आपोआप येतो. स्वागत करणाऱ्यांकडे उल्हास आला कि येणारे आनंद घेऊनच येतात. अशावेळी स्वागताची सजावट हा फक्त उपचार असतो.
© सौ.मंजिरी येडूरकर
लेखिका व कवयित्री, मो – 9421096611
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈