श्री सुनील देशपांडे
🔆 विविधा 🔆
☆ सर्व अंधश्रद्धांविरूद्ध लढणारा झुंजार योद्धा – जेम्स रँडी – भाग-१ – लेखक – डाॅ प्रदीप पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆
युरी गेलर नावाच्या इस्त्रायल मधील तेल अविव गावच्या माणसाने 1973 मध्ये केवळ मनशक्तीने चमचा वाकविण्याचा चमत्कार अमेरिकेत केला आणि सगळीकडे अतिंद्रिय दाव्यांची सिद्धता मिळाल्याचे पडघम वाजू लागले! केवळ चमचाच नव्हे तर युरिने लोकांच्या घरातील घड्याळं बंद पाडली आणि जमिनीखालचे पाणी मनशक्तीने सांगण्याचा सपाटा लावला. मनो सामर्थ्य हा अतींद्रिय शक्ती चा प्रकार आजवर सिद्ध झालेला नव्हता. तो युरीने सिद्ध केला असे सांगत जगन्मान्य ‘नेचर’ मासिकात युरी वरील संशोधन प्रबंध ही प्रसिद्ध झाला. ‘सायंटिफिक अमेरिकन’, ‘टाईम’ इत्यादींनी त्याची गंभीर दखल घेतली आणि….
युरी गेलरचा अतिंद्रिय दाव्यांचा फुगलेला फुगा फोडला जेम्स रँडी ने. एक जादूगार. कॅनडातील टोरंटो येथे 1928 मध्ये जन्मलेल्या जेम्स रँडीने कॉलेजला जाऊन शिक्षण घेतले नाही की कोणती वैज्ञानिक संशोधनासाठी पीएचडी केली नाही.. आपल्याकडे असलेल्या गाडगेबाबांसारखेच आहे हे ! चलाखीने चमत्कार करण्यात अपूर्व हातखंडा असलेला रँडी जेव्हा अमेरिकेत पोहोचला तेव्हा तेथे दूरसंवेदन,( टेलीपथी ) पासून टीव्हीवरून ख्रिस्तोपदेशकांचे चमत्कार दाखविण्यापर्यंत ,ज्यांना एव्हांजेलिस्ट असे म्हणतात अशा सर्व अंधश्रद्धांचा सुळसुळाट चालूच होता. युरी गेलरच्या अतींद्रिय दाव्या मागील हातचलाखी दाखवून व बिंग फोडूनच जेम्स रँडी थांबला नाही तर गेलरचा संपूर्ण जीवन आलेख लोकांच्या समोर मांडून त्यातील फोलपणा दाखवून दिला. टाईम मासिकाचे ज्येष्ठ संपादक लिओन जेराॅफ यांच्या उपस्थितीत रँडीने गेलरची चलाखी पहिल्यांदा स्पष्टपणे ओळखली. डॉ. अंडरिझा पुहारिश यांनी युरी चा शोध लावला आणि अमेरिकेतील स्टॅनफोर्ड रिसर्च इन्स्टिट्यूट मधील दोन वैज्ञानिक हेरॉल्ड पुटहाॅफ ( विशिष्ट प्रकारच्या लेसर चा शोधक ) आणि रसेल टर्ग ( मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सी प्लाझमा ओसीलेटर चा शोधक) हे यूरी गेलरच्या चमत्काराने प्रभावित का झाले याचा रँडीने शोध घेतला. पुटहाॅफ हा सायंटॉलॉजी नावाच्या स्वर्ग-सुपरपॉवर मानणार्या पंथात होता तर टर्ग हा गूढ पुस्तक विक्रेत्याचा मुलगा. टर्ग-पुटहाॅफ यांनी स्टॅनफोर्ड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये गेलरची चाचणी घेऊन ऑक्टोबर 1974 च्या नेचर मध्ये प्रबंध प्रसिद्ध केला. परामानसशास्त्र किंवा ढोंगी मानसशास्त्रास ‘नेचर’ मध्ये स्थान नसताना तो छापला गेल्यावर गेलरची प्रचंड प्रसिद्धी झाली आणि त्याचा भरपूर प्रचार टर्ग-पुटहाॅफनी केला. तेव्हा रँडीने ‘नेचर’ च्या त्या अंकातील डेवीस यांच्या संपादकीयात अपुरा, अव्यवस्थित आणि ‘रॅगबॅग ऑफ पेपर’ हा शेरा उघडकीस आणून ‘नेचर’ ने हा प्रबंध प्रकाशित करण्याचा उद्देश फक्त आज परामानसशास्त्राच्या चाचण्या कशा घेतल्या जातात हे दाखविण्यासाठीच होता, हे रँडीने दाखवून दिले. ‘न्यू सायंटिस्ट’चे संपादक बर्नार्ड डिक्सन यांनीही त्यास दुजोरा दिला.
गेलरच्या हातचलाखीस टर्ग- पुटऑफ हेच वैज्ञानिक फसले होते असे नव्हे तर अनेक वैज्ञानिक फसले होते. लंडनच्या बायोफिजिकल लॅबोरेटरी मध्ये 1971 मध्ये जेंम्स रँडी ने युरी गेलरच्या जादू दाखविल्या तेव्हा ‘न्यू सायंटिस्ट’ च्या जो हॉनलॉन बरोबर होते नोबेल पारितोषिक विजेते डी.एन. ए. आराखड्याचे शोधकर्ते डॉक्टर मॉरीस विल्किंस. त्यांचीही दिशाभूल युरी गेलरमुळे झाली होती. ते जेम्स रँडीस म्हणाले, परामानसशास्त्राच्या किंवा पॅरासायकॉलॉजीच्या चाचणीसाठी वैज्ञानिकांची गरज असते हे चूक असून चांगल्या जादूगाराचीही तेवढीच गरज असते!
रँडीने हेच ठळकपणे समोर आणले. वैज्ञानिक हे वैज्ञानिक चाचण्यात मुरलेले असतात. त्यांना हातचलाखी, जादुगिरी याची भाषा अवगत नसते. त्याचा फायदा परामानसशास्त्रज्ञ-बुवा-महाराज घेतात. हे युरी गेलर प्रकरणात रँडी ने दाखवून दिले आणि रँडी ने वैज्ञानिक चाचण्या बरोबर जादुगिरी, चलाखी शोधणे अशी जोड देऊन अतींद्रिय शक्तीचे दावे, चमत्कार, आत्मे- भुते यांच्या अस्तित्वाचे दावे, छद्म विज्ञान किंवा स्युडोसायन्स इत्यादी गोष्टींचा भांडाफोड केला. आणि त्याने अनेक वैज्ञानिक व विज्ञान नियतकालिकांना जादूगाराची मदत घेणे हे कसे योग्य आहे हे समजावून सांगितले. त्याने मग अश्या गोष्टींच्या सायकिक टेस्ट करण्यासाठी चार नियम मांडले. साध्या चलाखीचा वापर करणे, फसवणूक हाच उद्देश, परिणामकारक चलाखीचे प्रदर्शन, संशय घेणाऱ्या व्यक्तींच्या उपस्थितीत चलाखी कोलमडणे, हे सायकिक असे 4 अवगुण उघडे करण्यासाठी रँडी ने एक नियमावली तयार केली. सुमारे 17 नियम असलेली ही नियमावली आजही सर्वच भ्रमांचा वेध घेण्यासाठी उपयुक्त ठरत आली आहे. वैज्ञानिक चाचणी बरोबर या चाचण्यांनाही तेवढेच महत्त्व प्राप्त करून देण्यात हॅरी हुदिनी या प्रख्यात जादूगाराच्याही दोन पावले पुढे जाऊन रँडी ने मोठे यश मिळविले. त्याहीपुढे जाऊन त्याने अतिंद्रिय शक्ती, खोटे मानसशास्त्र, गुढ-चमत्कारी गोष्टी सिद्ध करण्यासाठी दहा हजार डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले. जवळपास सहाशे पन्नास जणांनी हे आव्हान स्वीकारले. त्यापैकी फक्त 54 जणांनी टेस्ट दिल्या आणि आव्हान कुणीच जिंकू शकले नाहीत आजवर! आज त्याच्या नावाने स्थापन झालेल्या जेम्स रँडी एज्युकेशनल फाऊंडेशनने ही रक्कम एक लाख डॉलर्स केली आहे.
जादू आणि चलाखी यांच्या व्याख्या त्याने स्पष्ट केल्या. विशिष्ट मंत्र आणि तांत्रिक विधी यांनी चमत्कार करणे म्हणजे मॅजिक व कौशल्य वापरून चमत्कार करणे म्हणजे चलाखी किंवा कॉन्ज्युरिंग असे त्याने स्पष्ट केले.
या गदारोळात सोसायटी ऑफ अमेरिकन मॅजिशियन्स व इंटरनॅशनल ब्रदरहुड ऑफ मॅजिशियन्स इत्यादी संघटनांनी रँडीवर जादू उघडे करण्याचा आक्षेप घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या ‘मॅजिक’ या मासिकातून जेम्स रँडीच्या विरोधात सूर उमटू लागला..
त्यावर रँडीने म्हंटले,
‘जेव्हा वैज्ञानिक एखाद्या परामानसशास्त्रज्ञांची चलाखी ओळखू शकत नाहीत तेव्हा आपणच त्या विरोधात ठामपणे उभे राहायला हवे. कारण सामान्य जनांची फसवणूक आणि शोषण यांचा आपण विचार करायलाच हवा.. हाच मानवतावाद आहे.’
जेम्स रँडीने केलेल्या या कार्याची पावती म्हणून वैज्ञानिक वर्तुळात त्यास मानाचे स्थान प्राप्त झाले. कमिटी फॉर द सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन ऑफ ऑफ द पॅरानॉर्मल या संस्थेचा तो सन्माननीय सदस्य बनला. या समितीत प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ कार्ल सेगन, विज्ञान लेखक आयझॅक असीमोह, रे हॅमन, रिचर्ड डॉकिन्स, मार्टिन गार्डनर अशी फेमस वैज्ञानिक मंडळी त्यावेळी होती.
1988 मध्ये फ्रेंच होमिओपॅथ जॅकस बेनव्हेनिस्ते याने ‘नेचर’ मध्ये होमिओपॅथीच्या सिद्धतेचा पुरावा म्हणून शरीरातील पाण्यात होमिओपॅथिक औषधांची स्मृति राहते असा प्रबंध लिहिला. त्याची छाननी करण्यासाठी ‘नेचर’ तर्फे गेलेल्या त्या पॅनेलमध्ये संपादक जॉन मेडाॅक्स व इतरांबरोबर जेन्स रँडीही होता आणि या पॅनेलने होमिओपॅथी विषयी चा दावा फेटाळून लावला.
रँडीची ही वाटचाल जादूगिरीपासून वैज्ञानिक वृत्तीच्या विज्ञानवाद्यापर्यंत घडत गेली ती वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारल्या मुळेच. त्याचा परिणाम असा झालाकी जगभर हिंडत असताना अनेक अंधश्रद्धांचा, भ्रमांचा भेद त्याने कौशल्याने आणि पुराव्यासहित केला. थायलंडमधील कागदा आधारे बुवाबाजी करणाऱ्या विणकाम्याची जादू, सर आर्थर कॉनन डायलच्या फेअरी टेल्स मधील एल्सी आणि फ्रान्सिस यांच्या छोट्या छोट्या परी कन्या व राक्षस यांच्याबरोबरच्या फोटोतील बनवाबनवी, या परी कन्यांचे प्रिन्सेस मेरीज गिफ्ट बुक या पुस्तकांमधील हुबेहूब चित्रे शोधून दाखविलेले साम्य (ज्यावर ऑलिव्हर लॉज व विलियम कृक्स या वैज्ञानिकांचाही विश्वास होता ती ही बनवाबनवी), महर्षी महेश योगीच्या ‘महर्षी इफेक्ट’मुळे आयोवा व व इतर प्रांतातील ठिकाणी गुन्हेगारी कमी झालेल्या खोट्या रिपोर्ट चा समाचार… एरिक व्हॉन डॅनिकेन या स्विस लेखकाने चारियाटस् ऑफ गॉड्स व इतर चार पुस्तकातून परग्रहातून आलेल्या लोकांची छापलेली चित्रे ही कशी बनवाबनवी होती, या सर्व प्रकरणातील चलाखी व लबाडी त्याने पुराव्यासहित दाखवून दिली.
त्याच्या या कामाची दखल घेऊन त्याला मॅक आर्थर फाउंडेशनचा प्रतिष्ठित पुरस्कार व फेलोशिप जरी मिळाली तरी त्याचे वेगवेगळ्या चाचण्या व प्रयोग करणे काही थांबले नाही. बायोरिदम या खूळाच्या त्याने मजेशीर चाचण्या घेतल्या. सेक्रेटरीचा चार्ट एका बाईस देऊन नोंदी ठेवायला सांगितल्या आणि त्या बाईने तो तिचा चार्ट समजून ऍक्युरेट नोंदीचा निर्वाळा दिला !!
क्रमशः…
© श्री सुनील देशपांडे
मो – 9657709640
email : [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈