सुश्री वर्षा बालगोपाल
विविधा
☆ स्त्री पुरुष समानता… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
युगानु युगे चाललेला वाद स्त्रीला दिलेली कमीपणाची वागणूक चाकोरीबद्ध राहण्याची शिक्षा तिच्या क्षमतेबद्दलची गृहीते तिच्यावरच लादलेली काही कार्ये यामुळे स्त्री आणि पुरुष असा भेदभाव युगानू युगे होत आलेला आहे.
पण आता शिक्षित झालेली स्त्री तिने सिद्ध केलेली तिची क्षमता सगळ्या क्षेत्रात केलेली उत्तुंग कामगिरी यामुळे स्त्री आणि पुरुष यांची समानता सिद्ध झालेली आहे आणि सगळीकडे 50% स्त्रियांना आरक्षण दिलेले आहे.
पण म्हणून स्त्री पुरुष समानता आली आहे असे म्हणता येईल का? मुळात समानता म्हणजे काय अभिप्रेत आहे? स्त्रियांनी बिनधास्त पणे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणे;पुरुष जी जी कामे करतात ती ती कार्यें स्त्रियांनी करून दाखवणे म्हणजे स्त्री पुरुष समानता झाली का?
अहो एका शरीराचे असलेले अवयव देखील आपण डावे उजवे भेद करून समान मानत नाही मग दोन भिन्न प्रकृतीच्या जीवांची बरोबरी असली पाहिजे हा आग्रह का?
नाण्याच्या दोन भिन्न बाजू कधी समान होतील का? एक प्रवाह असलेले नदीचे दोन काठ कधी एकत्र येतील का? लोहचुंबकाचे दोन ध्रुव आहेत तेच एकत्र येतात का नाही? समान ध्रुव एकत्र येऊच शकत नाहीत. मग अशा वेळी समाजातील दोन घटक स्त्री पुरुष यामधे समानता आणण्याचा अट्टाहास का? कितीही प्रयत्न केले तरी तशी समानता येईल का?
सृजनासाठी समाजातील या दोन घटकांची बरोबरीची भागीदारी असली तरी स्त्री ही जास्त सामर्थ्यशाली जास्त सहनशील असल्यामुळे कितीतरी हाडे एकत्र फ्रॅक्चर झाल्यावर जेवढ्या वेदना होतील तेवढ्या प्रसव वेदना हसत झेलण्याची ताकद स्त्रीमध्येच बहाल केलेली असल्याने अपत्यांना जन्माला घालण्याचे काम स्त्रियांकडे दिलेले आहे ते त्यांचेच राहणार.
स्त्रिया जशी पुरुषांची कामे करतात तशी पुरुषही स्त्रियांची कामे करू लागले आहेत म्हणून हॉटेलमध्ये जेवण करायला आचारी पुरुष असतात. आई वडील दोघेही कमावते असल्याने मुलांकडे लक्ष पुरुषही देतात. मुलगी माहेरचे सर्व बंध सोडून सासरी येते तसें जबाबदारी मुळे मुलेही आई वडील व घरचे बंध सोडून दूर दूर कामानिमित्ते जातात हे एक प्रकारे सासरी जाण्यासारखेच आहे.
याचाच अर्थ काही कामे स्त्रिया करू लागल्या आहेत तर काही पुरुष. नेहमीच्या रूढी परंपरा सोडून वावरण्यात रहाण्यात स्त्री पुरुष समानता आलेली आहे.
पण अनादी काळापासून स्त्रीला लाभलेला मातृत्वाचा अधिकार कोणीच हिसकावून घेऊ शकत नसल्यामुळे स्त्री पुरुष समानता असे म्हणणे चुकीचेच ठरणार आहे. या बाबत स्त्री ही अग्रगण्याच राहणार.
जसे एक नमस्कार करायला दोन हात लागतात ;एक चाल चालायला दोन पाय लागतात तसेच समाज रचनेसाठी स्त्री पुरुष दोन्ही घटक आवश्यक असतात त्यात कमी जास्त महत्वाचा असे भेद होऊच शकत नाहीत. त्यामुळे स्त्री ही जास्त श्रेष्ठ असली तरी ती स्वतः तसे समजतं नाही हा श्रेष्ठ गुण तिच्याकडून घेऊन दोन्ही घटकांनी एकत्र काम केले तर नक्कीच विधायक कार्यें पार पडतील यात शंकाच नाही.
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈